कृषि दिन (महाराष्ट्र)
कृषि दिन हा कृषीप्रधान देशाचा एक पावन पर्व मानला जातो. त्यामुळे कृषी दिनाला विशेष असे महत्त्व आहे. कृषी दिन १ जुलै रोजी हरितक्रांतीचेे जनक महानायक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त शासन स्तरावर साजरा केला जातो. याच दिवशी अन्नदाता शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. तसेच 'शेती आणि माती'वर निस्सीम भक्ती असणारे जागतिक ख्यातीचे कृषीतज्ञ व प्रगतशील शेतकरी महानायक वसंतराव नाईक यांना आदरांजली अर्पण केल्या जाते. महानायक वसंतराव नाईक यांचे लोकशाही सक्षमीकरण , ग्रामीण विकास व विशेषतः कृषी औद्योगिक क्षेत्रातील क्रांतिकारी योगदानामुळे त्यांना 'महानायक' , 'शेतकऱ्यांचा जाणता राजा' म्हणूनही संबोधले जाते. भारताचे राष्ट्रपती , भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांनी "वसंतराव नाईक हे भारत मातेचे थोर सुपूत्र आहे." या शब्दात नाईकांचे गौरव केले. तसेच 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहिमेचे प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी "आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत" या शब्दात महानायक वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे. [१][२]
कृषी दिनाची पार्श्वभूमी :
भारतीय आधुुनिक कृषी क्षेत्रात क्रांतिकारी योगदान असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ व पहिले शेतकरी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय सन १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घोषित केला. तेव्हापासून एक जुलैला शासकीय स्तरावर सर्व कार्यालयात कृषीदिन साजरा होत आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी, शेतीवर निस्सीम भक्ती असणारे क्रांतिकारी कृषीसंत वसंतराव नाईक नेहमी म्हणायचे कि, "मी मुख्यमंत्र्यांच्या सिंहासनावर देहाने जरी असलो तरी माझे चित्त मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर असतो." हा 'वसंतविचार' लक्षात घेता शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व शेतकऱ्याना आत्मबळ देण्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव संकल्पना रूजवली. तेंव्हापासून कृषीदिवस हा थेट बांधावर शेत शिवारातही साजरा करण्यास सुरुवात झाली.[३] कार्यालयात साजरा होणारा कृषीदिवस आज थेट शेत बांधावरही साजरा करण्याची प्रथा रूढ झाली. कृषी दिन 'शासकीय कार्यालयीन स्तरावर ते थेट शेत बांधावर ' साजरा करण्याच्या या प्रवासात मात्र 'पवार' हा एक दुर्मिळ संयोग जुळून आल्याचे म्हणता येईल.[४] आज कृषी दिवस हा कार्यालयाबरोबरच थेट शेतबांधापर्यंत सर्वत्र साजरा होतो. इतर राज्यात देखील एक जुलैला कृषी दिन साजरा होतांना दिसून येते.
कृषी दिनाचे महत्त्व
कृषीप्रधान भारत म्हणून ओळखले जाणाऱ्या देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचा प्रतिक म्हणून 1 जुलै कृषीदिनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कृषी दिवस हा नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायत राज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात. ते 'पहिले शेतकरी मुख्यमंत्री व शेतकऱ्यांचा राजा' म्हणून ओळखले जातात. भूमिहिनांना लाखो एकर जमीन त्यांनी वाटप केली. शेतकऱ्यांच्या जीवनात स्वाभिमान आणि समृद्धी फुलवीण्याचे तसेच कृषीसंस्कृतीला नवसंजीवनी देण्याचे ऐतिहासिक कार्य महानायक वसंतराव नाईक यांनी केले. शिवाय पहिल्यांदाच चार कृषी विदयापीठाची स्थापना केली. १९७२ सारख्या भिषण दुष्काळातही महानायक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत कधी 'शेतकरी आत्महत्या' हा शब्द देखील गवसला नव्हता. शेतकऱ्यांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते. शेती आणि मातीवरील त्यांची निस्सीम भक्ती ही भारतीय कृषीसंस्कृतीच्या इतिहासात एक प्रेरणा म्हणून ओळखली जाते. "शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे अन् शेतकऱ्यांचे लेकरं सुद्धा कलेक्टर झाली पाहिजे." हे महानायक वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. थेट बांधावर आधुनिक कृषीतंत्रे व दूरगामी उपाययोजनांची अमलबजावणी याबरोबरच नव्या पिढीत शेती , शेतकऱ्याप्रति जिव्हाळा निर्माण केल्यास नाईकसाहेबांचे स्वप्ने पुर्णत्वास येऊ शकते. भारतीय कृषीसंस्कृतीला उजाळा देणाऱ्या 'कृषी दिन' या पावन पर्वाचे जनमाणसात अनन्यसाधारण असे महत्त्व असून शासकीय कार्यालय , गाव शहरात अनेक जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर थेट बांधावर-शेत शिवारातही मोठ्या प्रमाणात 'कृषी दिवस' साजरा होत असल्याने या पर्वाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शेती व शेतकऱ्यांवरील निर्व्याज प्रेम आणि कृतज्ञता म्हणून ''थेट शेतकऱ्यांच्या बांधावर' मोहीमेचे प्रवर्तक एकनाथराव पवार यांनी सन २०११ पासून कृषी दिन थेट बांधावर साजरा करण्याची अभिनव मोहीम सर्वप्रथम सुरू केली. आज ही संकल्पना एक प्रथा म्हणून नावारूपाला आली.
कृषीदिनाचा बांधापर्यंतचा प्रवास
या दिवशी कृषीसंस्कृतीचे संस्मरण करून कृषीसंस्कृतीच्या समृद्धीसाठी संकल्प केल्या जाते. हा पर्व थेट बांधावर , शेत शिवारातही साजरा होत असून यात शेतकरी सन्मान, समुपदेशन , फळझाडांची लागवड व शेतकऱ्यांचे भाग्यविधाते महानायक वसंंतराव नाईकांना आदरांजली अशा विविध स्वरूपात साजरा केला जातो.थेट शेत बांधावर शेतकऱ्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी, शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करून आत्मबळ मिळावे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जावी या उद्देशाने प्रसिद्ध विचारवंत एकनाथराव पवार यांनी कृषी दिवस थेट बांधावर , शेत शिवारात साजरा करण्याची सर्वप्रथम मोहीम सुरू केली होती. या मोहीमेची दखल पुढे सामाजिक स्तरासोबतच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने दखल घेतली. शिवाय पुढे सन २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात शासनस्तरावरही दखल घेण्यात आली. त्यामुळे कृषी दिन थेट शेत बांधावरही साजरा होत असल्याने या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले. [५][६] कार्यालयात साजरा होणारा कृषी दिन हा आता थेट बांधावरही साजरा केला जात असून कृषीदिनानिमीत्त थेट बांधावर कृषी संजीवनी सप्ताह , वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान व शेतकरी कृतज्ञता सप्ताह सारखे स्तुत्य उपक्रम दरवर्षी राबविले जातात.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ पवार, एकनाथराव. "आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत : वसंतराव नाईक". POKJ ISNN Journal -2320-4494.
- ^ "म्हणून साजरा केला जातो 'महाराष्ट्र कृषी दिन'; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि कारणे". Maharashtra Times. 2023-07-02 रोजी पाहिले.
- ^ "कृषिदिनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर". नागपूर: महाराष्ट्र टाइम्स. २०१८.
- ^ "कृषिदिन थेट बांधावर साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत". लोकशाही वार्ता. 2020.
- ^ "कृषीदुताच्या मोहीमेची शासनस्तरावर दखल". देशोन्नती. २०२०.
- ^ तायडे, प्रा.प्रमोद (२०२२). वसंतराव नाईक यांचे राजकीय योगदान. पुणे. pp. २०५-२०७.