Jump to content

खरोष्ठी

खरोष्टी लिपी ही नॉर्थ सेमेटिक लिपीपासून उत्पन्न झालेल्या ॲरेमाईक लिपीपासून उत्पन्न झाली. सीस्तान, कंदाहार, स्वात, लडाख, तक्षशिला या भागात खरोष्ठी लिपीतील लेख सापडतात. या लिपीला लॅसन यांनी काबुली लिपी, विल्सन यांनी ॲरिऑनिअन, कनिंगहॅम यांनी गांधार लिपी अशी नावे दिलेली आहेत. खरोष्ठी लिपीमधील लेख प्राकृत भाषेत असल्यामुळे तिला बॅक्ट्रोपाली किंवा ॲरिॲनेपाली असेही म्हणतात. पश्चिम पाकिस्तानातील हजारा जिल्ह्यातील मानसेरा व पेशावर जिल्ह्यातील शाहबाजगढी येथे खरोष्ठी लिपीतील अशोकाचे लेख आहेत. कंदाहारजवळ खरोष्ठी आणि ॲरेमाईक अशा दोन लिपींमध्ये असलेला अशोकाचा लेखही उपलब्ध आहे. मथुरेला कुषाणांच्या राजवटीतील खरोष्ठीचे लेख सापडले आहेत. खरोष्ठीचे लेख धातुचे पत्रे, नाणी, उंटाचे कातडे, भूर्जपत्रे यावर सापडतात. खोतान येथे दुसऱ्या शतकात खरोष्ठी लिपीत लिहिलेले भूर्जपत्रावरील हस्तलिखित सापडलेले आहे. या लिपीत कोणत्याही भाषेतील उच्चार-वैचित्र्य अक्षरांकित करता येते. इ.स. १८३३ मध्ये माणिक्याल येथील स्तूपाचे उत्खनन करतेवेळी जनरल वेंटुरा यांना खरोष्ठी व ग्रीक या दोन्ही लिपींमध्ये नावे असलेली इंडो-ग्रीक राजांची नाणी सापडली व या द्वैभाषिक नाण्यांमुळे नॉरीस आणि कर्नल मॅसन यांना खरोष्ठी लिपी वाचता आली.