Jump to content

गगनबावडा

गगनबावडा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याचे मुख्य गाव आहे.

प्राचीन काळापासून वाहतूक व दळणवळणासाठी घाटांना अतिशय महत्त्व आहे. इतिहासकाळीच या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी व गरजेच्या वेळी तो घाटमार्ग रोखून धरण्यासाठी जागोजागी किल्ले बांधले गेले. कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पश्चिमेच्या टोकावर गगनगडाची निर्मिती याच कारणातून करण्यात आली. सह्य़ाद्रीच्या धारेतून पुढे आलेल्या एका डोंगरावर हा गगनगड वसला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची आहे ६९१ मीटर. गगनबावडा हे गगनगिरी गडाच्या पायथ्याशी असलेले गाव. कोल्हापूरपासून हे अंतर आहे ५५ किलोमीटर आहे. हे गाव तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे येथील सर्व परिसर सदासर्वकाळ हिरवागार असतो,निसर्गरम्य वातावरण असून या गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होत आहे. बसस्थानकावरून गावात प्रवेश करताच सुरुवातीला दोन बाजूस दोन रस्ते फुटतात. त्यातील एक रस्ता करुळ घाटाकडे, तर एक रस्ता भुईबावडा घाटाकडे जातो. या दोन घाटांमधील मध्यबिंदू म्हणजे गगनगड होय. या दोन्ही घाटांवर लक्ष ठेवण्यासाठीच त्याची निर्मिती झालेली. गावातूनच गगनगडाच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता आहे. अर्ध्या तासात आपण गडपायथ्याच्या वाहनतळावर पोहोचतो. गडावरील परम पूज्य चैतन्य गगनगिरी महाराजांच्या मठामुळे नेहमी भक्तांची वर्दळ असते. पायऱ्याच्या वाटेने गडचढाईस सुरुवात करायची. वळणावळणाच्या वाटेने वर गेल्यावर गडाचा अलीकडे नव्याने केलेला दरवाजा लागतो. हा दरवाजा रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत बंद असतो. त्यामुळे साहजिकच रात्रीच्या वेळेत गडावर जाता येत नाही. या प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस लेणी आहेत. ही लेणी म्हणजे गडाच्या प्राचीनतेचे प्रतीकच आहे, पण सध्या या लेण्याचे मंदिरात रूपांतर करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना बऱ्याचदा गगनगिरी महाराजांच्या नावावरून या गडास ‘गगनगड’ हे नाव पडले असे वाटते, पण गडाचे हे नाव प्राचीन आहे. या गडाची निर्मिती भोजराजाच्या काळात झाली आहे. गडाच्या मधल्या टप्प्यावर गगनगिरी महाराजांचे मंदिर आणि अन्य इमारती आहेत. या ओलांडत थोडेसे पुढे गेलो की, इतिहासकाळातील गगनगड सुरू होतो. गडाच्या मधल्या टप्प्यावर आलो की, एक मोठे पठार लागते. या पठारावर आलो की, भन्नाट वारा आपले स्वागत करतो. यापुढे गडाच्या बालेकिल्ल्याची चढण सुरू होते. बालेकिल्ल्याच्या खालच्या अंगास एक छोटी टेकडी असून त्यावर छोटेखानी महादेव मंदिर आहे. या महादेवाचे दर्शन घेत बालेकिल्ल्याच्या चढाईस भिडायचे. जुन्या पायऱ्यांच्या वाटेने वर येतानाच दरवाजाचे अवशेष दिसतात. वर गहिनीनाथांचे मंदिर आहे. स्थानिक लोक या गैबीला गहिनीनाथ म्हणून ओळखतात. यावरून हे मंदिर गहिनीनाथाचे असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर फिरताना राजवाडा-शिबंदीच्या घरांचे अवशेष, ढालकाठीच्या निशाणाची जागा, छोटा तलाव आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. या अवशेषांना पाहतानाच गडाच्या इतिहासात शिरायला होते. शिलाहार राजवंशातील कीर्तिसंपन्न राजा महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) याने दक्षिण महाराष्ट्रात जे पंधरा किल्ले निर्माण केले. त्यातील एक किल्ला म्हणजे हा गगनगड होय. पुढे सिंधणदेव यादवाने भोज राजाचा १२०९ मध्ये पराभव केला. पुढे बहामनी राजवटीचे तुकडे झाल्यावर याचा ताबा आदिलशहाकडे गेला. इ. स. १६६० मध्ये शिवरायांनी हा किल्ला विजापूरकरांकडून जिंकून घेतला. पुढे हुकूमतपन्हा रामचंद्र पंत अमात्य यांच्या स्वामीनिष्ठेवर प्रसन्न होऊन छत्रपती राजाराम महाराजांनी गगनगड किल्ला व गगनबावडय़ाची जहागिरी त्यांना बहाल केली. पुढे १८४४ च्या गडक ऱ्यांच्या बंडानंतर इंग्रजांनी तोफांचा मारा करून गगनगडाची बरीच पाडापाडी केली. त्यानंतर गडावरची सर्व वस्ती खाली गगनबावडा गावात राहू लागली. गगनगडाचा या इतिहासावरचे लक्ष भवतालचा निसर्ग हटवतो. बालेकिल्ल्याच्या या सर्वोच्च माथ्यावरून आजूबाजूचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. तळकोकणातील सुंदर दृश्य दिसतात. हे सारे पाहात बसावसे वाटते. पावसाळय़ात तर याला उधाण येते. हिरवाईच्या विविध छटा या डोंगरावरून वाहात असतात. गगनबावडय़ाचे हे रूप पाहण्यासाठी दरवेळी या दिवसात एक चक्कर माराविशी वाटते.

हे गाव कोल्हापूर पासून ५५ किमी अंतरावर राज्य महामार्ग ११५ वर आहे. येथून गगनगड जवळ आहे. गगनबावडा या परिसरात पळसंबे गावानजीक डॉ. डी.वाय.पाटील साखर कारखाना आहे. गगनबावड्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गावांतून दोन घाट आहेत एक भुईबावडा व दुसरा करूळ घाट.. तालुक्याचे ठिकाण असून सर्व प्रशासकीय इमारती येथे आहेत.कोल्हापूरचे थंड हवेचे ठिकाण असलेले गगनबावडा कोल्हापूरपासून ५५ कि.मी.वर आहे. इथून कोकणात उतरायला दोन घाटरस्ते आहेत. एक करूळ इथे जाणारा गगनबावडा घाट, तर दुसरा खारेपाटणला जाणारा भुईबावडा घाट. गगनबावडा ऐन घाटाच्या तोंडावर वसले आहे. हिरवेकंच डोंगर, पश्चिमेकडून येणारा गार वारा आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे. घाटाच्या तोंडाशी आहे गगनगड किल्ला आणि त्यावर असलेला गगनगिरी महाराजांचा मठ. तिथपर्यंत उत्तम गाडीरस्ता आहे. गगनबावडा एस.टी कॅन्टीनला मिळणारा कट वडा अगदी न चुकता खावा. इतकी भन्नाट चव दुसरीकडे मिळणे केवळ अशक्यच. बॉलीवूडलासुद्धा या प्रदेशाची भुरळ पडली असल्याने अनेक हिंदी-मराठी सिनेमांचे चित्रीकरण इथे होत असते. पळसंबे मंदिरे तामिळनाडूमधील महाबलीपुरमची एकाश्म मंदिरे (रथ या नावाने ओळखली जातात) पाहायला जगभरातून लाखो लोक येतात, पण महाराष्ट्रातील एकाश्म मंदिरे स्थानिक लोकांशिवाय फारशी कोणाला परिचित नाहीत. कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर कोल्हापूर पासून ४० कि.मी. अंतरावर आसळज गाव आहे. तिथून ४ कि.मी. अंतरावर पळसंबे या गावी एका ओढय़ातच रामलिंगेश्वर नावाने ओळखली जाणारी जागा म्हणजेच ही एकाश्म मंदिरे होत. त्या ओढय़ात काही अजस्र शिळा आहेत. त्यांचा खालचा भाग तसाच ठेवून वरच्या अर्ध्या भागात कोरीव मंदिर उभारले आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारची ही खोदीव मंदिरे आहेत. इथे बांधलेल्या पायऱ्यांच्या वाटेने ओढय़ाकडे उतरत जावे. तिथे दाट झाडीत एकाच पाषाणातून कोरून काढलेले मंदिर सामोरे येते. दक्षिण काशी कोल्हापूर आणि पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या सीमेवरील ही मंदिरे आजही दुर्लक्षितच आहेत.

निसर्गाचा सौंदर्य अविष्कार : गगनबावडा गगनबावडा तालुका म्हणले की, पावसाचे माहेरघर म्हणूनच त्याकडे पाहिले जाते. कोल्हापूरमधून 55 किलोमीटर हे अंतर असून एस. टी. बसेस भरपूर सुविधा आहे. जाण्यासाठी एक तास लागतो. राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासह हॉटेल्सदेखील उपलब्ध आहेत. याठिकाणी जेवण, नाष्ट्याची सुविधा आहे. तसेच खाद्यपदार्थ, जेवण घेऊनदेखील जाता येते. येथून करूळ व भुईबावडा हे दोन घाट कोकणात मार्गक्रमण करतात. या घाटाचे सृष्टीसौंदर्य तर पावसाळ्यात भुरळ घातल्याशिवाय राहत नाहीत. हिरवीगार शाल पांघरूण लांबच लांब पसरलेल्या लहान मोठ्या टेकड्या कोकणातील जीवनाचे दर्शन घडवितात. करूळ व भुईबावडा घाटात पावसाळ्यात उगम पावणारे लहान मोठे धबधबे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची हौस भागविण्यास पुरेसे ठरतात. नागमोडी वळणे घेत जाणारे घाटरस्ते व घाटातून झुळझूळ वाहत नदीत पडणारे पाण्याचे प्रवाह पाहून पर्यटक क्षणभर थक्क होतो. येथील गगनगड न पाहिले तर नवलच.