Jump to content

कुतूहलापोटी (पुस्तक)

कुतूहलापोटी हे डॉ. अनिल अवचट यांचे ३८वे पुस्तक आहे.

‘कुतूहलापोटी’मध्ये चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी आपल्याला वाटणाऱ्या कुतूहलावरील लेख आहेत. या लेखांत प्राणी, कीटक, बुरशी, बॅक्टेरियासारख्या सूक्ष्म जीवांपासून ते विस्मयकारक अशा आपल्या मानवी शरीररचनेपर्यंतची माहिती आहे. ही माहिती रंजक व चकित करणारी आहे. या चराचर सृष्टीचा मी एक अविभाज्य भाग आहे, माझी नाळ या सर्वाशी जोडली आहे, मानवी अस्तित्व हे स्वयंभू, स्वायत्त आणि स्वतंत्र नाही, ही ती निसर्गजाणीव असून अशा जाणीवजागृतीच्या अनेक क्षणांची प्रचीती या लेखनात येते.

‘कुतूहलापोटी’ या पुस्तकातील सर्वच लेख माहितीपर आहेत, पण त्या माहितीला माहिती मिळविण्याच्या खास अवचट पद्धतीने वजन आले आहे. अवचटांनी लिहिलेले विविध विषयांवरील लेख त्या क्षेत्रातील गुरू, तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, त्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आणि त्या जोडीला माहितीजालावरून माहिती मिळवून लिहिले गेले आहेत.

माहितीवरील प्रक्रिया करणे यात अवचटांचे वेगळेपण आहे. माहिती घ्यायची, ती मनात रुजू द्यायची, त्यातून निवड करायची, आपल्या परिप्रेक्ष्याला अनुरूप असेल तिला प्राधान्य द्यायचे, अनेक गाळण्यांतून, निकषांतून ती तावूनसुलाखून निघते आणि मगच त्याचा अवचट शैलीतील लेख होतो.

मधमाश्यांवरील लेख

‘कुतूहलापोटी’ या पुस्तकात मधमाश्यांवर एक लेख आहे. मधमाशा फुलातील मध कसा गोळा करतात याचे रसभरित वर्णन त्यात आहे. अवचटही माहितीचे असेच कण-कण जमा करतात. अवचट म्हणतात, ‘‘मधमाश्या त्या मधुरसावर ऊर्फ मकरंदावर काय प्रक्रिया करतात कोण जाणे; पण त्याचा मध तयार होतो. माणसाने एवढी प्रगती केली तरी प्रयोगशाळेत त्याला मध तयार करता आला नाही अजून.’’ अवचटांबद्दलही असेच म्हणता येईल. आपल्या सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल तीच माहिती त्यांनाही मिळते; पण त्या माहितीवर ते अशी काय प्रक्रिया करतात, की त्यातून ‘अवचट’ शैलीतील मधुलेख तयार होतात.

या लेखात ते शेवटी लिहितात, ‘कुठे मधमाश्यांचं सहकार्य आणि परस्परावलंबन; आणि कुठे आपली स्पर्धा आणि वैयक्तिक प्रगतीचा अतिरेक! कुठे त्यांच्या समूहासाठी प्राण देणाऱ्या कामकरी माश्या, तर कुठे आपली पैशासाठी काहीही विकायला तयार असलेली माणसं! कुठे अकार्यक्षम राणीलाही हटवू शकणारी त्यांची लोकशाही, तर कुठे कितीही आरोप सिद्ध झाले तरी सत्तेला चिकटून राहणारी आमची राजकीय संस्कृती!’

कीटकांवरील लेख

कीटकांच्या लेखात डॉ. अनिल अवचट म्हणतात, ‘ही छोटी मंडळी त्यांच्या जगण्यातून काय काय विलक्षण गोष्टी शिकवतात! त्यांना सहा पाय असतात; पण कायम तीन पायांवर स्थिर. जगातली ही सर्वात स्थिर अवस्था. कमीत कमी आधार; पण सर्वात कार्यक्षम स्थिरता कुठे, तर या तीन पायांवर. आटोपशीर जगण्याचं हे किती छान उदाहरण! हेही शिकूयात का? कमीत कमी गरजा आणि मनाची स्थिरता. कीटकभाऊ, जमेल का आम्हाला हे? तो बघा, त्याची ॲंटेना हलवून सांगतोय, ‘जमेल, नक्की जमेल!’

या पुस्तकाला डॉ. अभय बंग यांची छोटीशीच, पण मार्मिक प्रस्तावना लाभली आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे. शालेय मुलांसाठी पुरवणी वाचन म्हणून अभ्यासक्रमात हमखास समावेश करावे असे हे रंजक, माहितीपर, आनंददायी आणि मूल्यभान जागृत करणारे पुस्तक आहे.

अवचटांचे लेखन

डॉ. अनिल अवचटांचे लेखन वाचणे ही कधीच शिक्षा नसते तर बक्षीस असते.