खरखटणे
गाव आहे पण गावात लोक राहत नाहीत. सोलापूर जिल्ह्यातल्या खरकटणे गावची ही कथा आहे. दोनशे वर्षापासून गावात कोणीच राहत नाही. कारण आहे कोणा एका महिलेनं दिलेल्या शापाचं.
साडेसातशे हेक्टर सुपीक जमीन आणि हक्काची घरं सोडून लोक स्थलांतरित झालेत. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात अजुनही अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट आहे याचा हा नमुनाच म्हणावा लागेल. एकेकाळचं सुखी-सम्रुद्ध गाव आज ओसाड झालंय.
खरकटणे, सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील गाव. हे गाव आता केवळ नावापुरतं उरलंय. कारण दोनशे वर्षापासून गावात कोणीच राहत नाही. गुण्यागोविंदाने नांदणारं गाव निर्मनुष्य झालंय. गावातलं मारुतीच जुनं मंदिर सोडलं तर माणसं शोधूनही सापडत नाही. कारण अंधश्रद्धेला बळी पडून अख्खं गाव स्थलांतरीत झालंय. परकीय आक्रमणाच्या काळात गावच्या पाटलांवर कारवाई करण्यात आली. शत्रुंना आपल्या वास्तव्याची खबर दिल्याचा आरोप करून मोलकरणीला फितूर ठरवून पाटलांनी ठार मारलं. मरताना तिनं पाटलांना शाप दिला.
जन्मलेल्या मुलाचं तोंड पाहणाऱ्या बापाचा मृत्यू होईल. हा तो शाप होता, असं सांगितलं जातंय... सात पिढ्यापर्यंत दुर्दैवानं हा शाप खरा ठरला. गावच्या पाटलाचा शाप आपल्याला लागेल या अनाठायी भितीपोटी लोकांनी गाव सोडलं.
विजय पाटील... खरकटणे गावच्या पाटलांची नववी पिढी. गावच्या जागृत मारुती मंदिरात रोज दर्शनाला येतात. आता मारुतीला साकडं घालतायत. पुन्हा एकदा गाव पूर्वीप्रमाण वसावं अशी त्यांची अपेक्षा आहे. पण या गावात वर्षानुवर्षे मनुष्यवस्ती नसल्यानं शासकीय सुविधांचा अभाव आहे. त्या झाल्या तर गावकरी हळूहळू गावात राहायला येतील अशी त्यांना आशा आहे.
गावकऱ्यांच्या मते सात पिढ्यांना शाप लागला आहे. आता भितीचं कारण नाही. म्हणून काही लोक गावात राहायला येऊ लागलेत. गेल्या पंधरा वर्षात खरकटणे गावात केवळ दहा कुटुंब राहायला आली आहेत. अजुनही गावकऱ्यांची भीती पूर्णपणे गेलेली नाही. धनधान्य देणाऱ्या काळ्या आईला आणि उन, वारा, पावसापासून संरक्षण देणाऱ्या हक्काच्या घरापासून लांब राहून गावकऱ्यांना काय मिळालं देव जाणे. पण गावाकडे परत येण्याची बुद्धी सुचतेय हे काही कमी नाही. आता दहा कुटुंबं राहायला आली आहेत. ही दहाही कुटूंबे सुखी समाधानी आहेत, त्यांना अंधश्रद्धेचा कसलाही त्रास होत नाही, गावकऱ्यांची भीती अनाठायी असल्याचं या दहा-बारा घरांनी सिद्ध केलंय.
केवळ भीतीपोटी गावकऱ्यांनी आपली शेतीवाडी सोडून स्थलांतर केलं होतं. अनेक पिढ्या गेल्या तरी लोकांनी गावात येऊन राहण्याचं धाडस केलं नाही. समाजातली अंधश्रद्धा आणि खुळचट कल्पना नाहीशा व्हाव्यात यासाठी आयुष्य वेचलेल्या थोर समाजसुधारकांची मांदियाळी महाराष्ट्रात आहे. पण याच महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट आहे यावरून दिसून येतं. खरकटने गावात गेली अनेक वर्षे लोक राहत नसले तरी अजुनही गावचे अवशेष गावचं अस्तित्व सांगतात. आजपर्यंत गावाबाहेर राहून शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना आता गावात राहण्याची इच्छा होतेय.