किसन महाराज चौधरी
किसन पांडुरंग चौधरी (जन्म : पिंपरी पेंढार-जुन्नर तालुका, १५ मे, १९५१) हे निगडी (पुणे) येथे राहणारे एक प्रवचनकार आहेत. ते एम.ए.बी.एड. आणि साहित्य विशारद आहेत. पुणे महानगरपालिकेच्या विद्यानिकेतन या फक्त हुशार मुलांसाठी असलेल्या शाळेतून ३८ वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले. शाळेच्या नोकरीत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या ४थीच्या व ७वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी ५००हून अधिक व्याख्याने दिली आहेत. किसनमहाराजांची विनूची आई, श्यामची आई, स्वामी विवेकानंद आणि मूल्य शिक्षण इत्यादी विषयांवरील भाषणे विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहाने ऐकत असत.
आकाशवाणी व दूरचित्रवाणीवर किसन महाराज चौधरी यांच्या अनेकदा मुलाखती झाल्या आहेत.
प्रवचनकाराची कारकीर्द
किसन महाराज चौधरी यांना तरुण वयातच ज्ञानेश्वरीची गोडी लागली. त्यांनी ३० वर्षांत भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा आदी विषयांवर १०००हून अधिक प्रवचने दिली आहेत. किसन महाराजांनी केवळ पसायदानावर दिलेल्या प्रवचनांची आणि भाषणांची संख्या १२००हून अधिक आहे. ज्ञानेश्वरीच्या पारायणांच्या निमित्ताने ते तिच्यातील महत्त्वाच्या ओव्यांचे रसभरित निरूपण करतात.
किसन महाराज चौधरी यांचे समाजकार्य
नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर किसनमहाराजांनी त्यांचे जन्मगाव पिंपरी पेंढार (जुन्नर तालुका, पुणे जिल्हा) येथे स्वतःच्या दीड एकर जागेवर ’माऊली सेवा संस्था’ या नावाचा एक वानप्रस्थाश्रम काढला आहे. सुरुवातीला तीन लहान खोल्या आणि एक शेड यांनी सीमित असलेल्या या संस्थेची जसजशी प्रगती होत जाईल तसतसे तिथे वृद्धाश्रम, समुपदेशन केंद्र, निसर्गोपचार केंद्र, संत साहित्य अभ्यास केंद्र, वाचनालय, विरंगुळा केंद्र वगैरे काढण्याचा किसन महाराजांचा संकल्प आहे.
किसन महाराज चौधरी यांचे लेखन
- अनेक पुस्तकांच्या प्रस्तावना
- ओरिएंट स्कॉलर (शैक्षणिक पुस्तक)
- गुरुकिल्ली (शैक्षणिक पुस्तक)
- परफेक्ट स्कॉलर (शैक्षणिक पुस्तक)
- यश माझ्या हातात (शैक्षणिक पुस्तक)
- यशोदीप (शैक्षणिक पुस्तक)
- ’विश्वप्रार्थना पसायदान’ हे पुस्तक. याच्या तीनहून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
- शाळेतील विद्यार्थ्यांना ४थी आणि ७वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता उपयोगी पडतील अशा १५ पुस्तकांचे लिखाण
- सकाळ पॅटर्न (शैक्षणिक पुस्तक)
- संस्कार पुस्तिका
- सीतारामलीला या चरित्र ग्रंथाचे संपादन
- हमखास स्कॉलरशिप (शैक्षणिक पुस्तक)
- ज्ञानाई (पुस्तक)
किसन महाराज चौधरी यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार
- पुणे महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार
- पिपरी-चिंचवड महापालिकेचा आदर्श शिक्षक पुरस्कार
- रा.बा. देव पुरस्कार
- विमलाबाई परदेशी पुरस्कार
- बा.ग. जगताप पुरस्कार
- मोरया पुरस्कार
- साने गुरुजी पुरस्कार
- द्रोणाचार्य पुरस्कार
- लोकनेते यशवंतराव चव्हाण पुरस्कार
- सेवाभावी संस्थांची १५०हून अधिक पदके
- भारत सरकारकडून राष्ट्रीय पुरस्कार (५ सप्टेंबर २०००)
- ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटनेतर्फे संत भोजलिंग काका ओबीसी जाणीव पुरस्कार (४ ऑक्टोबर २०१५)