Jump to content

कौसानी

कौसानी हे उत्तराखंड राज्यातील बागेश्वर जिल्ह्यात वसलेले खेडेगाव आहे. हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या या गावातील निसर्गामुळे महात्मा गांधी यांनी या गावाचे 'भारताचे स्वित्झर्लंड' असे वर्णन केले आहे. अलमोडा या प्रसिद्ध ठिकाणापासून कौसानी ५२ किलोमीटर अंतरावर आहे.

कौसानी मधून हिमालयातील त्रिशूल, नंदादेवी आणि पंचचुली या तीन शिखरांचा सुमारे तीनशे किलोमीटर लांबीचा दिलखेचक नजर दिसतो.

इतिहास

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कौसानी हे गाव अलमोडा जिल्ह्याचा भाग होते. १५ सप्टेंबर १९९७ रोजी अलमोडाचे विभाजन करून बागेश्वर जिल्ह्याची निर्मीती झाली. कालांतराने ९ नोव्हेंबर २००० रोजी उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन उत्तराखंडाची निर्मिती झाली आणि हा जिल्हा उत्तराखंडचा भाग बनला.

महात्मा गांधी यांनी येथे आपल्या 'अनासक्ती योग' या पुस्तकाचे लेखन १९२९ मध्ये केले.

पर्यटन स्थळे

महात्मा गांधींच्या शिष्य सरलाबेहन (मूळ नाव - कथेरीन हेलमान) यांनी अनासक्ती आश्रम आणि स्त्रियांच्या कल्याणासाठी लक्ष्मी आश्रम अशा दोन आश्रमाची येथे १९४६ मध्ये स्थापना केली. हिंदीतील प्रसिद्ध कवी सुमित्रानंदन पंत याच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे 'पंत संग्रहालय' आहे. बागेश्वर रस्त्याला चहाचे बगीचे आहेत. येथे दर वर्षी सुमारे ७०००० किलो चहाची निर्मिती होते. कौसानी येथील सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यासारखे आहेत.

उन्हाळ्यात जाणाऱ्या पर्यटकांची काही वेळा निराशा होते कारण वणव्यामुळे धूर निर्माण होऊन हिमालयाच्या रांगा दिसणे बंद होते.


चित्रपट

कौसानी येथे 'कोई मिल गया' तसेच '१९४२ अ लव्ह स्टोरी' या चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.