कोहोजगड
कोहोजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो. या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत. यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा 'कोहोज ' हा प्रमुख किल्ला. वाडापासून अवघ्या १० -११ किमी वर वसलेला हा किल्ला आहे.
इतिहास
या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. गडावरच्या खोदीव टाक्यांवरून हा गड बऱ्यापपैकी जुना, भोजकालीन असावा असे वाटते. पण यास पुरावा नाही. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातच्या राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट - बुरूज चढवले. पुढे पेशव्यांनी १८ व्या शतकात (१७३७) काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला. शेवटी तो इंग्रजांकडे गेला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
- माचीवरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते.
- माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे. त्याच्या समोरच दोन टाकी आहेत, पण ती खराब झालेली आहेत.
- मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत.
यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे. दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.मंदिराच्या उजवीकडे काही उद्ध्वस्त अवशेष आढळतात.
- काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे. मंदिर डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर
जाणारी वाट दिसते. इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची ३ प्रशस्त टाकी लागतात. यापैकी १ बुजलेले असून बाकी पाणी शेवाळयुक्त असले तरी पिण्यायोग्य आहे. इथेच कोपऱ्याीत मारुतीची एक उघडी मूर्ती आहे. इथून तीच वाट घेऊन पुढे निघालं की आपण पडक्या बुरुजाजवळ येतो. डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे. पायऱ्यांनी वर गडमाथ्यावर जायचं. इतकी चाल सुमारे १५ मिनिटांत आटोपते.
- माथ्यावर वाऱ्या ने तयार झालेले सुळके आहेत. यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही
निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती. ही कोहोजवरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट. विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो.या ठिकाणी उभे राहून हवेचा पुरेपूर आनंद घेता येतो, तसेच पावसाळ्याच्या दिवसांत थंडगार हवेच्या झोताने अंगावर शहारे उभे राहतात.
- इथून थोडे पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे, त्यातील राधा कृष्णाची मूर्ती मन भावुन घेते. इथेच ऊभे राहून खालचा (वाडा - मनोर)
रस्ता छान दिसतो.याच्याच पुढे थोडं खाली उतरले कि समोरच भल्या मोठ्या शीळांचा थर आहे, ते असे वाटते की कोणीतरी आपल्या हातांनी या प्रशस्त शीळा एकमेकांवर ठेवल्या आहेत.यात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते, मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर, प्रस्तरांवर, इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवलेली आहेत. किल्ल्यावर नागनाथ लिंगी नावाचा सुळका आहे
==गडावर जाण्याच्या वाटा == गोऱ्हे गावातून पुढे गेल्यावर समोरच डोंगर चढून वर कोहजकिल्यावर जाण्यासाठी पाऊल वाट आहे.
राहण्याची सोय
गडावर निवारा असा नाही. शंकराच्या मंदिरात केवळ २ माणसे राहू शकतात.
जेवणाची सोय
खाण्याची सोय आपणच करावी, पिण्याचे पाणी गडावर आहे.
पाण्याची सोय
बारमाही पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
२ तास
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर