क्षयमास
पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. या लंबवर्तुळाच्या दोन नाभींपैकी (नाभी=Focus) एका नाभीवर सूर्य असतो. या नाभींमधून जाणारा लंबवर्तुळाचा मोठा व्यास परीघाला दोन बिंदूंत छेदतो. त्यांपैकी परीघापासून जवळ असलेल्या बिंदूला उपसूर्य बिंदू (Perihelion) व दूरच्या बिंदूला अपसूर्य बिंदू (Aphelion) म्हणतात. पृथ्वी जेव्हा ५ जानेवारीच्या सुमारास उपसूर्य बिंदूच्या आसपास असते तेव्हा तिचा वेग नेहमीपेक्षा जास्त असतो. त्यामुळे सूर्यासमोरून पुढे सरकताना कधीकधी एखाद्या हिंदू महिन्यात दोन सूर्यसंक्रांती पडतात. (सूर्य एकापाठोपाठ दोन राशींत दिसतो.) अशा वेळी त्या महिन्याला क्षयमास म्हणतात.
पृथ्वी उपसूर्य बिंदूच्या आसपास असताना मार्गशीर्ष, पौष किंवा माघ यांच्यापैकी एक हिंदू महिना असतो. त्यामुळे एखाद्या वर्षी क्षयमास आलाच तर तो या तीन महिन्यांपैकीच एका महिन्यात येतो. क्षयमासाच्या काही महिने आधी आणि काही महिने नंतर एकेक अधिकमास असतो.
क्षयमासासंबंधी विशेष माहिती
- एका क्षयमासानंतर पुढचा क्षयमास १४१ वर्षांनी आणि त्यानंतरचा १९ वर्षांनी येतो. क्वचित तो ४६, ६५, ७६ किंवा १२२ वर्षांनी येतो. (४६ + १९ = ६५; ४६ + ७६ = १२२; ६५ + ७६ = १४१; १२२ + १९ = १४१)
- असे म्हणतात की इ.स.पू. १ साली क्षयमास होता.
- भास्कराचार्यांनी सिद्धान्तशिरोमणीत लिहिले आहे की, 'शके ९७४मध्ये क्षयमास आला होता, आणि त्यानंतर तो शके १११५, १२५६ आणि १३७८मध्ये येईल.' (पैकी १३७८मध्ये आल्याचे माहीत नाही!; १३९८मध्ये क्षयमास होता.)
- अलीकडच्या काळात इ.स.१९६३मधला मार्गशीर्ष महिना व इ.स.१९८३मधला माघ महिना हे क्षयमास होते.
- या पुढचा क्षयमास हा इ.स.२१२३मध्ये येईल.
- ज्यावर्षी क्षयमास असतो त्यावर्षी बारा ऐवजी ११ महिने नसतात. क्षयमासाच्या आधी एक अधिकमास येऊन महिने पूर्ववत १२ होतात, आणि त्याशिवाय नजीकच्या काळात आणखी एक अधिकमास येऊन त्यावर्षी १३ महिने होतात.
वेगवेगळी नावे
या क्षयमासास अहिस्पती मास असेही एक नाव आहे.
यापूर्वीचे काही क्षयमास
क्षयमासाच्या आधीचा महिना (इ.स.) | क्षयमासाच्या नंतरचा महिना (इ.स.) | क्षयमास (हिंदू महिना) | आधीचा अधिकमास (इ.स.) | नंतरचा अधिकमास (इ.स.) | किती वर्षांनी?(इ.स.) |
---|---|---|---|---|---|
मार्गशीर्ष इ.स. ७७० | माघ इ.स. ७७१ | पौष | आश्विन इ.स. ७७० | चैत्र इ.स. ७७१ | -- |
कार्तिक इ.स. ८९२ | पौष इ.स. ८९३ | मार्गशीर्ष | कार्तिक इ.स. ८९२ | चैत्र इ.स. ८९३ | १२२ |
कार्तिक इ.स. ९११ | पौष इ.स. ९१२ | मार्गशीर्ष | आश्विन इ.स. ९११ | चैत्र इ.स. ९१२ | १९ |
मार्गशीर्ष इ.स. १०५२ | माघ इ.स. १०५३ | पौष | आश्विन इ.स. १०५२ | चैत्र इ.स. १०५३ | १४१ |
मार्गशीर्ष इ.स. ११९३ | माघ इ.स. ११९४ | पौष | आश्विन इ.स. ११९३ | चैत्र इ.स. ११९४ | १४१ |
मार्गशीर्ष इ.स. १२५८ | माघ इ.स. १२५९ | पौष | कार्तिक इ.स. १२५८ | चैत्र इ.स. १२५९ | ६५ |
मार्गशीर्ष इ.स. १२७७ | माघ इ.स. १२७८ | पौष | कार्तिक इ.स. १२७७ | फाल्गुन इ.स. १२७८ | १९ |
मार्गशीर्ष इ.स. १२९६ | माघ इ.स. १२९७ | पौष | मार्गशीर्ष इ.स. १२९६ | फाल्गुन इ.स. १२९७ | १९ |
कार्तिक इ.स. १३१५ | पौष इ.स. १३१६ | मार्गशीर्ष | कार्तिक इ.स. १३१५ | फाल्गुन इ.स. १३१६ | १९ |
मार्गशीर्ष इ.स. १३३४ | माघ इ.स. १३३५ | पौष | आश्विन इ.स. १३३४ | फाल्गुन इ.स. १३३५ | १९ |
कार्तिक इ.स. १३८० | पौष इ.स. १३८१ | मार्गशीर्ष | कार्तिक इ.स. १३८० | वैशाख इ.स. १३८१ | ४६ |
मार्गशीर्ष इ.स. १३९९ | माघ इ.स. १४०० | पौष | कार्तिक इ.स. १३९९ | चैत्र इ.स. १४०० | १९ |
पौष इ.स. १४७५ | फाल्गुन इ.स. १४७६ | माघ | आश्विन इ.स. १४७५ | फाल्गुन इ.स. १४७६ | ७६ |
कार्तिक इ.स. १५२१ | पौष इ.स. १५२२ | मार्गशीर्ष | कार्तिक इ.स. १५२१ | वैशाख इ.स. १५२२ | ४६ |
मार्गशीर्ष इ.स. १५४० | माघ इ.स. १५४१ | पौष | आश्विन इ.स. १५४० | चैत्र इ.स. १५४१ | १९ |
मार्गशीर्ष इ.स. १६८१ | माघ इ.स. १६८२ | पौष | आश्विन इ.स. १६८१ | चैत्र इ.स. १६८२ | १४१ |
मार्गशीर्ष इ.स. १८२३ | माघ इ.स. १८२३ | पौष | आश्विन इ.स. १८२२ | चैत्र इ.स. १८२३ | १४१ |
कार्तिक इ.स. १९६३ | पौष इ.स. १९६४ | मार्गशीर्ष | कार्तिक इ.स. १९६३ | चैत्र इ.स. १९६४ | १४१ |
पौष इ.स. १९८२ | फाल्गुन इ.स. १९८३ | माघ | आश्विन इ.स. १९८२ | फाल्गुन इ.स. १९८३ | १९ |
मार्गशीर्ष इ.स. २१२४ | माघ इ.स. २१२४ | पौष | कार्तिक इ.स. २१२३ | चैत्र इ.स. २१२४ | १४१ |
पौराणिक कथा
हे सुद्धा पहा
- अधिक मास