Jump to content

कृष्णा कोंडके

दादा कोंडके
जन्मकृष्णा खंडेराव कोंडके
८ ऑगस्ट, इ.स. १९३२
भोर पुणे, भारत
मृत्यू १४ मार्च, १९९८ (वय ६५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतभारतीय
कार्यक्षेत्र वगनाट्य, अभिनय, निर्माता, दिग्दर्शक
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६९ - इ.स. १९९८
भाषामराठी (मावळी महादेव कोळी)
प्रमुख नाटके विच्छा माझी पुरी करा
प्रमुख चित्रपटसोंगाड्या
वडील खंडेराव कोंडके
आई सखुबाई खंडेराव कोंडके

कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; भोर, पुणे - १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली.

विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.

कारकीर्द

दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.

व्हाईट कॉलर्ड (पांढरपेशा) वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके/वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली....... पिटातल्या प्रेक्षकांना ह्या सर्वाशी काही देणे घेणे नव्हते. दादांचा प्रेक्षक वर्ग ठरलेला असे. दूरदर्शन अस्तित्वात नसलेल्या काळात - दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिटात शिट्या वाजवत 'गंगू'च्या तंगड्यांची चर्चा करणारा वर्ग हा त्यांच्या चित्रपटांचा 'मायबाप' होता.

८ ऑगस्ट १९३२ला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नांव कृष्णा कोंडके होते. नायगाव - मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या "कृष्णा" ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले. नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्त्व व कोसा-कोसांवर बदलत जाणारी रसिकता कळली व हेच पुढे त्यांच्या यशाचे गमक सिद्ध झाले.

दादांचे बालपण नायगावच्या - मराठी कामगार वस्तीतल्या चाळीत गेले. लहानपणापासून खोड्याळ (काहीसे मवाली) असलेल्या दादांनी 'अपना बाजार' येथे नोकरी केली. सोडावॉटर बाटल्या..... नायगाव परिसरात - "बॅंडवाले दादा" ह्या नावाने त्यांना लोक ओळखू लागले. तेथेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यावरही दादा तेथे जात व जुन्या मित्र मंडळीत रमत.

कलेची सेवा बॅंड पथकाच्या मार्फत करणाऱ्या दादांनी मग 'सेवा दलात' प्रवेश केला. तेथून सांस्कृतिक कार्यक्रम व नंतर नाटके असा त्यांचा प्रवास सुरू झाला. दादा कोंडके यांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथकही काढले. प्रख्यात लेखक वसंत सबनिसांशी ते ह्याच संदर्भातून जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनिसांना नाटकासाठी लेखन करावयास विनंती केली. तोवर वसंत सबनिसांना त्यांच्या "खणखणपूरचा राजा" ह्या नाटकातल्या भूमिकेने प्रभावित केलेलेच होते. हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी सबनिसांनी मदतीचा हात पुढे केला. सबनिसांनी लिहिलेल्या "विच्छा माझी पुरी करा" ह्या नाटकाने दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवले. १५०० च्या वर प्रयोग झालेल्या ह्या नाटकामुळे दादांना भालजींच्या चित्रपटात काम करण्याची संधी प्राप्त झाली. आशा भोसले 'विच्छा.... 'चा मुंबईतला एकही प्रयोग सोडीत नसत. त्यांनीच दादांना भालजींकडे पाठवले. दादांचे शब्दोच्चार एके ५६ रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे, पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्याने प्रेक्षक अख्खे थिएटर (मग ते नाटकाचे असो की सिनेमाचे) डोक्यावर घ्यायचे.

१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या "तांबडी माती" ह्या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मग मागे वळून बघितले नाही. तांबडी माती पाठोपाठ आलेल्या "सोंगाड्या -(१९७१)" ने दादांचे आयुष्य बदलून टाकले. 'सोंगाड्या' ही त्यांची प्रथम निर्मिती. वसंत सबनिसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुळकर्णींनी केले होते. बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरलेल्या ह्या चित्रपटानंतर एकामागोमाग एक हिट चित्रपटांची लाईन लावून दिली. स्वतःच्या "कामाक्षी प्रॉडक्शन" ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे १६ चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी ४ हिंदी व १ गुजराती चित्रपट प्रदर्शित केले.

१९७२ - एकटा जीव सदाशिव, १९७३ - आंधळा मारतो डोळा, १९७५- पांडू हवालदार, १९७६ - तुमचं आमचं जमलं, १९७७ - राम राम गंगाराम, १९७८- बोटं लावीन तेथे गुदगुल्या, १९८०- ह्योच नवरा पाहिजे, १९८७ - आली अंगावर, १९८८- मुका घ्या मुका, १९९०-पळवा पळवी, १९९२- येऊ का घरात व १९९४- सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन ने प्रकाशित केले. १९८१ साली 'गनिमी कावा' त्यांनी दुसर्ऱ्या (बहुदा भालजींच्याच) बॅनरखाली केला.

एखाद्यावर पूर्ण विश्वास कसा टाकावा हे दादांकडून शिकावे..... कामाक्षी प्रॉडक्शनची टीम वर्षानुवर्षे कायम राहिली..... त्यात उषा चव्हाण ही अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर - पार्श्वगायनासाठी तर 'बाळ मोहिते' प्रमुख दिग्दर्शन साहाय्यक..... कुठल्याही 'क्विझ' कार्यक्रमात हा प्रश्न विचारल्यास बेधडक उत्तरे हीच द्यावीत......

लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' त्यांनी केले.

हिंदीतून - तेरे मेरे बीच में (१९८४); अंधेरी रात में दिया तेरे हात में (१९८५), खोल दे मेरी जुबान (१९८६), आगे की सोच (१९८९) ह्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. १९७७ साली पांडू हवालदार ह्या मराठी चित्रपटाच्या धर्तीवर "चंदू जमादार" हा गुजराती चित्रपट काढला.

सोंगाड्या चित्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका केली व तीच त्यांच्या जीवनाचा 'टर्निंग पॉंईंट' ठरला. नाम्या कलावतीच्या तमाशाला जातो व त्याला तमाशाची चटक लागते हे त्याच्या 'आये'ला आवडत नाही. ती त्याला घराबाहेर काढते व तो कलावतीच्या आश्रयाला जातो व तेथे तो तमाशात नावांरूपाला येतो असे हे कथानक आहे. ह्या भोळ्या 'नाम्या' ने दादांना एका रात्रीत यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. पण उभ्या आयुष्यात त्याच 'नाम्या' सारखे दादा साधेपणाने वावरले. ताडदेवच्या कामाक्षीच्या कार्यालयात त्यांना भेटायला त्यांचे चाहते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांतून यायचे व दादांनी त्यांना कधीच निराश परत जाऊ दिले नाही. चाहत्यांबरोबर फोटो सेशन हा त्यांचा वेगळा दैनिक कार्यक्रम असे.. चाहत्यांकडून स्वतःच्या चित्रपटातले संवाद, क्षण वगैरे ते त्यांच्यात समरसून ऐकून घेत..कुणी त्यांना आपल्या मुला-बाळांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यास येई तर कुणी दुकानांच्या उद्‌घाटनाचे.. पण 'तांबडी माती' हा पहिला चित्रपट केलेल्या ह्या साध्या भोळ्या नटसम्राटाने स्वतःचे पाय त्याच मातीवर घट्ट रोवून ठेवले होते ! त्यांच्या सारखा खरोखरचा 'डाउन टू अर्थ' नट मिळणे असंभव !

वादग्रस्त दादांच्या यशस्वी कारकिर्दीची सुरुवातही वादग्रस्तच असायला हवी, असाच विधिसंकेत असावा..... कोहिनूर सिनेमाच्या मालकांनी दादांच्या 'सोंगाड्या' चित्रपटाच्या आगाऊ आरक्षणाला बगल देऊन देवानंदचा 'तीन देवियॉं' हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. दादांनी बाळासाहेब ठाकरेंना साकडे घातले. मग काय विचारता? शिवसैनिकांनी कोहिनूरबाहेर "राडा" घातला! कोहिनूरच्या मालकांना सेनेचा दणका मिळताच 'सोंगाड्या' प्रदर्शित करावयाचे सोंग आणावे लागले.. पण सोंगाड्या सुपर डुपर हिट्ट ठरला व मरगळलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ माजली.

१९७२ साली 'एकटा जीव सदाशिव' प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती, की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लॉंच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली, आणि 'बॉबी' पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला. असे म्हणतात की बॉबी प्रदर्शित करताना राज कपूरला सिनेमागृहांना 'एकटा जीव सदाशिव' उतरवण्याची विनंती करायला लागली होती. बॉबी गाजलाच, पण त्यामागोमाग आलेल्या 'आंधळा मारतो डोळा'ने लाईम-लाईट पुन्हा दादा कोंडकेंवर आणला.

१९७५ मध्ये पांडू हवालदारच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले. 'पांडू हवालदार'मध्ये दादांनी 'अशोक सराफ' या उमद्या कलावंताला संधी दिली. यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते. मुंबई पोलिसांचा हा हवालदार तिकीटबारीवर MI6च्या एजंटला भारी पडला. पांडू हवालदारमुळे मुंबईत MGMला The Man With The Golden Gun लावायला सिनेमागृहे मिळेनात. कधी नव्हे ते जेम्स बॉंडचा सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला. त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढत गेला.

दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती.. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी; त्यांची शिवसेनेशी बांधीलकी; त्यांचे प्रणय; त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत. कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांना कन्या होती. पण जनमानसांत ते अविवाहित म्हणून वावरले.

मार्च १४, १९९८ रोजी पहाटे ३.३०ला रमा निवास ह्या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होममध्ये हालवण्यात आले. आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉ. अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते पण शेवटी त्यांचे सुश्रूषा हॉस्पिटलात प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे हयात होत्या. पुतण्या विजय कोंडकेंनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले...

मृत्यूनंतरही वादांनी दादांचा पिच्छा पुरवला. वाद होता दादांच्या वारसा हक्कांबाबत. दादांनी मृत्युपत्रात आपली संपत्तीची कार्यवाह म्हणून एक संस्था स्थापन केली होती / करायला सांगितले होते. विश्वस्त म्हणून उषा चव्हाण, डॉ. अनिल वाकणकर, साबीर शेख ( त्या काळचे कामगार मंत्री), गजानन शिर्के व वसंत भालेकरांचा समावेश होता. पुढे दादांच्या वारसांनी त्यांच्या मृत्युपत्राला न्यायालयात आव्हान दिले व त्यांची सर्व संपत्ती वादग्रस्त ठरली.

दादा कोंडकेंची जन्मतिथी कृष्णाष्टमी, तारीख ८ ऑगस्ट आहे..

संकीर्ण

  • दादा कोंडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापली गेलेली "दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशन" ही संस्था दरवर्षी शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विनोदोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा’ भरवते.
  • दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ निर्माते अतीफ, सहनिर्माते हेमंत अणावकर आणि दिग्दर्शक आर. विराज यांनी ’वाजलाच पाहिजे : गेम की शिणेमा’ हा चित्रपट काढला आहे.
  • एकटा जीव नावाचे एक वेगळेच नाटक सुनंदा साठे यांनी लिहिले आहे, त्याची संहिता त्यांच्या 'नाट्यद्वय' या पुस्तकात समाविष्ट आहे.

दादा कोंडके यांनी कामे केकेली नाटके/वगनाट्ये

  • खणखणपूरचा राजा (नाटक)
  • विच्छा माझी पुरी करा (वगनाट्य)

चित्रपट

चित्रपटाचे नावप्रदर्शनाचे वर्ष (इ.स.)भाषासहभाग
अंधेरी रात मे दिया तेरे हाथ मेंइ.स. १९८६हिंदीअभिनय
आगेकी सोचइ.स. १९८८हिंदीअभिनय
आंधळा मारतो डोळाइ.स. १९७३मराठीअभिनय
आली अंगावरइ.स. १९८२मराठीअभिनय
एकटा जीव सदाशिवइ.स. १९७२मराठीअभिनय
खोल दे मेरी जुबानइ.स. १९८९हिंदीअभिनय
गनिमी कावाइ.स. मराठीअभिनय
चंदू जमादारइ.स. गुजरातीअभिनय
तांबडी मातीइ.स. मराठीअभिनय
तुमचं आमचं जमलंइ.स. १९७६मराठीअभिनय
तेरे मेरे बीच मेइ.स. १९८४हिंदीअभिनय
नंदू जमादारइ.स. १९७७गुजरातीअभिनय
पळवा पळवीइ.स. १९९०मराठीअभिनय
पांडू हवालदारइ.स. १९७५मराठीअभिनय
बोट लावीन तिथं गुदगुल्याइ.स. १९७८मराठीअभिनय
मला घेऊन चलाइ.स. १९८९मराठीअभिनय
मुका घ्या मुकाइ.स. १९८६मराठीअभिनय
येऊ का घरात?इ.स. १९९२मराठीअभिनय
राम राम आमथारामइ.स. १९७९गुजरातीअभिनय
राम राम गंगारामइ.स. १९७७मराठीअभिनय
वाजवू का?इ.स. १९९६मराठीअभिनय
सासरचं धोतरइ.स. १९९४मराठीअभिनय
सोंगाड्याइ.स. १९७१मराठीअभिनय
ह्योच नवरा पाहिजेइ.स. १९८०मराठीअभिनय

बाह्य दुवे

  • कुळकर्णी,माधव. "कृष्णा कोंडके". १९ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)