केचक नृत्य
केचक नृत्य हे आग्नेय आशियातील, इंडोनेशिया देशातील प्रसिद्ध नृत्य आणि सांगीतिक नाट्य आहे. बालीमधील हिंदू नृत्य प्रकार म्हणून केचक नृत्य-नाट्य ओळखले जाते.[१] यालाच "तारी केचक" असेही म्हणतात. मंकी डान्स किंवा वानर नृत्य अशीही या नृत्याची ओळख आहे.[२]
उगम
पुरुषप्रधान असलेल्या या नृत्य-नाट्य प्रकाराची सुरुवात बालीमध्ये १९३० साली झाली. इ.स.२००६ पासून या नृत्यात महिलाही सहभाग घेऊ लागल्या आहेत.देनपसारपासून जवळ असलेल्या बेडुलू गावात या नृत्याचा जन्म झाला असे मानले जाते.[३]
विषयवस्तू
बृहत्तर भारतात भारतातील हिंदू धर्म आणि संस्कृतीचा प्रसार झाला.आशियातील कंबोज म्हणजे कंबोडिया, इंडोनेशिया अशा देशांमध्येही भारतीय संस्कृती रुजली आहे. केचक नृत्याचे अधिष्ठान असलेले रामायण हे याचेच प्रतीक आहे. हिंदू धर्म आणि संस्कृतीमधील प्रसिद्ध असे रामायण हे या नृत्याचा मुख्य विषय आहे.[४] बालीमधील छोट्या गावांमध्ये आणि मंदिरांमध्ये केचक नृत्य प्रकाराचे सादरीकरण केले जाते.[५]
स्वरूप
श्रीरामाला रावण वधासाठी मदत करणारी वानरे आणि हनुमान अशी पात्रे या नृत्यात सामान्यतः असतात.नर्तकांपैकी काही पुरुष हे रामाच्या सैन्यातील पात्रे असतात तर काही रावणाच्या सैन्यातील पात्रे म्हणून काम करतात. केचक हे नृत्य सुमारे १५० पुरुष गोलाकार स्थितीत उभे राहून सादर करतात.शरीराचा वरील भाग उघडा ठेवून कमरेपाशी पट्ट्या असलेला पोशाख यावेळी घातला जातो. चक चक केचक अशा प्रकारचा आवाज तोंडाने काढीत, युद्ध केल्याप्रमाणे हात आणि पायांच्या वेगवान हालचाली करीत हे नृत्य सादर केले जाते.[६] बालीचे वैशिष्ट्य असलेला नारळाचा दिवा मध्यभागी ठेवला जातो. प्रथम या दिव्याची पूजा केली जाते. सर्व कलाकारांच्या अंगावर अभिमंत्रित पाणी शिंपडले जाते.[७] दिव्याभोवती गोलाकार उभे राहत आधी डावीकडे आणि मग उजवीकडे सावकाश तोंडाने आवाज करीत नृत्याला सुरुवात केली जाते. सामान्यपणे एका तासाच्या कालावधीत राम आणि सीतेचा वनवास,कांचनमृगाचा पाठलाग, रावणाने सीतेला पळविणे, रावणाकडून जटायूचा मृत्यू, हनुमानाने घेतलेला सीतेचा शोध, आणि शेवटी राम-रावण युद्ध अशी कथावस्तू या नृत्यातून सादर केली जाते[८]. या सर्व गटाचे नियंत्रण करणे, नृत्यातील विविध पूरक आवाज काढणे, गटातील नर्तकांना हलचालींच्या सूचना देणे अशा कामांसाठी स्वतंत्र व्यक्ती नेमल्या जातात. सूत्रधार म्हणून काम करणारी व्यक्ती नृत्य सुरू असतानाच संस्कृत आणि स्थानिक बाली भाषेत नृत्य नाट्याची कथा निवेदन करीत असते. सहसा ही मंडळी वरिष्ठ अनुभवी सदस्य असतात. राम, सीता, लक्ष्मण, हनुमान या पात्रांना या नृत्यात महत्त्वाचे स्थान आहे.
वैशिष्ट्य
बालीमधील प्रसिद्ध संघ्यांग नृत्यप्रकाराशी केचकचे साधर्म्य मानले जाते. या नृत्यप्रकारांमध्ये नर्तक कलाकाराच्या अंगी वैश्विक आत्मिक ऊर्जा कार्यरत असल्याची अनुभूती येते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.माणसाला समाधी अवस्थेचा अनुभव येणे असाही या नृत्याचा आध्यात्मिक पाया असल्याची धारणा बालीमध्ये प्रचलित आहे.[९] उदा. लंकादहन प्रसंगाच्या पूर्वी , हनुमान हे पात्र करीत असलेल्या व्यक्तीला पुरोहित आशीर्वाद देतात, त्यामुळे या पात्रांना कोणतीही इजा होत नाही अशी धारणा प्रचलित आहे.
विकास
केचक नृत्य हे मुळातून आध्यात्मिक पाया असलेले नृत्य असले तरी १९३० साली व्होल्टेर स्पाईस या जर्मन चित्रकार आणि संगीत दिग्दर्शकाने बालीमधील या नृत्यात विशेष रुची दाखविली. बालीमध्ये आलेल्या परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या नृत्याला नात्याची जोड देऊन त्याचे सादरीकरण करता येईल अशी कल्पना त्याला सुचली.वायन लिंबक याने परदेशी पर्यटकांच्या बाली भेटीमध्ये या नृत्याचा अंतर्भाव करण्यास व्होल्टेर यांना मदत केली आणि त्यामुळे हा नृत्यप्रकार अधिक लोकप्रिय झाला[१०].तथापि वायन दिबिया हे नर्तक, नृत्य दिग्दर्शक असे नोंदवतात की व्होल्टेर त्यांच्या देशात येण्यापूर्वीच स्थानिक कलाकारांनी या नृत्यप्रकाराच्या जाहीर सादरीकरणाला सुरुवात केली होती.[११]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Anderson, William M.; Campbell, Patricia Shehan (2011-01-16). Multicultural Perspectives in Music Education (इंग्रजी भाषेत). R&L Education. ISBN 9781607095477.
- ^ Ḍhere, Rāmacandra Cintāmaṇa (1988). Mahāmāya: Dakshiṇetīla madhyakālīna kāvya-naṭakāntūna Kaikāḍī strīcyā rūpāta prakaṭalelyā Mahāmāyece rahasya ulagaḍaṇyācyānimittāne samāja, dharma āṇi kalā yāñcyā paraspara-sambandhāñca śodha. Ajiṅkya Prakāśana.
- ^ "Bedulu village attracts tourists to Bali with 'a day in the life' concept". १४. १०. २०१८.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Varmā, Sudhā (1982). Āgneya Eśiyā meṃ Rāmakathā (हिंदी भाषेत). Somā Prakāśana.
- ^ Yamashita, Shinji (2003). Bali and Beyond: Explorations in the Anthropology of Tourism (इंग्रजी भाषेत). Berghahn Books. ISBN 9781571813275.
- ^ Viśva Hindī darśana (हिंदी भाषेत). Viśva Hindī Pratishthāna. 1989.
- ^ Prasāda, Dineśvara; Gosvāmī, Sravaṇakumāra (1987). Ḍô. Bulke smr̥ti-grantha (हिंदी भाषेत). Bulke Smr̥ti-Grantha Samiti.
- ^ Kasmini, Mien; Prahastuti, Umi; Ultima, Siwi (2011-05-30). Enrichment Reading Bahasa Inggris untuk SD (इंग्रजी भाषेत). Cikal Aksara. ISBN 9786028526517.
- ^ Michel Picard (April 1990). "'Cultural Tourism' in Bali: Cultural Performances as Tourist Attraction, Indonesia" (Vol. 49 ed.). Southeast Asia Program Publications, Cornell University: 37–74.
- ^ Berger, Arthur Asa (2013-08-15). Bali Tourism (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781134622320.
- ^ James Clifford, The Predicament of Culture: Twentieth-Century Ethnography, Literature, and Art (Cambridge and London: Harvard University Press, 1988), p. 223. Cited in Yamashita (1999), p.178.