Jump to content

खाजगी

खाजगी हा होळकरशाहीतील वंशपरंपरागत जहागिरीचा एक प्रकार होता. रणांगणावर असताना बरेवाईट झाले तर कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून मल्हारराव होळकरांनी पेशव्यांना विनंती करून आपली पत्नी गौतमाबाईच्या नावाने ही जहागीर मिळविली होती. मल्हाररावांच्या कर्तबगारीवर खूश होऊन चिमाजी आप्पाने मल्हाररावांना अशी जहागीर देण्याची शिफारस केली होती. होळकरांच्या राजाची पत्नी या खाजगी जहागिरीची उत्तराधिकारी होत असे.

इ.स. १७३४ साली ही जहागीर गौतमाबाईंना मिळाली. गौतमाबाईंच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच २९ सप्टेंबर, इ.स. १७६१ पर्यंत या खाजगीचा कारभार गौतमाबाईच पाहत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर हा वारसा अहिल्याबाईंस मिळाला. हा वारसा मिळाल्यानंतर अहिल्याबाईंनी या खाजगीचा कारभार गोविंदपंत गानूंकडे सोपविला. खाजगीच्या उत्पन्नातून इनाम देण्याची सोय होती. खाजगीचे अधिकारी राजाला जबाबदार नसत. गरजेच्यावेळी खाजगीचा पैसा दौलतीसाठी वापरला जात असे, पण दौलतीचा पैसा खाजगीत वापरत नसत.