Jump to content

खर्ड्याची लढाई

खर्ड्याची लढाई
दिनांक फेब्रुवारी-मार्च इ.स. १७९५
स्थान खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर
परिणती मराठ्यांचा विजय[]
खर्ड्याचा तह
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य हैदराबादचा निजाम
सेनापती
सवाई माधवराव पेशवे
दौलतराव शिंदे
तुकोजी होळकर
दुसरा रघुजी भोसले
निजाम उल मुल्क


खर्ड्याची लढाई ही मराठे व हैदराबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च, इ.स. १७९५ साली भारतातील महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेली एक लढाई होती. या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला.

पार्श्वभूमी

महादजी शिंदेचा वारस दौलतराव शिंदे याच्याशी नाना फडणवीसाचे संबंध सुधारलेले होते आणि शिंद्याची विशाल सेना पुणे येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानाने ठरविले आणि हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत करून त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीर मुल्कने ही चौथाईची मागणी फेटाळून लावतानाच भोसल्याचा वऱ्हाडातील महसुलावरील अधिकारही नाकारला. परिणामी पेशवा, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च, इ.स. १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले.

लढाई

मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने त्याने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी ताबडतोब खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारा अन्नधान्य आणि पाण्याचा पुरवठा खंडित करून तटबंदीभोवती भडीमारासाठी तोफा रचल्या. शेवटी भयग्रस्त निजामाने १३ मार्च, इ.स. १७९५ रोजी तहाची याचना करून लढाईतून माघार घेतली.

शेवट

खर्डा येथेच दिनांक १३ मार्च, इ.स. १७९५ रोजी पेशवे आणि निजाम यांच्यात झालेल्या खर्ड्याच्या तहाने या लढाईची सांगता झाली.

तहातील अटी

  • तहानुसार निजामाने मराठ्यांना पाच कोटी रुपये थकलेल्या चौथाई आणि युद्धखंडणीपोटी देण्याचे मान्य केले.
  • स्वतःच्या ताब्यातील एक तृतीयांश प्रदेश मराठ्यांच्या स्वाधीन केला.
  • दौलताबादचा किल्ला व त्याच्यासभोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला.
  • वऱ्हाडचा प्रदेश महसूलासहित नागपूरच्या भोसल्याला देण्यात आला.

संदर्भ

  1. ^ "खर्डा १७९५: ऑर्डर ऑफ बॅटल फॉर मराठा कॉन्फेडर्सी" (इंग्रजी भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य); More than one of |access-date= and |ॲक्सेसदिनांक= specified (सहाय्य); |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)