केशवराव कोरटकर
केशवराव कोरटकर | |
---|---|
जन्म | इ.स. १८६७ वसमत, परभणी जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू | २१ मे, इ.स. १९३२ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
केशवराव कोरटकर (इ.स. १८६७:वसमत, परभणी जिल्हा, महाराष्ट्र - २१ मे, इ.स. १९३२) हैदराबाद संस्थानचे मुख्य नायाधीश होते.
वैयक्तिक
केशवरावांचा जन्म १८६७ साली पूरजळ, ता. वसमत, परभणी येथे झाला. घरची गरिबी असल्याने केशवरावांचे वडील संतुकराव यांनी केशवरावांना वयाच्या नवव्या वर्षी आपल्या मोठ्या मुलीच्या घरी गुलबर्ग्याला पाठवले. केशवरावांनी जेमतेम प्राथमिक शिक्षण घेऊन नोकरी पत्करली. पुढे केशवरावांनी स्वकष्टाने १८९० साली वकिलीची परीक्षा पूर्ण केली. त्यानंतर काही वर्षे गुलबर्ग्यात सत्र न्यायालयात वकिली केल्यानंतर १८९६ साली केशवरावांनी हैद्राबादेस स्थलांतर केले. पुढे पंचवीस वर्षे हैदराबाद हायकोर्टात वकिली करून केशवराव एक कर्तबगार वकील म्हणून नावाजले गेले. केशवरावांच्या गुणांना पारखून निजाम सरकारने १९२३ साली केशवरावांना न्यायमूर्तीपदी नियुक्त केले. पुढील पाच वर्षे केशवरावांनी न्यायमूर्तींच्या उच्चपदी काम केले. केशवरावांचा विवाह गीताबाईंशी झाला. दाम्पत्यापोटी तीन मुले आणि एक मुलगी जन्माला आली. तिन्ही मुलांनी विलायतेत उच्च शिक्षण घेऊन यशस्वी व्यावसायिक वाटचाल केली.
सामाजिक कार्य
केशवरावांचे दोन दशकाहून अधिक काळ आर्यसमाज संघटनेशी घनिष्ट संबंध होते. त्यांच्या अंतापर्यंत केशवराव हैद्राबाद आर्यसमाजाचे अध्यक्ष होते. हैदराबाद सामाजिक सुधारणा संघाच्या स्थापनेत केशवरावांचा मोठा सहभाग होता. ते संस्थेचे प्रथम अध्यक्ष होते. केशवरावांच्या प्रयत्नाने हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकांच्या सोयीसाठी २५ ऑक्टोबर १९०७ रोजी विवेक वर्धिनी पाठशाळेची स्थापना करण्यात आली. केशवराव संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. त्याच सुमारास केशवरावांचे मित्र श्री विठ्ठलराव देऊळगावकर यांनी गुलबर्गा येथे नूतन विद्यालयाची स्थापना केली. शाळेच्या स्थापनेत केशवरावांचा सक्रिय सहभाग होता. १९१८ साली हैदराबादमध्ये इन्फ्लूएंझाचा सामना करण्यासाठी “सोशल सर्व्हिस लीग” सुरू करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या निस्वार्थ कार्यासाठी हैद्राबाद सरकारने त्यांचा विशेष गौरव केला. श्री लक्ष्मणराव फाटक यांनी १९२० मध्ये सुरू केलेल्या “निजाम विजय” या मराठी वृत्तपत्राला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला. बळवंत गणेश खापर्डे यांनी १९२३ मध्ये सुरू केलेल्या “विदर्भ साहित्य संघ” याचे पहिले अध्यक्ष म्हणून केशवरावांची निवड झाली.