Jump to content

गजानन त्र्यंबक माडखोलकर

ग. त्र्यं. माडखोलकर
जन्म नाव गजानन त्र्यंबक माडखोलकर
जन्म २८ डिसेंबर १८९९
मुंबई
मृत्यू २७ नोव्हेंबर १९७६
धंतोली , नागपूर
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी
वडील त्र्यंबक माडखोलकर
अपत्ये चंद्रशेखर माडखोलकर , मीनाक्षी फडणीस.
पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार

('भारतीय साहित्यशास्त्र'या पुस्तकासाठी)

गजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, २८ डिसेंबर १८९९; - नागपूर, २७ नोव्हेंबर १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.

ग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला.

संयुक्त महाराष्ट्र समिती सदस्य :- 1) केशवराव जेथे 2) ग. त्र्य. माडखोलकर 3) द. वा. पोतदार 3) शंकरराव देव 4) श्री. शं. नवरे

पूर्वायुष्य

गणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले..

न.चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या ’दैनिक ज्ञानप्रकाश’चे विभागसंपादक, नागपूरच्या ’दैनिक महाराष्ट्र’चे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले.

भारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.

लेखन

  • वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नावाजला गेला.
  • वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते.
  • वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली.

साहित्य विचार व समीक्षा

वा.म. जोशी, ना.सी. फडके, वि.स. खांडेकर यांच्या काळातले ग.त्र्यं. माडखोलकर हेही कादंबरीकार होते. त्यांनी साहित्यविचारही व समीक्षाही केली आहे. सर्जनशील लेखक म्हणून त्यांचा साहित्यविचार व य्यांची समीक्षा महत्त्वाची आहे. त्यांच्या १९२० नंतरच्या मराठी साहित्यविचारात कलावाद-जीवनवाद यांचे तीव्र द्वंद्व दिसते. फडके कलावादी, खांडेकर जीवनवादी, तर माडखोलकर दोन्ही वादांचे पुरस्कर्ते होते. वयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नांवाजला गेला. वयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते. वयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली. ग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबऱ्या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबऱ्या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबऱ्यसंतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो.

ग.त्र्यं माडखोलकर यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या

  • अनघा (कादंबरी)
  • अरुंधती (कादंबरी)
  • अवशेष (ललित आणि राजकीय लेखसंग्रह)
  • आधुनिक कविपंचक (व्यक्तिचित्रण, समीक्षा)
  • आधुनिक महाराष्ट्राचा राजा (व्यक्तिचित्रण)
  • आव्हान (ललित)
  • उद्धार (कादंबरी)
  • ऊर्मिला (कादंबरी)
  • एका निर्वासिताची कहणी (आत्मचरित्रपर)
  • कांता (कादंबरी)
  • चंदनवाडी (कादंबरी)
  • चिपळूणकर काल आणि कर्तृत्व (ललित आणि राजकीय लेखसंग्रह)
  • जीवनसाहित्य (ललित आणि राजकीय लेखसंग्रह)
  • डाक बंगला (कादंबरी)
  • दुहेरी जीवन (कादंबरी)
  • देवयानी (नाटक)
  • दोन तपे (आत्मचरित्रपर)
  • नवे संसार (कादंबरी)
  • नागकन्या (कादंबरी)
  • परामर्श (ललित आणि राजकीय लेखसंग्रह)
  • प्रमद्वरा (कादंबरी)
  • भंगलेलें देऊळ (कादंबरी)
  • महाराष्ट्राचे विचारधन (ललित आणि राजकीय लेखसंग्रह)
  • महाराष्ट्राचे संचित (ललित आणि राजकीय लेखसंग्रह)
  • माझी नभोवाणी (ललित आणि राजकीय लेखसंग्रह)
  • माझे आवडते कवी (व्यक्तिचित्रणे)
  • माझे आवडते लेखक (व्यक्तिचित्रणे)
  • माझे लेखन गुरू (व्यक्तिचित्रणे)[]
  • मी आणि माझे वाचक (आत्मचरित्रपर)
  • मी आणि माझे साहित्य (आत्मचरित्रपर)
  • मी पाहिलेली अमेरिका (प्रवासवर्णन)
  • मृत्युंजयाच्या सावलीत (आत्मचरित्रपर)
  • मुक्तात्मा (कादंबरी)
  • मुखवटे (कादंबरी)
  • रातराणीची फुले (लघुकथासंग्रह)
  • रुक्मिणी (कादंबरी)
  • जन्म दुर्दैवी-रेणुका. (कादंबरी)
  • वाङ्मयविलास (समीक्षा)
  • विलापिका (समीक्षा)
  • व्यक्तिरेखा (व्यक्तिचित्रणे)
  • व्यक्ती तितक्या प्रकृती (व्यक्तिचित्रणे)
  • शाप (कादंबरी)
  • शुक्राचे चांदणे (लघुकथासंग्रह)
  • श्रद्धांजली (व्यक्तिचित्रणे)
  • श्री.कृ. कोल्हटकर : व्यक्तिदर्शन (समीक्षा)
  • श्रीवर्धन (कादंबरी)
  • सत्यभामा व ... (कादंबरी)
  • साहित्य-समस्या (समीक्षा)
  • साहित्यशलाका (समीक्षा)
  • स्वप्नांतरिता (कादंबरी)
  • स्वैर विचार (ललित)

इतर ग्रंथ

  • हाक
  • निर्माल्य
  • पखरण

माडखोलकरांविषयी पुस्तके

  • माडखोलकर : वाङ्मय आणि व्यक्तिमत्त्व (मा.का. देशपांडे)
  • गजानन माडखोळकरांच्या कादंबऱ्या (श्रीनिवास सिरास)
  • ग.त्र्य.माडखोलकर : व्यक्तिदर्शन (अरविंद ताटके)
  1. ^ देशपांडे, मा. का. माडखोलकर : वाङ्य आणि व्यक्तिमत्त्व.