केशव शिवराम भवाळकर
केशव शिवराम भवाळकर (२७ मे, १८३१ - २८ नोव्हेंबर, १९०२) हे मराठी आत्मचरित्रकार, निबंधलेखक व समाजसुधारक होते.
भवाळकरांचे प्राथमिक शिक्षण जुन्या पद्धतीने पंतोजींच्या शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईच्या नॉर्मल स्कूलमध्ये दाखल झाले. शिक्षण संपल्यावर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे रेव्हेन्यू खात्यात नायब तहसीलदार ते असिस्टंट कमिशनरच्या हुद्द्यापर्यंत ते पोहोचले. सरकारी नोकरीचा व्याप सांभाळून भवाळकरांनी लेखन करून मराठी साहित्याची सेवा केली.
वऱ्हाडी भाषेचे व्याकरण विशेष व गोंड लोक व गोंड भाषा असे दोन निबंध भवाळकरांनी लिहिले; कृष्णशास्त्री चिपळूणकर, भाऊ महाजन यांच्यावर छोटे चरित्रात्मक लेख त्यांनी लिहिले. त्यांचे सर्वात मोठे साहित्यिक योगदान म्हणजे, त्यांनी १८६० पर्यंतचे आपले आत्मवृत्त लिहिले. ते 'केशव शिवराम भवाळकर यांचे आत्मचरित्र' या नावाने १८६१ साली भ.श्री. पंडित यांनी संपादित करून प्रसिद्ध केले. या आत्मचरित्राचे वैशिष्ट्य म्हणजे, त्या काळातील कित्येक महत्त्वाच्या व्यक्ती- बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी ज्योतिबा फुले आदींविषयी बरीच नव्याने माहिती त्यात आढळते. लेखकाला ह्या व्यक्ती समकालीन असल्याने ऐतिहासिक माहिती विश्वसनीय आहे.
भवाळकरांच्या आत्मचरित्रात त्यावेळची सामाजिक परिस्थिती, स्वतः ब्राह्मण असल्याने त्या वेळेचा तो कर्मठपणा, कौटुंबिक नात्यातले ताणतणाव, तसेच तत्कालीन शिक्षण व शिक्षण पद्धती, त्यांना शिक्षण घेताना आलेल्या अडचणी या सर्वांचे हृदयद्रावक वर्णन त्यांनी केले आहे. समाजाचा इतिहास व एक वाङ्मय प्रकार या दोन्हीने हे आत्मवृत्त वैशिष्ट्यपूर्ण व स्मरणीय झाले आहे.
महात्मा फुल्यांच्या सामाजिक सुधारणेतही ते सहभागी होते.