Jump to content

कृत्रिम पाऊस

पाऊस पाडण्यासाठी ढगांमधल्या बाष्पाची क्षमता, तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग असे अनेक घटक आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका घटकाचा असमतोल झाल्यास पावसाची शक्यता कमी होते. अशावेळी ढगांमधलं बाष्पाचं प्रमाण वाढवून ते विशिष्ट तापमानाला थंड केलं की त्याचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होतं. काळ्या ढगांवर विशिष्ट परिस्थितीत रसायने फवारून पाऊस पाडणे, म्हणजेच कृत्रिम पाऊस.

ढगांवर रसायने फवारून पाऊस पाडण्याप्रमाणेच गारांचा आकार कमी करण्यासाठीसुद्धा या प्रयोगांचा उपयोग केला जातो. हवेतले बाष्प एकत्र येऊन पावसाचा थेंब बनण्यासाठी एखाद्या लहानशा कणाची आवश्यकता असते. एखादा सूक्ष्म कण हा पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते आणि त्याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. पण ही पावसाच्या थेंबाची निर्मिती नैसर्गिकरीत्या थांबते, तेव्हा ती कृत्रिम रित्या घडवून आणावी लागते. त्यासाठी काळ्या ढगांवर सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचे कण फवारले जातात. मिठाच्या पाणी शोषून्याच्या गुणधर्मामुळे या कणांभोवती ढगातील बाष्प जमा होते. त्याचा आकार वाढला की बाष्प पावसाचे थेंब म्हणून खाली पडते. एकदा ही क्रिया सुरू झाली की पाऊस पडायला सुरुवात होते. काळ्या ढगांप्रमाणेच अधिक उंचीवर असलेल्या पांढऱ्या ढगांमधूनही पाऊस पाडता येतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. अमेरिका, इस्रायल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिकेतील काही देश आणि युरोपीय देशांमध्येसुद्धा असे प्रयोग केले जातात. चीन येथे ओलम्पिक पूर्वी तर रशिया तही असा प्रयोग झाला होता. अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार फार मोठा असतो. तिथेसुद्धा सोडियम आयोडाईडचे ‘कण’ फवारले की गारांची संख्या वाढते, पण त्यांचा आकार कमी होऊ शकतो.