Jump to content

गणवेश

समाजातील निरनिराळ्या व्यवसायांची किंवा गटांची पृथगात्मता वा वैशिष्ट्ये दर्शविण्यासाठी योजनापूर्वक केलेला सारख्या पद्धतीचा व रंगाचा पोशाख. आदिम जमातीत विशिष्ट पद्धतीने शरीर रंगवून किंवा गोंदवून वर्गभिन्नता अथवा जातिभिन्नता दर्शविली जाई. आधुनिक काळातील गणवेशाचे मूळ पूर्वीच्या मठवासी, मुनी, जोगिणी, सरदारवर्ग इत्यादींच्या विशिष्ट पोशाखपद्धतीत आहे. राजकुलातील व्यक्ती व त्यांचे नोकरचाकर, धर्मक्षेत्रातील लहानमोठे अधिकारी आणि धर्मगुरू यांचा विशिष्ट पेहेराव, तसेच दरबारी व धार्मिक विधी, समारंभ व उत्सव इ. प्रसंगी वापरण्यात येणारे विशिष्ट पोशाख या सर्वांत सर्वमान्य संकेतांनुसार एकसारखेपणा असे.

गणवेशाची उद्दिष्टे:

  • गणवेशामुळे संघभावना दृढ होते.
  • गणवेशधारी व्यक्ती ज्या गटात असते, त्या गटाचे वेगळेपण त्यातून स्पष्ट होते.
  • सांघिक ऐक्य, शिस्त यांनाही गणवेश पूरक ठरतो. त्या त्या गटाच्या विशिष्ट कार्याच्या दृष्टीने सुलभ व सोयीचे गणवेश वापरण्याने कार्यक्षमता वाढण्यास मदत असते.
  • गणवेशाचा मानसशास्त्रीय परिणामही मोठा व हितकर असतो. आपण कोणीतरी महत्त्वाचे आहोत आणि महत्त्वाचे कार्य करीत आहोत, अशी गणवेश धारकांची मनोवृत्ती असते.
  • गणवेशधारी व्यक्तीकडे पाहण्याची लोकांची दृष्टीही पुष्कळदा आदरयुक्त गांभीर्याची असते. विशेषतः लष्करात तर गणवेशाची अत्यंत गरज असते.
  • डॉक्टर, परिचारिका, धर्मगुरू, वकील, न्यायाधीश, कुलगुरू, स्नातक, टपाल व तारखात्यातील कर्मचारी, अग्निशामक दलातील कर्मचारी, रेल्वेतील कर्मचारी व सेवकवर्ग, शासकीय कार्यालयातील सेवकवर्ग इत्यादींचे गणवेश प्रत्येक देशात रूढ आहेत.
  • जगातील सर्व शाळांतून गणवेशाची पद्धत रूढ झाली आहे. शाळांतील हे गणवेश एकोणिसाव्या शतकात सुरू झाले. विद्यार्थिवर्गात कपड्यावरून श्रीमंत-गरीब असा भेदभाव होऊ नये, नटण्यामुरडण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष जाऊ नये, त्यांच्यात साधेपणा व सारखेपणा यावा याच हेतूंनी शाळांतून गणवेश सक्तीचे केलेले असतात.

सैनिकी गणवेश

गणवेशाची खरी पद्धत सेनेत रूढ झाली. यूरोपातील तीसवर्षीय युद्धकाळात (१६१८–४८) तत्कालीन खड्या सैन्यासाठी सर्व दृष्टींनी संरक्षण करणारा, सहजसुलभ हालचालींना व शस्त्रे विनासायास वापरण्यास उपयुक्त ठरणारा पोशाख उत्तम प्रकारचा गणवेश समजला जाई. सैन्यात समता, बंधुभाव व स्वदेशाभिमान निर्माण करण्याच्या दृष्टीने गणवेश परिणामकारक ठरत असे. व्यावहारिक दृष्टीनेही सैनिकांचे कापड एकाच रंगाचे व एकाच प्रकारचे एकदम आणणे सोयीचे व फायद्याचे होते.

शत्रुमित्रांतील फरक समजण्यासाठी, शत्रुपक्षात दरारा उत्पन्न करण्याकरिता, नागरिक व सैनिक यांतील  फरक ओळखण्यासाठी आणि भोवतालच्या निसर्गापासून वेगळे दिसण्याकरिता सैनिकी गणवेशाची आवश्यकता आहे. प्रत्येक देशातील सैनिकी गणवेशात भिन्नता असली, तरी त्यामागील मूळ हेतू समानच असतो. मध्ययुगात लष्करी पेहेरावात एकसारखेपणा नव्हता. यूरोपात सरंजामशाहीच्या काळात प्रत्येक सैनिक आपण कुठल्या सरंजामदारातर्फे लढत आहोत, हे कळावे म्हणून एक वेगळे चिन्ह किंवा त्याने दिलेला ठराविक पोशाख वापरीत असे. फ्रान्समध्ये चौदाव्या लुईच्या लष्करात हंगेरीच्या घोडदळातील सैनिक एका ठराविक पद्धतीचा राष्ट्रीय गणवेश वापरीत. तेव्हापासून लष्करात फ्रेंच पद्धतीचा गणवेश अधिक प्रमाणात प्रचलित झाला. फ्रेंच नाविक दलात सतराव्या शतकातच पांढऱ्याशुभ्र रंगाचा गणवेश सुरू करण्यात आला. नेपोलियनच्या पराभवानंतर शांततेच्या काळात गणवेश घट्ट आणि चोपूनचापून बसणारे असत. परंतु या पद्धतीचा पोशाख सोयीचा नव्हता. क्रिमियन युद्धानंतर (१८५४–५६) सैल गणवेश रूढ करण्यात आले. तरी पण घोडदळातील विजारी तंग असत व पायांतील बूट गुडघ्यापर्यंत असत. चालू शतकात लढाईच्या वेळी व शांततेच्या काळात घालावयाचे असे दोन प्रकारचे गणवेश वापरण्यात येत असत. अलीकडे लष्करी गणवेश साधे, सुटसुटीत व कमी भपकेबाज करण्याकडे कल दिसून येतो. अधिकाऱ्यांचे दैनंदिन कामाचे आणि भोजनगृहात वापरण्याचे वेश वेगळे असतात, तर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेश त्याहून आणखी थोडे वेगळे असतात. राष्ट्रीय समारंभ आणि परराष्ट्रीय सैन्याधिकाऱ्यांच्या भेटप्रसंगी विशिष्ट पेहेराव घालण्यात येतो.

सैनिकी गणवेश हा त्या सैनिकांचा देश, लष्करी दल आणि दर्जा दर्शविणारा असतो. त्या गणवेशावर परंपरेचा अत्यंत प्रभाव असतो.

इंग्लंडमधील मध्ययुगीन सरदारघराणी आणि त्यांचा शिपाईगण यांनी आपले वेगळेपण दर्शविण्यासाठी विविध प्रकारचे गणवेश वापरण्यास सुरुवात केली. इंग्लंडात सातव्या हेन्रीच्या काळापर्यंत पहिले स्थायी स्वरूपाचे सैनिकी घटक म्हणजे, त्याचे खाजगी रक्षक हेच होते. त्यांच्या गणवेशात श्वेत व हिरव्या रंगांच्या पोशाखावर मागेपुढे मुकुट व गुलाब यांचे भरतकाम केलेले असे. पुढे त्यात अनेक फेरबदल झाले. दुसरा चार्ल्स गादीवर आल्यावर स्थायी सैन्यात वाढ होऊ लागली व भिन्न भिन्न पलटणीचे गणवेश प्रचलित झाले. इंग्लंडच्या साम्राज्यविस्ताराबरोबर लष्कराची शोभा आणि समारंभी बडेजाव यांना अनुरूप असे चित्रविचित्र भासणारे भपकेबाज गणवेश वापरण्यात येऊ लागले. उदा., आधीच उंच असलेल्या कोल्ड स्ट्रीम गार्ड पलटणीतील सैनिकाचे शिरस्त्राण सगळ्यांत अधिक उंचीचे असते.

पायदळ आणि घोडेस्वार यांचे गणवेश

पायदळ आणि घोडेस्वार यांचे गणवेश अगदी वेगळ्या स्वरूपाचे असत. नंतर तोफखाना आल्यावर त्याच्याकरिता जरा अधिक बडेजावदर्शक गणवेश आले. यूरोपमध्ये गणवेशांची विविधता अशाच प्रकारे पसरली.

नाविक गणवेश

नाविक गणवेश पहिल्यापासून साधा राहिला. अगदी पांढऱ्याशुभ्र परीटघडीच्या गणवेशाची पद्धत जगात जवळ जवळ सर्व देशांतून आहे. त्यांची टोपीसुद्धा साधी. खलाशांसाठी तबकडीसारखी व अधिकाऱ्यांसाठी श्वेतावरण असलेली पीक कॅप सर्वत्र वापरली जाते. नौसेना व नागरिकी नाविक दलांच्या गणवेशांत जवळजवळ फरक नाही. सैनिक रणांगणात व लढाईवर पोलादी पत्र्याची शिरस्त्राणे वापरतात.

भारत बाहेरील देशातील गणवेश

अमेरिकन आणि फ्रेंच क्रांत्यांच्या वेळी क्रांतिकारकांच्या अपुऱ्या साधनसंपत्तीमुळे त्यांच्या लष्करी गणवेशात साधेपणा आला. संख्येने व सामर्थ्याने प्रबळ असलेल्या शत्रूशी लढताना हालचालक्षमता कमी होऊ न देण्यातसुद्धा या साध्या गणवेशाचा उपयोग झाला असला पाहिजे. गणवेशातील साधेपणाबरोबर कार्यसौकर्य आणि कलात्मकता हे गुण स्कॉटलंडमधील सर्वत्र रूढ असणाऱ्या राष्ट्रीय झग्यामध्ये दिसून येतात. ग्रीक सैनिकही असा झगा वापरतात, तथापि त्यात स्कॉटिश झग्यांतील विविधता व कलात्मकता आढळत नाही.

पूर्वेकडील देशांमध्ये जपानी सामुराई योद्ध्याचा गणवेश ढगळ, सैलसर असे. आधुनिक काळात जपानी सैनिक आखूड डगला आणि पाटलोण वापरत. चिनी सैनिक व अधिकारी यांच्या गणवेशांत फारच थोडा फरक असतो.

एके काळी अनेक पौर्वात्य राष्ट्रे यूरोपीय राष्ट्रांच्या अंकित तरी होती किंवा त्यांच्यावर पाश्चिमात्य राष्ट्रांचा बराच पगडा बसला होता. त्यामुळे अशा राष्ट्रांच्या सैनिकांचे गणवेश आजपर्यंत बहुतांशी पाश्चात्त्य पद्धतीचेच असत. याला अपवाद म्हणजे थायलंड. थायी सैनिकी गणवेशात राष्ट्रीय परंपरा व पश्चिमी संस्कार यांचा मिलाफ झाला आहे. तेथील राजवाड्यांच्या संरक्षक सैनिकांचे शिरस्त्राण आपल्याकडील मुकुटांप्रमाणे, अंगरखा पश्चिमी डगलेवजा व कमरेला धोतरासारखे वस्त्र असते.

प्राचीन भारतातील गणवेश

प्राचीन भारतात सैनिकांच्या गणवेशांत व नागरिकांच्या पोशाखांत फारसा वेगळेपणा असेल, असे वाटत नाही. रामायण-महाभारतांत गणवेशांचे उल्लेख दिसत नाहीत.

शिवकालीन सैनिकी गणवेश अत्यंत साधा असे. डोक्याला मुंडासे किंवा मंदिल, अंगरखा व मांडचोळणा म्हणजे कमरेपासून गुडघ्यापर्यंत पोहोचणारी व निमुळती होत जाणारी सुरवार तसेच कमरेला शस्त्रे खोचण्याकरिता कापडाचा कमरबंद. हा गणवेश एकरंगी नसावा. घोडेस्वाराचा वेशही पायदळ सैनिकाप्रमाणे असे. अधिकारी जिरेटोप व अंगरख्याच्या आत साखळी ⇨चिलखत  किंवा कापूसगादीवजा अंगरखा वापरीत. मोगलांच्या लष्करात सर्वसाधारणपणे ज्या ज्या देशांतून सैनिक आले, त्या त्या देशांतून पद्धतीप्रमाणे त्यांचा सैनिकी गणवेश असे. उदा., अफगाणी सैनिक अफगाणी पटका, लांब अंगरखा व सैल पठाणी चोळणा आणि कमरबंद असा गणवेश करीत.

वस्तुतः आधुनिक व्याख्येप्रमाणे अठराव्या शतकापूर्वीच्या येथील सैनिकी पोशाखास गणवेश संबोधणे फारसे योग्य होणार नाही.

पेशवेकाळातील गणवेश सर्वसाधारणपणे पारंपारिकच होते, परंतु पुढे कंपनी सरकारच्या सैन्याची नक्कल व पाश्चिमात्य अधिकारी एतद्देशीय सैन्यावर नेमण्याची प्रथा यांमुळे यूरोपीय सैन्यांच्या गणवेशाचेही कमीजास्त प्रमाणात अनुकरण करण्यात येऊ लागले. कंपनी सरकारच्या एतद्देशीय सैन्यात पटका किंवा टोपी, आखूड डगला (ट्युनिक) आणि पाटलोण वा चड्डीवजा अर्धविजार असा गणवेश असे. ⇨घोडदळात तंग पाटलोण घालत असत. बंगाल सैन्य, मद्रास सैन्य व मुंबई सैन्य यांचे पोशाख वेगवेगळे असत. दुस‍ऱ्या महायुद्धापर्यंत गणवेशाचा रंग खाकी असे. त्यानंतर मात्र गणवेशात एकसूत्रीपणा येऊन त्याचा रंग ऑलिव्ह हिरवा ठेवण्यात आला. शिरस्त्राण म्हणून काही पलटणींकरिता बेरे व बुश हॅट निश्चित करण्यात आली.


स्वातंत्र्योत्तरकालीन गणवेशात फारसा बदल दिसून येत नसला, तरी वाळवंटातील लढाऊ सैनिकांकरिता खाकी आणि इतरांकरिता ऑलिव्ह हिरवा रंग ठरविण्यात आले. शिरस्त्राणातही बदल करण्यात आला आहे. हिवाळ्यात उबदार गणवेश वापरण्यात येतो. वायुसेनेत आकाशी निळ्या रंगाचा व नौसेनेत पांढऱ्या रंगाचा गणवेश वापरतात.

या गणवेशावर सैनिकाचा वा अधिकाऱ्याचा दर्जा दर्शविणारी पदचिन्हे लावण्यात येतात व ती खांद्यावर अडकविण्यात येतात. गणवेशातील बदल बरेच संशोधन करून व संकल्पित बदलांची चाचणी घेऊनच करण्यात येतात. लष्करी गणवेशांतील वैचित्र्य व विविधता प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रींय महासमारंभानिमित्त होणाऱ्या सैनिकी संचलनात पहावयास मिळते.

संयुक्त राष्ट्रे स्थापन झाल्यानंतर जगात शांतता राखण्याकरिता या संघटनेच्या सैन्याची उभारणी सभासद राष्ट्रांच्या सैन्यांमधून केली जाते. या सैनिकांचा गणवेश आपापल्या राष्ट्राच्या सैनिकांप्रमाणे असतो. परंतु त्यांच्या उजव्या दंडावर व शिरस्त्राणावर संयुक्त राष्ट्रांचे बोधचिन्ह लावण्यात येते.

गनिमी सैनिकांचा ठराविक गणवेश नसतो व तशी आवश्यकता पण गनिमी युद्धप्रकारामुळे भासत नाही.

आधुनिक काळात समरप्रंसगी अधिकारी आणि सैनिक यांच्यातील बाह्य विषमता कमीत कमी ठेवण्याकडे कल आहे. त्यामुळे शत्रुपक्षाला अधिकारी ओळखणे अवघड होऊन बनते.

कोणत्याही कारणासाठी अथवा उद्देशाकरिता परकीय राष्ट्राच्या सैनिकाप्रमाणे गणवेश धारण करणे, हा आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे गुन्हा होतो. युद्धकाळात अशा गुन्हेगारास देहांताचे शासन दिले जाते.