Jump to content

क्रिकेट सांख्यिकी

क्रिकेटच्या खेळातून संख्याशास्त्रीय संस्कार करण्याजोगी प्रचंड माहिती जमा होत असते.

प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी केलेल्या प्रदर्शनाची नोंद घेतली जाते, तसेच कारकिर्दीचाही एकत्रितपणे लेखाजोखा मांडला जातो. व्यावसायिक पातळीवर कसोटी सामने, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि प्रथम श्रेणी सामने यांची सांख्यिकी वेगवेगळी राखली जाते. कसोटी सामने हे प्रथम श्रेणीचे सामने असल्याने खेळाडूच्या प्रथम श्रेणी कामगिरीत कसोट्यांमधील कामगिरीचा समावेश असतो; याचा व्यत्यास मात्र सत्य नाही. आजच्या काळात 'यादी अ'मधील सामने आणि टी२० सामने यांचेही तपशील राखले जातात. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (एदिसा) हे 'यादी अ'मधील सामने असल्याने खेळाडूच्या 'यादी अ' कामगिरीत एदिसांमधील कामगिरीचा समावेश असतो; याचा व्यत्यास मात्र सत्य नाही.

सर्वसाधारण

  • सामने: संघाने वा खेळाडूने खेळलेले सामने.
  • झेल : खेळाडूने टिपलेले झेल.
  • यष्टिचित: यष्टीरक्षक म्हणून खेळाडूने यष्टिचित केलेल्या फलंदाजांची संख्या.

फलंदाजी

  • डाव: फलंदाजांने प्रत्यक्ष फलंदाजी केलेल्या डावांची संख्या. क्रिकेटच्या परंपरेप्रमाणे, प्रत्यक्ष चेंडू न खेळता केवळ बिनटोल्या टोकाचा ( नॉन-स्ट्राइकिंग एंड ) फलंदाज म्हणून खेळात सामील असणे, हाही "फलंदाजाचा डाव" ठरतो.
  • नाबाद: ज्या डावांमध्ये फलंदाज बाद झाला नाही, अशा डावांची संख्या. यात जायबंदी झाल्यामुळे अर्धवट राहिलेल्या डावांचाही समावेश होतो.
  • धावा: फलंदाजाने काढलेल्या धावा.
  • सर्वोच्च धावा: एका डावात फलंदाजाने काढलेल्या सर्वाधिक धावा.
  • फलंदाजीची सरासरी: एकूण धावा भागिले फलंदाज बाद झालेल्या डावांची संख्या.
  • शतक (१००): ज्या डावांमध्ये फलंदाजाने किमान १०० धावा काढल्या अशा डावांची संख्या.
  • अर्धशतक (५०): ज्या डावांमध्ये फलंदाजाने ५० ते ९९ धावा काढल्या (दोन्ही आकडे समाविष्ट) अशा डावांची संख्या.
  • चेंडू: फलंदाजाने सामना केलेल्या चेंडूंची संख्या. यातनो बॉल्स समाविष्ट असतात, वाईड बॉल्स समाविष्ट नसतात.
  • मारगती: प्रत्येक शंभर चेंडूंवर फलंदाजाने काढलेल्या धावा.

गोलंदाजी

  • षटके: गोलंदाजाने टाकलेल्या षटकांची संख्या. पूर्वी चार, सहा आणि ऑस्ट्रेलियात आठ वैध चेंडूंना 'षटक' गणले जाई. आता मात्र सहा वैध चेंडूंचे एक 'षटक' गणले जाते.
  • चेंडू: गोलंदाजाने टाकलेले चेंडू. 'षटका'तील चेंडूंची संख्या वेगवेगळी असल्याने संख्याशास्त्रात चेंडू ही उपयुक्त बाब ठरते.
  • निर्धाव षटक: ज्या षटकामध्ये गोलंदाजाने एकही धाव दिली नाही, असे षटक.
  • धावा: गोलंदाजाने दिलेल्या धावा.
  • बळी: गोलंदाजाने बाद केलेल्या फलंदाजांची संख्या.
  • गोलंदाजीचे पृथक्करण: गोलंदाजाने टाकलेली षटके, निर्धाव षटके, दिलेल्या धावा आणि मिळविलेले बळी यांचे याच क्रमाने मांडलेले विश्लेषण. हे मुख्यतः एका डावासाठी असते. उदाहरणार्थ १०-३-२७-२ याचा अर्थ खेळाडूने १० षटके गोलंदाजी केली, त्यापैकी ३ षटकांमध्ये एकही धाव दिली नाही, दहा षटकांमध्ये मिळून त्याने २७ धावा दिल्या आणि २ फलंदाजांना बाद केले.
  • नो बॉल: गोलंदाजाने टाकलेल्यानो बॉल्सची (अवैध चेंडूंची) संख्या.
  • वाईड बॉल: गोलंदाजाने टाकलेल्या वाईड चेंडूंची संख्या.
  • गोलंदाजीची सरासरी: एका फलंदाजाला बाद करण्यासाठी गोलंदाजाने दिलेल्या धावा.
  • प्रतिषटक धावा: एका षटकात गोलंदाजाने दिलेल्या सरासरी धावा.
  • सर्वोत्तम गोलंदाजी: गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी. यात प्राथमिक महत्त्व बळींना तर दुय्यम महत्त्व मोजलेल्या धावांना असते. त्यामुळे १०२ धावांमध्ये ७ बळी ही कामगिरी, १९ धावांमध्ये ६ बळींपेक्षा सरस ठरते.
    • डावातील सर्वोत्तम गोलंदाजी: यात केवळ एकेका डावातील कामगिरीच्या आधारे सरसता ठरविली जाते. विशेष उल्लेख केलेला नसल्यास सर्वोत्तम गोलंदाजी ही डावातील सर्वोत्तम गोलंदाजी असते.
    • सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी: ही सामन्याच्या दोन्ही डावांमधील कामगिरीचा एकत्र विचार करून ठरविलेली सर्वोत्तम कामगिरी असते. ज्या सामन्यांमध्ये दोन डाव होतात (प्रथम श्रेणी सामने) तिथेच हा निकष उद्भवतो.
  • डावात पाच बळी: ज्या डावांमध्ये गोलंदाजाने किमान पाच बळी मिळविले अशा डावांची संख्या.
  • सामन्यात दहा बळी:ज्या सामन्यांमध्ये गोलंदाजाने किमान दहा बळी मिळविले अशा सामन्यांची संख्या. ज्या सामन्यांमध्ये दोन डाव होतात (प्रथम श्रेणी सामने) तिथेच हा निकष उद्भवतो.
  • गोलंदाजीची मारगती: एक बळी मिळविण्यासाठी गोलंदाजाला टाकावे लागलेले सरासरी चेंडू.

क्रिकेट सांख्यिकीचे विश्लेषण

संगणकांच्या उपलब्धतेमुळे आता क्रिकेटमधील सांख्यिकीचे मोठ्या प्रमाणावरील विश्लेषण सुरू झाले आहे.

गतिशील आणि आलेखीय सांख्यिकी

क्रिकेट सामन्यांची दूरचित्रप्रक्षेपणे होत असल्याने दर्शकांना सुखद वाटेल अशा प्रकारे सांख्यिकीय माहिती मांडण्याचे प्रयत्न प्रक्षेपकांकडून होतात. यात द्विमितीय व त्रिमितीय प्रतिमांमधून खेळाडूने मारलेल्या फटक्यांच्या दिशांचा आणि अंतरांचा तपशील मांडणाऱ्या वॅगन-व्हील सारख्या बाबींचा समावेश होतो.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे