खोडद
?खोडद महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पुणे |
तालुका/के | जुन्नर |
लोकसंख्या | ४,४५८ (२००१) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४१०५०४ • +०२१३२ • एम्.एच्.-१४ |
खोडद हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातले जुन्नर तालुक्यातील ४५०० ते ५००० लोकवस्तीचे गाव पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावच्या पूर्वेला जुन्नर रस्त्यावर वसले आहे.
गावाच्या पूर्वेला एक पिरॅमिडच्या आकाराचा सुळका असणारा डोंगर आहे. पश्चिमेला विशेष भौगोलिक असे काही नाही. फक्त ५ कि.मी. अंतरावर एक मांजरवाडी नावाचे गाव आहे. उत्तरेला नारायणगड आहे. त्याच्या कुशीत गडाची वाडी वसलेली आहे.
खोडद या गावी जगात दुसऱ्या क्रमांकाने शक्तिशाली समजली जाणारी एक जायंट_मीटरवेव्ह_रेडिओ_टेलिस्कोपमहाकाय रेडिओ दुर्बीण आहे]]. ही दुर्बीण खगोलशास्त्राच्या निरीक्षणासाठी वापरली जाते.
डोळ्यांनी निरीक्षण करायच्या ऑप्टिकल दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणांना मर्यादा असल्याने हल्ली खगोलशास्त्राच्या अभ्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतो. या लहरींच्या अभ्यासावरून त्या ग्रहाचे वा ताऱ्याचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते. या लहरी पकडण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. अशा दुर्बिणीमुळे इतर तरंगलांबींपेक्षा आखुड असलेल्या रेडिओ तरंगलांबीच्या(१ मीटर) लहरींचे संकलन व अभ्यास करणे सोईस्कर झाले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मूलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरूप यांना रेडिओ अॅस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहन केले. डॉ. गोविंद स्वरूपांनी या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व तिला मान्यता मिळविली.
खोडदच्या परिसरात रेडिओ लहरींना प्रभावित करू शकतील अशा इतर चुंबकीय लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. त्यामुळे रेडिओ दुर्बिणींसाठी खोडदची निवड केली गेली. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १९८२-८३ च्या सुमारास सुरू झाले व १९९४ च्या सुमारास पूर्ण झाले. या प्रकल्पात अवकाशातून येणाऱ्या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यासाच्या एकूण ३० ॲंटेना उभारल्या गेल्या. एकूण ३० पैकी चौदा ॲंटेना खोडदमध्ये तर इतर वाय आकाराच्या १६ ॲंटेना आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या परिसरात उभारल्या आहेत. ज्या आकाशस्थ वस्तूपासून येणाऱ्या लहरींच्या स्रोताचे निरीक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे सर्व ॲंटेनांच्या तबकड्या वळविल्या जातात. या तबकड्या अवकाशातून येणाऱ्या चुंबकीय लहरी परावर्तित करून जोडलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. व तिथून त्या पुढील संशोधनासाठी, ऑप्टिकल फायबर केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेतील संगणकाकडे पाठवल्या जातात. याचा अर्थ असा की या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच ॲंटेना म्हणून अप्रत्यक्षरीत्या वापरल्या जातात.
धार्मिक स्थळे
गावठाणाभोवतीची मीना नदी गावाच्या सौंदर्यात भर घालते. खोडद येथे मुक्ताई देवीचे मंदिर आहे. मंदिरासमोर दर्गा आहे. गावाच्या उत्तरेला आणि दक्षिणेला एक अशी २ हनुमान मंदिरे आणि नदीतीरावर एक महादेवाचे व एक विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आणि दक्षिणेला एक राममंदिर आहे. दक्षिणेला नदीपलीकडे महानुभाव पंथाचा एक मोठा आश्रम आहे.
रामनवमी (चैत्र शुक्ल नवमी) व दशमीला मातेचा यात्रोत्सव असतो. यात्रेच्या वेळी थेऊर येथील गोसावी समाजातील जाधव, चव्हाण ही मंडळी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात. तीन दगडाची चूल मांडतात, रानावनातील काटक्या गोळा करून त्यावर गव्हाची रोटी अन् गुळाचा नैवद्य तयार करून देवीला दिल्याशिवाय हे लोक अन्नपाणी ग्रहण करीत नाहीत. या समाजातील कित्येक पिढ्या यात्रेला दरवर्षी न चुकता येत असतात. तसेच नवरात्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. सप्ताहात नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, प्रवचने होत असल्याने भाविकांसाठी ही आनंद पर्वणीच असते.
हवामान
खोडद मध्ये उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५° - २९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सून वाऱ्यांनी पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरी जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २० - २८° सेल्शियस इतके असते.मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. या काळात दिवसाचे तापमान २९° से तर रात्रीचे तापमान १०° सेच्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५° - ६° से पर्यंत उतरते.
भोगोलिक
गावाचे भोगोलिक क्षेत्र १८९१.२८ हेक्टर बागायती क्षेत्र १२५६ हेक्टर जिरायती क्षेत्र २२४ हेक्टर वनाखालील क्षेत्र ४९ हेक्टर पडीक क्षेत्र ३६२ हेक्टर प्रमुख पिके :- गहू, ऊस, बाजरी, ज्वारी,भुईमूग, कांदे, बटाटे, द्राक्ष, डाळिंब