क्लोद मोने
क्लोद मोने | |
पूर्ण नाव | क्लोद ओस्कार मोने |
जन्म | नोव्हेंबर १४, १८४० पॅरिस, फ्रान्स |
मृत्यू | डिसेंबर ५, १९२६ गिवर्नी, फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | फ्रेंच |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
शैली | दृक् प्रत्ययवाद शैली |
क्लोद मोने (फ्रेंच: Claude Monet) हा एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद (अर्थात इंप्रेशनिझम) शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो.
जीवन
पॅरिसमध्ये जन्म झालेल्या मोनेचे बालपण 'ल आव्र (Le Havre) ' या नोर्मांडीतील बंदराच्या गावी गेले. मोनेचे वडील पेशाने वाणी होते; तर आई गायिका होती. बालपणी वडिलांच्या दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांची, ओळखीतल्या लोकांची रेखाटने काढणाऱ्या मोनेला सुदैवाने युजेन बूदॅं याचे मार्गदर्शन लाभले. आपल्या मुलाने आपला घरचा धंदा सांभाळावा अशी मोनेच्या वडिलांची इच्छा होती; परंतु बुदॅंच्या प्रयत्नांमुळे क्लोद मोनेला कलाशिक्षणाकरता अखेरीस पॅरीसला पाठविण्यात आले.
जून १८६१ मध्ये क्लोद मोने अल्जीरियातील फ्रेंच लष्कराच्या 'आफ्रिकन लाईट कॅव्हॅलरी'च्या पहिल्या रेजिमेंटमध्ये दाखल झाला. परंतु काही काळानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे लष्करी सेवेला रामराम ठोकून, तो पुन्हा पॅरीसमध्ये परतून 'आतलिए ग्लेएर' या शिक्षणसंस्थेत दाखल झाला. तेथे त्याचा पिएर रन्वार, फ्रेडरिक बाझीय, आल्फ्रेड सिस्ले या त्याच्यासारख्याच प्रयोगशील चित्रकारांबरोबर संबंध आला. खुल्या हवेत चित्रण करण्याच्या कल्पनांची, तुकड्या-तुकड्यांत जलदगतीने दिलेल्या ब्रशाच्या फटकाऱ्यांतून साकारलेल्या रंगलेपनातून ऊन-सावल्यांचा परिणाम साधण्यासारख्या प्रयोगांची त्यांच्यात देवाणघेवाण होत असे; ज्यातून पुढच्या काळातील 'दृक् प्रत्ययवाद चित्रशैली'ची बीजे पेरली गेली.
१८७०-१८७१ दरम्यानच्या काळात फ्रॅंको-प्रशियन युद्धामुळे मोनेने काही काळ इंग्लंडमध्ये आश्रय घेतला होता. १८७० मध्येच मोनेने कामीय दोन्सियो (Camille Doncieux) हिच्याशी लग्न केले. फ्रान्समध्ये परतल्यावर 'ल आव्र' येथील निसर्गदृश्याचे चित्रण करणारे 'Impression, Sunrise' हे पुढे जाऊन दृक् प्रत्ययवाद चित्रशैलीची ओळख बनलेले चित्र चितारले.
१८७९ मध्ये कामीय दोन्सियो-मोनेचे क्षयाने निधन झाले. क्लोद आणि कामीय मोने यांना ज्यॉं आणि मिशेल असे दोन पुत्र होते.
१८८३ मध्ये मोनेने गिवर्नी, ओट नोर्मांडी येथे बागबगीचा फुलवलेले घर घेतले आणि आलिस ओशडे (Alice Hoschedé) हिच्याबरोबर तेथे मुक्काम हलवला. याच घराभोवती फुलवलेल्या आपल्या बगीच्यात मोनेने उर्वरित आयुष्यात बरीचशी चित्रे चितारली.
१८८३-१९०८ दरम्यान मोनेने भूमध्य सागरी भागामध्ये भ्रमंती केली. या प्रवासात त्याने प्रसिद्ध वास्तुशिल्पे, निसर्गदृश्ये, समुद्रकिनाऱ्यावरील दृश्ये चित्रित केली.
१९११ मध्ये त्याच्या पत्नीचे - आलिसचे आणि १९१४ मध्ये ज्यॉं या त्याच्या मुलाचे निधन झाले. उतारवयात मोनेच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला; ज्यावर १९२३ मध्ये दोन शस्त्रक्रियादेखील झाल्या.
डिसेंबर ५, १९२६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मोनेचे निधन झाले. गिवर्नीमधील चर्चच्या दफनभूमीत मोनेचे दफन करण्यात आले.
कार्य
क्लोद मोने हा त्याच्या ऊन-सावल्यांचा सळसळता खेळ दर्शविणाऱ्या दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीतल्या चित्रांकरिता ओळखला जातो. ब्रशाच्या जलदगतीने मारलेल्या छोट्या-छोट्या फटकाऱ्यांनी रंगवलेल्या मूलभूत रंगछटांच्या तुकड्यांतून चित्र साकारण्याची पद्धत या चित्रशैलीत वापरली जाते. चितारताना दिले गेलेले हे मूलभूत/ शुद्ध रंगछटांचे तुकडे, ब्रशाचे दिसण्याजोगे फटकारे यांचा प्रेक्षकाच्या नजरेतच मिलाफ होऊन विविधरंगी चित्राची प्रतिमा/ चित्राचा दृक् प्रत्यय जाणवतो.
पॅरिसमधील 'आतलिए ग्लेएर' मधील कालखंडात मोनेच्या चित्रांतील या खासियतीची बीजे रोवली गेली. पिएर रन्वार, फ्रेडरिक बाझीय, आल्फ्रेड सिस्ले या सहकलाकारांबरोबर चित्रतंत्रांविषयी झालेल्या आदानप्रदानाचा मोनेच्या दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. परंतु मोनेच्या कारकिर्दीतला - आणि तसे म्हणले तर दृक् प्रत्ययवाद चित्रशैलीच्या इतिहासातला - संस्मरणीय टप्पा १८७४च्या पहिल्या इंप्रेशनिस्ट चित्रप्रदर्शनाच्या रूपाने सुरू झाला. या प्रदर्शनात दृक् प्रत्यय, सूर्योदय (Impression, soleil levant) या त्याच्या चित्राच्या नावावरून तत्कालीन समीक्षक लुई लरोय (Louis Leroy) यांनी औपरोधिक उद्देशाने 'इंप्रेशनिझम' हे नाव तयार केले.
बाहेरच्या खुल्या वातावरणातील सरकत्या क्षणांबरोबर प्रकाशाच्या दृश्य परिणामांत होणारे बदल टिपण्याचं अस्सल दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीचं वैशिष्ट्य मोनेच्या एकाच चित्रविषयाच्या वेगवेगळ्या समयी, वेगवेगळ्या वातावरणात केलेल्या चित्रमालिकांत पाहायला मिळते. 'रूआं कॅथेड्रल' या त्याच्या पहिल्या चित्रमालिकेत कॅथेड्र्लची विविध दृष्टीकोनातून व दिवसातल्या वेगवेगळ्या वेळी चितारलेली तब्बल वीस चित्रे आहेत. शेतमळ्यावर रचून ठेवलेल्या गवताच्या गंज्या, लंडन पार्लमेंट या त्याच्या इतर चित्रमालिकादेखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
महत्त्वाच्या चित्रकृती
- छत्री घेतलेली बाई (१८७५)
- सॉंत आद्रेस येथील बाग (१८६७)
- सीन नदीचा एक प्रवाह, गिवर्नी (१८९७)
- उद्यान विहार करणाऱ्या बायका (१८६६-६७)
- बागेतील एक वाट (१९०२)
- त्रूविलचे बंदर (१८७०)
- मोनब्लूमेन (१८७३)
- पालात्झ्झो दा मूला, व्हेनिस (१९०८)
- सूर्यास्तासमयी ब्रिटिश पार्लमेंट, लंडन (१९०२)
- ब्रिटिश पार्लमेंट, लंडन
- ब्रिटिश पार्लमेंट, लंडन
- ब्रिटिश पार्लमेंट, लंडन (१९०४)
- ब्रिटिश पार्लमेंट, लंडन (१९००-०१)
- सकाळच्या वेळी रूआं कॅथेड्रल (१८९२-९४)
- रूआं कॅथेड्रल (१८९२-९४)
- सूर्यास्तसमयी रूआं कॅथेड्रल (१८९२-९४)
- रूआं कॅथेड्रल (१८९२-९४)
- राष्ट्रीय दिनी सॉं-दनी येथील रस्त्याचे दृश्य (१९७८)
- वॉटरलिली (१९१४-१७)
- वॉटरलिली (१९१६)
- वॉटरलिलींनी फुललेले तळे (१८९९)
- वाचिका (१८७२)
- कामीय दोन्सियो-मोने (१८७५)
- मिशेल मोने (१८८०)
संदर्भ
- क्लोद मोनेचे चरित्र - ऍक्सेंट्स-एन-आर्ट.कॉम
- मोनेची चरित्रगाथा - ट्रियाडा.बीजी Archived 2006-02-07 at the Wayback Machine.
- चरित्र - फाउंडेशन क्लोद मोने आ गिवर्नी Archived 2008-04-17 at the Wayback Machine.
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑगस्ट १२, २००३ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- मोने चरित्र - ऑल अबाऊट आर्टिस्ट्स.कॉम Archived 2006-10-04 at the Wayback Machine.
वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती डिसेंबर ५, २००४ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
बाह्य दुवे
- क्लोद मोनेची चित्रे - मोने.यूएफ्एफ्एस्.नेट
- क्लोद मोने - इन्सेक्युला.कॉम Archived 2007-03-12 at the Wayback Machine.
- मोनेचे कलादालन - वेब गॅलरी आणि इतर संसाधने
- क्लोद मोन Archived 2020-11-09 at the Wayback Machine.