Jump to content

कुंभार

चाकावर मडक्याला कुंभार आकार देताना(Cappadocia, तुर्की).
preparation of pots in srikakulam town
कुंभार

ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या इत्यादी घडवून, त्या वस्तू भाजून विकणारा कारागीर. तो एकेरी आणि दुहेरी चुली व शेगड्याही तयार करतो, मात्र त्या भाजायची गरज नसते. महाराष्ट्रातील कुंभार गौरी-गणपतीच्या, दुर्गेच्या आणि अन्य मूर्ती, हरतालिका, बैलपोळ्याचे बैल, दिवाळीच्या किल्ल्यात ठेवायच्या वस्तू आणि बाहुल्याही(बुलाबाई-बुलोजी) बनवतो. कुंभार हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ऋग्वेद कालापासून कुंभार आहेत. त्यांच्या देवता पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, हर्दिया या असतात.

पोटजाती

महाराष्ट्रातील कुंभारांमध्ये २२ पोटजाती आहेत. त्या अशा : अहिर, कडू, कन्‍नड, कोकणी, खंभाटी, गरेते, गुजर, गोरे, चागभैस, थोरचाके, पंचम, बळदे, भांडू, भोंडकर, भोंडे, मराठे, लडबुजे, लहानचाके, लाड, लिंगायत, हातघडे आणि हातोडे. कुमावत

कुंभाराची माती

कुंभारकलेसाठी तलावातली किंवा गाळातली विशिष्ट प्रकारची माती लागते. माती आधी उन्हात वाळवतात आणि मग कु्टून बारीक करतात. त्यानंतर तिच्यात घोड्याची लीद, शेण, राख, धान्याची फोलपटे वगैरे कालवून ते मिश्रण काही दिवस मुरू देतात आणि मग त्या मातीचे गोळे बनवून ते कलाकृतीसाठी वापरतात.

कुंभाराचे चाक

कुंभाराचे चाक लाकडाचे किंवा कुरंजी दगडाचे असते. या चाकाचा व्यास ३० ते ३८ सेंटिमीटर असतो. चाकाला दहा ते बारा आरे असतात.चाकाखाली दगडात बसवलेला एक खुंट असतो. चाकाच्या लाकडी माथ्यावर (तुंब्यावर) मातीचा गोळा ठेवून एका बांबूच्या दांडीने चाकाला गती दिली जाते. हे चाक ५-१० मिनिटे फिरते. चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो. तयार झालेल्या भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यावर भांडे हळूच काढून आधी सावलीत आणि मग उन्हात वाळवले जाते, आणि नंतर अशी तयार झालेली अनेक भांडी आवा(कुंभाराची भट्टी) पेटवून तीत भाजली जातात.

अन्य अवजारे

  • आवा : म्हणजे कुंभाराची वस्तू भाजायची भट्टी. पाचसहा विटांचे थर आणि त्यावर कोळसा, परत विटांचे थर आणि कोळसा, अशी आव्याची रचना असते. भाजलेल्या वस्तूंना तांबडा रंग हवा असेल तेर, आव्यातील धुराला बाहेर जाण्यासाठी वाट करून देतात. वस्तू काळ्या रंगाच्या हव्या असतील तर आवा पेटल्यावर काही वेळाने धूर बाहेर जाणे बंद करतात, म्हणजे धूर आतल्या आत कोंडून वस्तूंना काळा रंग येतो.[]
  • गंडा किंवा गुंडा : हा एक बहिर्वक्र आकाराचा दगड असतो. वस्तूच्या आतून, वस्तूवर हा एका हाताने फिरवला की वस्तू गुळगुळीत आणि पक्की होते.
  • चोपणे : ही एक प्रकारची लाकडी थोपटणी असते. जी वस्तू तयार करायची असेल तिला बाहेरून चोपण्याने ठोकले जाते. त्यामुळे वस्तू पक्की होते.
  • बांबूचा दांडा : हा चाक फिरवायला लागतो. चाकाच्या दोन आ‍ऱ्यांमध्ये बांबू घुसवून कुंभार चाकाला गती देतो.
  • मण्यांची माळ : ही वस्तूला चकाकी आणण्यासाठी वस्तूवरून फिरवली जाते.[१]
  • साचे : विटा, मूर्ती वगैरेंसाठी लाकडी साचे असतात.[२]

अधिक वाचनासाठी

  • धांडोळा भारतीय कुंभारांचा (लेखक - रामलिंग कुंभार)

हे सुद्धा पहा

गावकामगार; बलुतेदार

बाह्यदुवे


संदर्भ

  1. ^ Press, Associated. "Victims in Ethiopian Airlines crash are from 35 countries, including U.S." cleveland.com (इंग्रजी भाषेत). 2019-03-13 रोजी पाहिले.