Jump to content

कोहिमाची लढाई

कोहिमाची लढाई
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
कोहिमाच्या लढाई दरम्यान जपानी, चिनी व ब्रिटिश सैन्यांच्या हालचाली.
कोहिमाच्या लढाई दरम्यान जपानी, चिनी व ब्रिटिश सैन्यांच्या हालचाली.
दिनांक ४ एप्रिल- २२जून,१९४४
स्थान कोहिमा, आसाम प्रांत, ब्रिटिश भारत सध्या कोहिमा, नागालॅंड, भारत
परिणती दोस्त राष्ट्रांचा निर्णायक विजय
युद्धमान पक्ष
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम


ब्रिटिश भारत

जपान ध्वज जपान


आझाद हिंद फौज

सेनापती
युनायटेड किंग्डम मॉंटेग्यू स्टॉपफोर्ड जपान कोतोकू सातो
सैन्यबळ
सुरुवातीस: १ इन्फंट्री ब्रिगेड
शेवटी: २ इन्फंट्री ब्रिगेड, १ चिंदित ब्रिगेड, १ मोटर ब्रिगेड
१ इन्फंट्री डिव्हिजन[]
बळी आणि नुकसान
४,०६४[]५,७६४[]

कोहिमाची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्य, आझाद हिंद फौज व दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये लढली गेली होती. ४ एप्रिल ते २२ जून,१९४४ दरम्यान आधुनिक भारताच्या नागालॅंड राज्यातील कोहिमा शहराच्या सीमेवर लढली गेलेली ही लढाई जपानच्या उ गो मोहिमेचा सर्वोच्चबिंदू होता. या लढाईची तुलना अनेकदा स्टालिनग्राडच्या वेढ्याशी करण्यात येते.[][]

तीन टप्प्यांत लढल्या गेलेल्या या लढाईच्या सुरुवातीस एप्रिलच्या पूर्वार्धात जपानने कोहिमा रिज ही जागा जिंकून इंफाळकडे जाणारा रस्ता ताब्यात घेतला. १६-एप्रिल १८च्या दरम्यान ब्रिटिश व भारतीय सैन्यांची कुमक आडवाटेने कोहिमाला पोचली व त्यांनी जपान्यांचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली. या प्रतिहल्ल्यानंतर जपानी सैन्याने कोहिमा रिज सोडली पण कोहिमा-इंफाळ रस्ता त्यांच्याच ताब्यात राहिला. मेच्या मध्यापासून जून २२ पर्यंत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याने हळूहळू माघार घेणाऱ्या जपानी सैन्याला मागे रेटत रस्ता काबीज केला. तिकडून इंफाळकडूनही चालून आलेल्या दोस्त सैन्याशी त्यांनी मैल दगड १०९ येथे संधान बांधले व इंफाळला पडलेला वेढा मोडून काढला.

पार्श्वभूमी

इ.स. १९४४च्या सुरुवातीस युनायटेड किंग्डमने भारतातून म्यानमार (तेव्हाचा ब्रह्मदेश) आणि तेथून आग्नेय आशियामध्ये ठाण मांडून बसलेल्या जपान्यांना हुसकावण्यासाठीची तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांनी ईशान्य भारतातील मिझोरम प्रदेशातील इंफाळ शहरात आपले इंडियन फोर्थ कोअर हे सैन्यदल जमवले होते. याला काटशह देण्यासाठी जपानने उ-गो मोहीम या नावाखाली प्रतिआक्रमण करण्याचे ठरवले. जपानच्या पंधराव्या सैन्यदलाच्या मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची याने या मोहिमेला अधिक मोठे करण्याचे ठरवले. मुतागुचीच्या आराखड्याप्रमाणे जपानी सैन्य फक्त चौथ्या कोअरला अडवण्यासाठी नाही तर ब्रिटिश भारतावर आक्रमण करण्यासाठीच चालून जाणार होते. यात ईशान्य भारतातून घुसून थेट भारताच्या मध्यापर्यंत धडक मारण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही होते.[] दीड-दोनशे वर्षे भारतात ठाण मांडलेल्या ब्रिटिशांना असे सहजासहजी हुसकावणे शक्य नाही हा विरोधी युक्तिवाद त्याने नाकारला. प्रकरण युद्धमंत्री हिदेकी तोजोपर्यंत गेल्यावर तोजोनेही हा युक्तिवाद फेटाळून लावला व मुतागुचीला भारतावर आक्रमण करण्यास मुभा दिली.

मुतागुचीच्या व्यूहरचनेनुसार जपानच्या ३१वी डिव्हिजनने कोहिमावर हल्ला करून इंफाळला ब्रिटिश भारतापासून तोडायचे आणि मग खुद्द इंफाळवर हल्ला करीत चौथ्या कोअरला नेस्तनाबूद करीत भारतात घुसायचे ही योजना होती. ५८वी, १२४वी, १३८वी रेजिमेंट आणि ३१वा डोंगरी तोफखाना इतकी शिबंदी घेऊन ३१व्या डिव्हिजनने कोहिमा घेतल्यावर पुढे दिमापूरवर चाल करून जाणे अपेक्षित होते. दिमापूर हातात आल्यास तेथील लोहमार्ग आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यावर ताबा मिळवणे व ब्रिटिशांची रसद तोडणे हा डाव त्यात होता.[]

३१व्या डिव्हिजनचा मुख्याधिकारी लेफ्टनंट जनरल कोतोकू सातो या व्यूहरचनेवर नाखूष होता. या हल्ल्याच्या योजनेत त्याला सुरुवातीपासून सामील केले गेलेले नव्हते आणि त्याच्या मते जपानी सैन्याला कोहिमा पटकन जिंकणे अवघड होते.आपल्या मुख्य सैन्यापासून इतक्या लांबवर चाल करून जाण्यात रसद पुरवठा कायम ठेवणे हे जिकिरीचे काम होते. सातोने आपल्या सहकाऱ्यांजवळ जपानी सैन्याची उपासमार होणार असे भाकीत वर्तवले होते.[] इतर सेनाधिकाऱ्यांप्रमाणे सातोच्या मते मुतागुचीही रिकाम्या डोक्याचा होता.१९३० च्या दशकात जपानी सैन्यात पडलेल्या फुटीदरम्यान सातो आणि मुतागुची परस्परविरुद्ध उभे राहिलेले होते आणि त्यामुळे सातोला मुतागुचीवर किंवा त्याच्या डावपेचांवर विश्वास नव्हता.[]

नांदी

मार्च १५, इ.स. १९४४ रोजी जपानच्या ३१व्या डिव्हीजनने होमालिन गावाजवळ चिंदविन नदी ओलांडली व भारतावरील आक्रमणाला सुरुवात केली.[] अंदाजे शंभर किमी (६०मैल) रुंदीची आघाडी सांभाळत हे सैन्य म्यानमारच्या घनदाट जंगलातून वाटचाल करू लागले. डोंगराळ प्रदेश, नद्या-नाले व गर्द झाडी असलेल्या अवघड वाटेवरही जपानी सैन्य जोमाने कूच करीत होते. डाव्या आघाडीवरील ५८वी रेजिमेंट इतरांच्या पुढे होती. त्यांची गाठ ब्रिटिश भारतीय सैन्याची सर्वप्रथम इंफाळच्या उत्तरेस मार्च २०च्या सुमारास पडली.[१०]

ब्रिगेडियर मॅक्सवेल होप-थॉम्पसनच्या नेतृत्वाखालील ५०व्या भारतीय हवाई छत्री ब्रिगेडने या बलाढ्य सैन्याचा सांग्शाकजवळ प्रतिकार करण्याचा प्रयत्‍न केला.[] मियाझाकीला या ब्रिगेडला बगल देऊन इंफाळवर कूच करणे सहज शक्य होते तसेच वाटेतील ब्रिटिश-भारतीय सैन्याचे पारिपत्य करणे हे त्याचे ध्येयही नव्हते पण नंतर ही ब्याद नको म्हणून त्याने ब्रिटिशांवर हल्ला चढवला. सांग्शाकची लढाई सहा दिवस चालली. यात ब्रिटिशांचे ६०० तर ४०० जपानी सैनिक मृत्युमुखी पडले. ब्रिटिश सैनिकांकडे तुटपुंजेच पाणी होते[११] तर मियाझाकीच्या तोफखान्याकडे अजून दारुगोळा पुरेशा प्रमाणात पोचलेला नव्हता. पाचव्या दिवशी जवळच असलेली जपानची १५वी रेजिमेंट मियाझाकीच्या साहाय्यास धावून आली. हे पाहताच होप-थॉम्पसनने लढाईतून पलायन करण्याचा निर्णय घेतला. त्याला रॉयल एर फोर्सने केलेला रसदपुरवठा जपान्यांच्या हाती लागला आणि त्यांना अधिक बळ लाभले पण या चकमकीमुळे कोहिमाला पोचणारी सगळ्यात पहिली रेजिमेंट आता वेळापत्रकाच्या सात दिवस मागे पडली होती.[१२]

इकडे युनायटेड किंग्डमच्या चौदाव्या सैन्याच्या सेनापती लेफ्टनंट जनरल विल्यम स्लिमला उशिरा का होईना लक्षात आले की जपानी सैन्याची एक संपूर्ण डिव्हिजन कोहिमाकडे चालून येत होती सांग्शाकच्या लढाईत हस्तगत केलेल्या कागदपत्रांवरूनही हेच स्पष्ट झाले.[१३] त्याचा व त्याच्या सहकाऱ्यांचा अंदाज होता की जपानने जरी कोहिमावर हल्ला केला तरी म्यानमारमधील अतिकठीण भूरचनेमुळे जास्तीत जास्त एखादी रेजिमेंट चालून येण्याची शक्यता होती. एका जपानी रेजिमेंटमध्ये अंदाजे २,६०० सैनिक असत तर एका डिव्हिजनमध्ये १२,००० ते २२,००० सैनिक असत.[][१४]

ब्रिटिशांनी आता इंफाळ व आसपासच्या प्रदेशातील शिबंदी बळकट करण्यास घाईघाईने सुरुवात केली. ५व्या भारतीय इन्फंट्री डिव्हिजनला आराकानहून इंफाळला विमानाने पाठवण्यात आले. या डिव्हीजनने आराकानजवळ ॲडमिन बॉक्सच्या लढाईत नुकतीच जपानी सैन्याला धूळ चारली होती. यातील बराचसा भाग इंफाळला गेला. येथे इंडियन फोर्थ कोरचे सगळे राखीव दल तैनात केले गेलेले होते. १६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड आणि २४वा डोंगरी तोफखाना दिमापूरला पाठवण्यात आला.[१५]

दिमापूरला असलेल्या शिबंदीपैकी बहुतांश सैनिक दळणवळण प्रणालीचालक आणि इतर बिगरलढाऊ काम करणारे होते. दिमापूरची तर सगळीच शिबंदी न लढणारी होती. दिमापूरला १८ किमी लांब व २ किमी रुंद अशा आकाराचा महाप्रचंड रसदसाठा होता जो ब्रिटिशांच्या ईशान्य भारतातील संपूर्ण सैन्याला पुरवठा करीत असे. हा साठा जपान्यांच्या हातात पडला असता तर ब्रिटिशांचे बारा वाजण्यात अधिक वेळ उरला नसता. यामुळे स्लिमने आपल्या वरिष्ठ अधिकारी जनरल जॉर्ज गिफार्डला विनंती केली की दिमापूरच्या संरक्षणासाठी टाकोटाक अधिक सैन्य पाठवण्यात यावे तसेच वेढ्यात पडू पाहणाऱ्या इंफाळची सुटका करण्यासाठी सैन्यबळ पाठवण्यात यावे.[१६]

मार्चच्या सुरुवातीस लालाघाटच्या आसपास तळ ठोकून असलेल्या २३व्या ब्रिटिश इन्फंट्री ब्रिगेडला मेजर जनरल ओर्ड विनगेटच्या सरदारकीतून वेगळे काढून लोहमार्गाने दिमापूरच्या उत्तरेस ५० किमी जोरहाट येथे हलवण्यात आले. जर जपान्यांनी दिमापूरवर हल्ला केला तर त्यांच्यावर उलट बाजूने हल्ला करण्यासाठीचा हा डाव होता. या सुमारास युनायटेड किंग्डमची २री इन्फंट्री डिव्हिजन आणि ब्रिटिश भारताची ३३वी कोर ही राखीव दले लेफ्टनंट जनरल स्टॉपफोर्ड मॉंटेग्यूच्या सेनापतीपदाखाली दक्षिण भारतात स्थित होती. गिफार्डने ब्रिटिश भारतीय सैन्याच्या सरसेनापती जनरल क्लॉड ऑचिनलेकच्या संमतीने त्यांना लोहमार्ग आणि रस्त्याने दिमापूरला शक्य तितक्या जलदीने हलवण्याची तयारी सुरू केली.[१७][१८] याशिवाय ७वी इंडियन इन्फंट्री डिव्हिजनही रस्ता तसेच लोहमार्गाने आराकानहून दिमापूरला दाखल झाली.

३३वी कोर दिमापूरला डेरेदाखल होईपर्यंत २०२व्या लाइन ऑफ कम्युनिकेशन एरिया या सैन्यदलाच्या सेनापती मेजर जनरल आर.पी.एल. रॅंकिंगने या प्रदेशाचा ताबा घेतला.[१६][१७]

इकडे दिवसा-तासागणिक जपानी सैन्य कोहिमा आणि इंफाळकडे चाल करीत येतच होते.

लढाई

रणांगण

कोहिमाची लढाई

जपानने १९४४मध्ये आरंभलेल्या चिंदविन आक्रमणाच्या योजनेत कोहिमा हा महत्त्वाचा टप्पा होता. हे शहर म्यानमार आणि भारताला जोडणाऱ्या घाटाच्या माथ्यावर होते. हाच रस्ता दिमापूर, ब्रह्मपुत्रा खोरे आणि इंफाळलाही जोडतो. जो कोहिमा जिंकेल त्याला हा रस्ता आणि पर्यायाने इंफाळसह कोहिमाच्या पूर्वेकडील सगळ्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे सोपे होते. जपान्यांनी हा घाट जिंकल्यावर म्यानमारमधून आपल्या सैन्याच्या धाडीवर धाडी भारतावर सोडणे शक्य झाले असते.[]

कोहिमा रिज ही डोंगरधार उत्तर-दक्षिण आहे.[१९] दिमापूरहून इंफाळला जाणारा रस्ता या डोंगरधारेच्या उत्तर टोकाकडून चढतो आणि वळसा घालून डोंगराच्या पूर्व धारेवरून दक्षिणेकडे जाते. १९४४मधील कोहिमाच्या डेप्युटी कमिशनर चार्ल्स पॉझीचा बंगला या रस्त्यावरील एका वळणावरच होता. तेथे बंगल्याशिवाय वरच्या भागात डोंगरात कोरलेल्या पायऱ्यांवर बगीचे, टेनिस कोर्ट आणि क्लबहाउस होते.[] इतर काही पायऱ्यांवर शेती होत असे आणि डोंगराचा इतर भाग तीव्र उताराचा आणि दाट जंगलाने व्यापलेला होता.[]

डोंगराच्या उत्तरेला दाट वस्तीचे नागा लोकांचे गाव होते. त्याच्या वरच्या बाजूस ट्रेझरी हिल आणि चर्च नोल ही ठिकाणे होती. ही नावे नागालॅंडमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीस धर्मप्रसार करणाऱ्या ख्रिश्चन पाद्र्यांनी दिलेली होती. डोंगराच्या दक्षिणेस जीपीटी रिज ही डोंगरधार आणि पश्चिमेस दाट जंगल असलेला अरादुरा स्पर हा डोंगर आहे. ब्रिटिश आणि भारतीय सैनिकी अधिकाऱ्यांनी या भागातील टेकड्यांना आपल्या सोयीची नावे देउन ठेवली होती, उदा०. फील्ड सप्लाय डेपो असलेल्या टेकडीचे नाव एफएसडी हिल किंवा नुसतेच एफएसडी असे झाले. जपान्यांनी त्या ठिकाणांना आपल्या परीने नावे दिली, उदा गॅरिसन हिलला इनु (कुत्रा) तर कुकी पिकेला सारु (माकड).[२०] पैकी ब्रिटिशांनी दिलेली बरीचशी नावे युद्धानंतरही टिकून राहिली.

वेढा

कोहिमामध्ये त्यावेळी असलेल्या शिबंदीपैकी फक्त नव्यानेच उभारलेल्या आसाम रेजिमेंटचे सैनिक व असम रायफल्स या निमलश्करी दलाच्या तिसऱ्या बटालियनचे सैनिक हेच फक्त लढाऊ होते.[] मार्चच्या शेवटी १६१वी ब्रिगेड तेथे दाखल झाली परंतु काही दिवसांतच मेजर जनरल रॅंकिंगने तिला परत दिमापूरला पाठवले. कोहिमा पडले तरी चालेल पण काही केल्या दिमापूर जपान्यांच्या हाती लागू द्यायचे नाही ही योजना त्यास कारणीभूत होती.[१६] लेफ्टनंट जनरल स्लिमचा अंदाज होता की चालून येणाऱ्या सैन्यापैकी एखादी रेजिमेंट कोहिमावर हल्ला करेल तर उरलेली ३१वी डिव्हिजन सर्वशक्तिनिशी दिमापूरवर तुटून पडेल.[२१]

एप्रिल १ रोजी ३१व्या डिव्हिजनची उजवी आणि मधली फळी कोहिमाच्या पूर्वेस ३० किमीवर असलेल्या जेसामी गावाजवळ येउन ठेपली. आसाम रेजिमेंटने पुढे होऊन त्यांच्या मार्गात कडमड करीत त्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला पण तुलनेने प्रचंड अशा जपानी दलांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि आसाम रेजिमेंटला माघार घेण्याचे हुकूम देण्यात आले. एप्रिल ३च्या रात्री मियाझाकीचे सैन्य कोहिमा रिजजवळील नागा गावात आले आणि त्यांनी दक्षिणेकडून कोहिमावर तुरळक हल्लेही सुरू केले.[२२]

३ एप्रिललाच लेफ्टनंट जनरल मॉंटेग्यू स्टॉपफोर्डने मेजर जनरल रॅंकिंगकडून रणांगणाचा ताबा घेतला.[२१] एप्रिल ४ला स्टॉपफोर्डने १६१व्या ब्रिगेडपैकी एक बटालियनला कोहिमाला येण्यास फर्मावले. जपान्यांनी घाटाच्या पश्चिमेस येउन रस्ता रोखण्याआधी द क्वीन्स ओन रॉयल वेस्ट केंट रेजिमेंट कोहिमात दाखल झाली. याशिवाय नेपाळी सैन्याची एक नवखी रेजिमेंट (शेरे रेजिमेंट), बर्मा रेजिमेंटच्या काही तुकड्या आणि माघार घेतलेल्या आसाम रेजिमेंटमधील उरलेले काही सैनिक तसेच संदेशवाहक आणि जखमी सैनिक ही कोहिमाची शिबंदी होती. या सुमारे २,५०० सैनिकांपैकी १,००० सैनिकांना लढाईचे जास्त प्रशिक्षण नव्हते. यांचा सेनापती होता चिंदित ब्रिगेडचा कर्नल ह्यू रिचर्डस.[२३]

एप्रिल ६ला जपान्यांनी कोहिमाच्या पूर्व आणि पश्चिमेस रस्त्याचा ताबा मिळवला आणि कोहिमाचा उरलेल्या जगाशी संपर्क तुटला. जपान्यांच्या तोफांनी अविरत हल्ले सुरू ठेवले. स्वतः आणलेली शस्त्रास्त्रे तसेच सांग्शाक आणि इतर रसदसाठ्यांतून काबीज केलेली ब्रिटिश शस्त्रास्त्रेही त्यांनी वापरली. वेढा हळूहळू आवळत गेला आणि बरेचसे ब्रिटिश सैन्य आता गॅरिसन हिलवर बंदिस्त झाले. १६१वी ब्रिगेड तेथून २ किमी अंतरावर जोत्सोमा येथे अडकली होती आणि त्यांनी जपान्यांवर प्रतिहल्ले सुरू ठेवले पण सांग्शाकप्रमाणेच आताही ब्रिटिश सैन्याकडे पिण्याच्या पाण्याची वानवा होती. जीपीटी रिजवर मुबलक पाणी होते पण वेढ्याच्या पहिल्याच दिवशी ती टेकडी जपान्यांच्या हातात पडली होती. तेथील लढाईत हार नक्की दिसल्यावर तेथील सैनिकांना गॅरिसन हिलकडेही येता आले नाही व त्यांना दिमापूरकडे पळ काढावा लागला. एफएसडी आणि इंडियन जनरल हॉस्पिटल येथील पाण्याच्या टाक्या आगीपासून बचाव व्हावा म्हणून रिकाम्याच ठेवण्यात आल्या होत्या. ब्रिटिशांच्या सुदैवाने गॅरिसन हिलच्या उत्तरेस एक झरा सापडला पण जपानी सैन्याच्या दृष्टिपथात असल्याने तेथून फक्त रात्रीतच पाणी आणता येत असे.[२४] जखमी सैनिकांची शुश्रुषा करण्यासाठीचे तात्पुरते दवाखानेही उघड्यावरच होते आणि अनेक जखमी सैनिक परत जपानी तोफगोळ्यांच्या तोंडी पडले.

कोहिमा रिजच्या उत्तर भागात असलेल्या डेप्युटी कमिशनरच्या बंगल्याच्या शिवारात तसेच तेथील टेनिस मैदानाच्या आसपास घनघोर लढाई झाली. खुद्द टेनिस मैदान निर्मनुष्य राहिले पण दोन्ही बाजूंनी शत्रूपक्ष दबा धरून होते व संधी मिळताच एकमेकांव कडवे हल्ले चढवीत होते. हाताने ग्रेनेड फेकून मारण्याइतके जवळ असलेले सैनिक दिवसचे दिवस येथे लढले. शेवटी एप्रिल १७च्या रात्री जपान्यांनी हा भाग जिंकला. त्याच सुमारास कुकी पिकेही पडले. आता तर ब्रिटिश शिबंदीचे दोन भाग झाले आणि त्यांची परिस्थिती हातातोंडाशी आली.[२५] परंतु जपान्यांनी त्यांना नेस्तनाबूद करण्यासाठी पुन्हा हल्ला चढवला नाही आणि पहाट उजाडताच १६१वी ब्रिगेड जोत्सोमाहून त्यांच्या मदतीस धावली व दोन भागांच्या मधून त्यांनी जपान्यांना हुसकून लावले.[२६]

सुटका

कोहिमाच्या लढाईत रस्ता मोकळा करून पुढे सरकणारी गोरखा रेजिमेंट

एप्रिलच्या सुरुवातीस मेजर जनरल जॉन एम.एल. ग्रोव्हरच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश २री डिव्हिजन दिमापूरला दाखल होण्यास सुरुवात झाली होती. ११ एप्रिलच्या सुमारास ब्रिटिश आणि जपानी सैन्य सैनिकसंख्येच्या दृष्टिने तुल्यबळ झाले. ५व्या इन्फंट्री ब्रिगेडने लगेचच जोत्सोमाकडे कूच केली व जपान्यांनी रचलेले अडथळे मोडून काढीत एप्रिल १८ रोजी १६१व्या ब्रिगेडशी संधान साधले. १६१व्या ब्रिगेडची बचावात्मक फळीवर (जोत्सोमा बॉक्स) आता ५व्या ब्रिगेडचे सैनिक रूजू झाले आणि १६१वी ब्रिगेड रॉयल एर फोर्स, तोफखाना तसेच चिलखती गाड्या घेउन कोहिमाकडे चालून निघाली. पूर्ण दिवस घनघोर लढाईनंतर पहिल्या पंजाब रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनचे आघाडीचे सैनिक जपानी फळी मोडून कोहिमात शिरले आणि तेथील शिबंदीस आधार मिळाला.[२७] तोपर्यंत कोहिमा शहरात उद्ध्वस्त झालेले रस्ते, पडलेली झाडे आणि मोडलेल्या इमारतींचा खच पडलेला होता.

आता पहिले लक्ष्य होते ते जखमींना सुरक्षित स्थळी हलविण्याचे. रात्री अंधाराचा फायदा घेत शत्रूच्या माऱ्यातून वाट काढीत ब्रिटिश सैन्याने आपले ३०० जखमी दिमापूरकडे नेले. पुढील २४ तासाच्या लढाईनंतर जोत्सोमा आणि कोहिमामधील रस्त्यावर पुन्हा एकदा ब्रिटिशांनी वर्चस्व मिळवले. १९-२० एप्रिलला ब्रिटिश ६व्या ब्रिगेडने मूळ शिबंदीची जागा घेतली आणि त्यांना दिमापूरकडे वाट करून दिली. २० एप्रिलला सकाळी ६ वाजता कर्नल रिचर्ड्सने कोहिमाचा ताबा आपल्याच सैन्याच्या ६व्या ब्रिगेडकडे दिला.[२८]

मियाझाकीने त्यानंतर गॅरिसन हिल मिळवण्यासाठी पुढील अनेक दिवस व रात्री प्रयत्न चालू ठेवले. यात दोन्ही पक्षांची मोठी हानी होत राहिली. एकमेकांसमोर ५० मीटर अंतरावर ठाण मांडून बसलेल्या या सैनिकांमध्ये हातघाईची लढाई होत होती.[२९] त्याच वेळी गॅरिसन हिलच्या दुसऱ्या बाजूला २६ एप्रिलच्या रात्री ब्रिटिश सैन्याने डेप्युटी कमिशनरचा बंगला आणि क्लबहाउसचा ताबा मिळवला आणि जवळजवळ सगळे जपानी सैन्य त्यांच्या माऱ्यात आले.[३०]

प्रतिहल्ला

कोहिमा रिजवर हल्ला चढवण्यासाठी ब्रिटिश सैन्य दिमापूरहून ३८ ३.७ इंची डोंगरी उखळी तोफा, ४८ २५ पौंडी तोफा आणि दोन ५.५ इंची मध्यम तोफा घेउन आले होते.[३१] याशिवाय रॉयल एर फोर्सनेही जपान्यांवर बॉम्ब व गोळ्यांचा वर्षाव केला होता. याउलट जपान्यांकडे फक्त १७ हलक्या डोंगरी तोफा होत्या आणि त्याता वापरला जाणारा दारुगोळाही आता संपत आलेला होता.[३२] तरीही त्यांनी ब्रिटिशांना रोखून धरलेले होते. ब्रिटिशांना रणगाडे आणता येत न्वहते आणि जपान्यांनी आपल्या फळ्या मजबूत करून ठेवलेल्या होत्या. त्यांचे खंदक चटकन न दिसणारे होते आणि एकमेकांस पूरक होतील अशा प्रकारे खोदण्यात आलेले होते. त्यांनी डावीकडे मियाझाकीच्या नेतृत्वाखाली चार बटालियन[३३] , मुख्यालय सातोकडे आणि मधली फळी कर्नल शिरैशी कडे चार बटालियन असे बळ विभागून ठेवले होते. उजव्या फळीत फारसे सैनिक नव्हते आणि ते उत्तर आणि पूर्वेकडील पाड्यांतून पसरलेले होते.[३३]

६वी ब्रिटिश ब्रिगेड गॅरिसन हिलवर अडकून पडलेली असताना २ऱ्या डिव्हिजनच्या दोन ब्रिगेडांनी जपान्यांच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करण्याचा बेत रचला. उत्तरेस नागा गाव आणि दक्षिणेस जीपीटी रिजमध्ये असलेल्या जपान्यांना वळसा घालून हा हल्ला केला जाणार होता. पण आता मॉन्सून पूर्ण भरात सुरू झालेला होता आणि तुफान पावसाने डोंगरांवर चिखलाचे थर तयार झालेले होते. यात हालचाली करणे किंवा पुढे गेलेल्या पथकांना रसद पुरवणे कर्मकठीण झाले होते. ४ मे रोजी ५वी ब्रिगेड नागा गावात घुसली पण जपानी सैनिकांनी कडवा प्रतिहल्ला चढवून त्यांना तेथून पळवून लावले.[३४] त्याच वेळी ४थ्या ब्रिगेडने जीपीटी रिजवर हल्ला करून तेथे चंचूप्रवेश केला.[३५] यानंतरच्या हातघाईच्या लढाईत ४थ्या ब्रिगेडचा नेता मारला गेला. तेव्हा नेतृत्व घेतलेला पुढचा अधिकारीही काही तासांतच मृत्यू पावला.[३६]

दोन्ही बाजूंनी चढवलेले हल्ले फसल्यावर २ऱ्या डिव्हीजनने आता कोहिमा रिजवर उघडउघड हल्ला चढवला. जेल हिलकडून चालून जाणाऱ्या ब्रिटिश सैनिकांवर जीपीटी रिजवर असलेल्या जपानी सैनिकांनी तुफान मारा केला. मोठी जीवितहानी झाल्याने त्या बाजूने आठवडाभर काहीही वाटचाल झाली नाही पण इतर वाटांनी चढणाऱ्या ब्रिटिशांनी हळूहळू जपान्यांना मागे रेटले. ३३व्या इंडियन इन्फंट्री ब्रिगेडने मे ११ रोजी जेल हिलवर निकराचा हल्ला चढवला. धूर, आवाज आणि लखलखाट होणारे बॉम्ब फेकून जपान्यांची दिशाभूल केल्यावर ३३व्या ब्रिगेडचे पंजाबी सैनिकांनी जेल हिलवर कडाडून हल्ला चढवला आणि तेथील जपानी सैनिकांचा नायनाट करून ती टेकडी घेतली.[३७]

आता कोहिमा रिजवर फक्त डेप्युटी कमिशनरच्या बंगल्याच्या आसपासचे जपानी सैनिक शिल्लक राहिले होते. ब्रिटिश सैन्याने त्यांच्यावर अनेक झडपा घालून पाहिल्या पण त्यांना जपान्यांनी दाद दिली नाही. शेवटी ब्रिटिशांनी त्यांच्या समोर मोठा रस्ता खणला आणि तेथे एक एम३ ली रणगाडा आणून ठेवला. रणगाड्याच्या भयानक माऱ्याने जपानी खंदक आणि बंकर मोडून पडले आण त्यांनी नांगी टाकली. डॉर्सेटशायर रेजिमेंटने बंगल्याच्या भग्नावशेषातून उरलासुरला प्रतिकार मोडून काढला आणि कोहिमा रिजवर संपूर्ण वर्चस्व मिळवले.[३८] अनेक आठवडे चाललेल्या या लढाईत बंगला आणि आसपासचा भाग अतिशय गलिच्छ झालेला होता. उंदीर, माश्या, मच्छर यांचा बजबजाट, अर्धी पुरलेली मानवी प्रेते आणि चिखलातूनच जपानी लढत होते.

या सुमारास ब्रिटिशांची अधिकाधिक कुमक येउन पोचण्यास सुरुवात झाली.[३९] ७व्या इंडियन इन्फंट्री डिव्हिजनच्या तुकड्या रस्ता आणि लोहमार्गे आराकानहून दिमापूर आणि पुढे कोहिमाकडे येऊ लागल्या होत्या. ३३व्या कोरने ३३व्या इंडियन ब्रिगेडला राखीव दलातून काढून ४ मेलाच लढाईत उतरवले होते.[३६] ११४वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड आणि डिव्हीजनचे मुख्यालय १२ मे रोजी कोहिमाजवळ येउन पोचले. याशिवाय २६८व्या इंडियन इन्फंट्री ब्रिगेडने थोड्या काळासाठी २ऱ्या डिव्हिजनची सुटका केली. २ऱ्या डिव्हिजनला थोडा आराम मिळाल्यावर २६८वी ब्रिगेडने दक्षिणेकडे इंफाळच्या दिशेने कूच केली. सैन्यबळाचे पारडे फिरलेले असतानाही जपान्यांनी नागा गावातून आणि अरादुरा डोंगरावरून प्रतिकार चालूच ठेवला.[४०]

जपानी माघार

मे १५च्या सुमारास सातोच्या सैन्याची उपासमार होऊ लागली. त्यांनी आक्रमण सुरू करताना फक्त तीन आठवडे पुरेल इतकीच रसद घेतलेली होती.[३२] हा साठा संपल्यावर त्यांना ब्रिटिशांकडून काबीज केलेली रसद आणि आसपासच्या गावातून लुटलेले सामान यांच्यावर भागवणे जरुरी झाले. सुरुवातीस निष्पक्ष वाटणारे स्थानिक रहिवाशी आता जपान्यांविरुद्ध उलटले. यात भर म्हणून ब्रिटिशांची २३वी एलआरपी ब्रिगेड जपान्यांच्या मागे जाउन त्यांची रसद तोडण्याची कामे करीत होती. जपान्यांनी चिंदविनहून रसद आणण्यासाठी दोन पथके पाठवली. पकडलेल्या जीपगाड्या घेउन अन्नसामग्री आणण्याऐवजी ही दोन्ही पथके तोफगोळे आणि रणगाडाविरोधी दारुगोळाच घेउन आली.[३२]

मे २५ला सातोने मुतागाचीला संदेश पाठविला की जून १पर्यंत त्याने सातोला रसद पाठवली नाही तर त्याला माघार घेणे भाग पडणार होते.[४१] मुतागाचीने त्याला कोहिमा घेउन झाल्यावर इंफाळ घेण्यासाठी चाल करून जाण्याचा उलट संदेश पाठविला. हे ऐकून सातो संतापला. त्याचा ग्रह झाला की मुतागाची आणि पंधरावे सैन्य त्याच्या कठीण परिस्थितीची दखल न घेता आपल्याच धुंदीत हुकुम सोडीत होते.[४२][४३] त्याने आपल्या सैनिकांचे अधिक बळी जाऊ नये म्हणून हळूहळू माघार घेण्यास सुरुवात केली. याने ब्रिटिशांचे चांगलेच फावले. मुतागाचीने असल्या ठिकाणी लढण्याचे आदेश दिलेले असतानाही मे ३१ला सातोने नागांचे गाव सोडले आणि परत चिंदविनची वाट धरली. जपानी सैन्यात असे वरिष्ठ अधिकाऱ्याचा थेट आदेश धुडकावून लावणे म्हणजे मोठी धारिष्ट्याचे काम होते.[१६]

मियाझाकी आपले पथक घेउन पिछाडी सांभाळत होता. त्याने माघार घेताना रस्त्यातील पूल उद्ध्वस्त केले ज्याने ब्रिटिशांना त्यांचा पाठलाग करणे अवघड होईल. पण ब्रिटिश सैन्याने त्याचा पिच्छा पुरवला आणि त्याला पूर्वेस पिटाळून लावले. ३१व्या डिव्हिजनची उरलीसुरली पथके धडपडत दक्षिणेकडे पळाली पण तेथेही त्यांना रसद मिळाली नाही. जे काही खाणेपिणे चिंदविनहून आणले होते तेही इतर जपानी पथकांनी कधीच फस्त केलेले होते.[४४] सांग्शाकच्या लढाईतील उरलीसुरली रसद मिळेल या आशेने तिकडे निघालेल्या ३१व्या डिव्हिजनला उख्रुलच्या पुढे जाणेही अशक्य झाले. उख्रुलला दवाखाने उभारलेले होते पण तेथे नव्हते डॉक्टर,ना औषधे किंवा खाणे. सातो तेथून ज्यांना पुढे जाणे शक्य होते अशा सैनिकांना घेउन ३० किमी दक्षिणेस हुमाइनकडे निघाला पण तेथेही तीच परिस्थिती होती.[४५] ३३वी इंडियन कोर त्यांच्या मागावर होतीच.

२री डिव्हिजन इंफाळकडे निघाली तर ७वी इंडियन डिव्हिजन रस्त्याच्या पूर्वेकडून त्यांना संरक्षण देत होती. खेचरे आणि जीपगाड्यांतून रसद भरून निघालेली ही कुमक २२ जून रोजी इंफाळकडून उत्तरेस निघालेल्या ५व्या इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला कोहिमाच्या दक्षिणेस २० किमीवर मैलदगड १०९ येथे येउन मिळाली. इंफाळचा वेढा फुटलेला होता आणि टाकोटाक ब्रिटिशांनी मोठाले ट्रक भरून रसद इंफाळकडे रवाना केली.

कोहिमाच्या लढाईत ब्रिटिश आणि भारतीय सैन्याचे ४,०६४ सैनिक मृत्यू पावले, हरवले किंवा गंभीर जखमी झाले.[] जपानकडीलही संख्या ५,७६४ होती. याशिवाय माघार घेणाऱ्या ३१व्या जपानी डिव्हिजनमधील असंख्य सैनिक रोगराई आणि उपासमारीस बळी पडले.

परिणती

सातो पुढे अनेक आठवडे मुख्यालयाकडून आलेले आदेश धुडकावित राहिला. शेवटी जुलैच्या सुरुवातीस त्याला ३१व्या डिव्हिजनच्या सेनापतीपदावरून बरखास्त करण्यात आले. याचवेळी उ-गो मोहीमही बंद करण्यात आली. ब्रिटिश सेनापतींच्या मते सातो हा कमकुवत सेनानी असल्यामुळे त्याला हार पत्करावी लागली. जनरल स्लिमच्या मते सातो अगदी निरुपद्रवी शत्रु होता. त्याने रॉयल एर फोर्सला सातोवर बॉम्बहल्ले न करण्याची विनंती केली होती कारण त्याच्या मते सातो जिवंत राहण्यातच ब्रिटिशांचा फायदा होता.[४६] उलटपक्षी जपानी इतिहासकार या पराजयाचे कारण मुतागाचीच्या योजनेतील क्षती आणि सातो व मुतागाचीमधील अमित्रत्त्व समजतात.[४७] लढाईनंतर जपानी सैन्याने सातोला सेप्पुकु करण्याचे आवाहन केले पण सातोने ते फेटाळले व स्वतःवर सैनिकी खटला चालवण्याचे आव्हान दिले. त्याला याजोगे आपल्यावरील आळ दूर करायचा होता तसेच जपानच्या पंधराव्या सेनेविरुद्धचे व मुतागाचीविरुद्धचे आपले आरोप जगजाहिर करायचे होते. परंतु मुतागाचीच्या वरिष्ठ अधिकारी, लेफ्टनंट जनरल मासाकाझु कावाबे याच्या सांगण्यावरून बर्मा प्रदेशातील जपानी सैन्याच्या डॉक्टरांनी जाहीर केले की सातोला मानसिक आजार झाला आहे व त्यामुळे त्याच्यावर खटला चालवणे योग्य नाही. अशाप्रकारे त्यांनी आपल्या सैन्यावरील उघड होऊ पाहणारे आरोप टाळले.[४८]

या युद्धात हजारो जपानी सैनिक मारले गेले इतर शेकडो सैनिक रोगराई आणि उपासमारीचे बळी ठरले. यामुळे कमकुवत झालेले जपानी सैन्याला १९४५मधील ब्रिटिश आक्रमणाचा कणखर सामना करता आला नाही.

व्हिक्टोरिया क्रॉस

कोहिमाच्या लढाईमध्ये लढणाऱ्या सैनिकांपैकी दोघांना व्हिक्टोरिया क्रॉस हा युनायटेड किंग्डमचा सर्वोच्च युद्धकालीन बहुमान प्रदान करण्यात आला.

  • लान्स कॉर्पोरल जॉन पेनिंग्टन हर्मन,[४९][५०] ४थी बटालियन, द क्वीन्स ओन रॉयल वेस्ट केंट रेजिमेंट, १६१वी इंडियन इन्फंट्री ब्रिगेड, इंडियन ५वी इन्फंट्री डिव्हिजन
  • ब्रेव्हेट कॅप्टन जॉन नील रॅंडल,[५१] २री बटालियन, द रॉयल नॉरफोक रेजिमेंट, ब्रिटिश २री इन्फंट्री डिव्हिजन

स्मारक

कोहिमाच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय व ब्रिटिश सैनिकांचे स्मारक कोहिमातच उभारण्यात आले. याची देखभाल कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन (CWGC) करते. गॅरिसन हिलच्या उतारावरील पूर्वीच्या डेप्युटी कमिशनरच्या बंगल्यातील टेनिस मैदानावर हे स्मारक आहे.[५२] या स्मारकावर कोरलेले स्मृतिवाक्य नंतर जगभर कोहिमा स्मृतीलेख नावाने प्रसिद्ध झाले.

“व्हेन यू गो होम, टेल देम ऑफ अस अँड से,
फॉर युअर टुमॉरॉ, वी गेव अवर टुडे.”

पराजित आणि अपमानित जपानी सेनापती कोतोकु सातोने युद्ध संपल्यावर कोहिमाइंफाळ येथे पडलेल्या जपानी सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मात्सुयामा, एहिमे आणि शोनाइ, यामागाता येथे स्मारके उभारली.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ a b c d e f Allen, p.228
  2. ^ a b c Allen, p.643
  3. ^ Dougherty, Martin J. Land Warfare. Thunder Bay Press. p. 159.
  4. ^ Dennis, Peter; Lyman, Robert (2010). Kohima 1944: The Battle That Saved India. Osprey.
  5. ^ Allen, pp. 154–155
  6. ^ Allen, p.285
  7. ^ Allen, p.232
  8. ^ Allen, pp.284–285
  9. ^ a b Allen p. 189.
  10. ^ Allen, p.213
  11. ^ Allen, p.216
  12. ^ ॲलन, पृ. २१२-२२०
  13. ^ Allen, p.220
  14. ^ Slim, p.299
  15. ^ Allen, pp. 229–230
  16. ^ a b c d Allen p. 229.
  17. ^ a b Slim, pp.300–301
  18. ^ "The Battle of Kohima, North-East India, 4 April – 22 June 1944" (PDF). Ministry of Defence (UK). 2004. pp. 2–3. 2008-03-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 August 2009 रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादित title= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  19. ^ ॲलनच्या पुस्तकातील नकाशा, पृ. २३१
  20. ^ Allen, p.267.
  21. ^ a b Slim, p.306
  22. ^ Allen, p.230
  23. ^ Allen, p. 227
  24. ^ Allen, p.235
  25. ^ Allen, p.237
  26. ^ Allen, pp. 237–238
  27. ^ Slim, pp.316–317
  28. ^ Slim, p.317
  29. ^ Allen, pp.267–269
  30. ^ Slim, p.314
  31. ^ Allen, p.272
  32. ^ a b c Allen, p.286
  33. ^ a b Allen, p.270
  34. ^ Slim, p.315
  35. ^ Allen, p.273-274
  36. ^ a b Allen, p.274
  37. ^ Slim, p.316
  38. ^ Allen, pp.272–273
  39. ^ Allen p. 275.
  40. ^ Allen, pp.274–275
  41. ^ Allen, p.288
  42. ^ Allen, p.287
  43. ^ Allen, pp.287–293
  44. ^ Allen, p.290
  45. ^ Allen, pp.290-292
  46. ^ Slim, p.311
  47. ^ Allen, pp.285-287
  48. ^ Allen, pp.308-309
  49. ^ Allen pp. 235–236.
  50. ^ "क्र. 36574". द लंडन गॅझेट (invalid |supp= (help)). 20 June 1944.
  51. ^ "क्र. 36833". द लंडन गॅझेट (invalid |supp= (help)). 8 December 1944.
  52. ^ "The Battle of Kohima, North-East India, 4 April – 22 June 1944" (PDF). Ministry of Defence (UK). 2004. p. 17. 2008-03-12 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 August 2009 रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)