किशोर प्रधान
किशोर प्रधान | |
---|---|
जन्म | किशोर अमृत प्रधान १ नोव्हेंबर, १९३६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
वडील | अमृतराव ऊर्फ काकासाहेब प्रधान |
पत्नी | शोभा प्रधान |
किशोर अमृतराव प्रधान (जन्म : १ नोव्हेंबर, १९३६-१२ जानेवारी,२०१९) हे एक मराठी अभिनेते आणि मराठी-हिंदी-इंग्रजी नाट्यदिग्दर्शक होते.. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरसह विविध पदांवर २८वर्षे नोकरी करून ते निवृत्त झाले आहेत. नव्यानेच सुरू झालेल्या नागपूर आकाशवाणी केंद्रावर सादर केलेले ‘भुतावळ’ नावाचे नाटक हे त्यांचे पहिले दिग्दर्शन. त्यानंतर विद्यापीठाच्या युवा महोत्सवासाठी नाट्यदिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांची निवड झाली.
किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला. घर सुधारकी वातावरणाचे होते. आई मालतीबाई प्रधान या स्वतः नाटकवेड्या होत्या, त्या नाट्यछटा लिहिणाऱ्या आणि बसविणाऱ्या होत्या. त्या काळात म्हणजे १९४२/४५ च्या सुमारास त्या नाटकातून काम करायच्या, नाटक बसवायच्या. विदर्भ साहित्य संघासाठी त्यांनी ‘एकच प्याला’ बसविले होते. घरी नाटकाच्या तालमी चालायच्या. प्रधान यांचे वडील अमृतराव प्रधान (त्या वेळच्या अमृत फार्मसीचे मालक) यांचाही पत्नीला पूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातीलच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.
किशोर प्रधान यांनी नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले.
अभिनयाची कारकीर्द
किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धामधून अनेक एकांकिकांमधून व नाटकांमधून कामे केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली.
ग्लॅक्सो कंपनीत नोक्री क्रीत असताना तरी अंगातील कला आणि नाटकाची ओढ प्रधनांना स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआयजी (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक बसवून सादर केले. पुरुषोत्तम दारव्हेकर हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक खूप गाजले.
प्रधान रहात असलेल्या कॉलनीत सादर करायच्या ‘तीन चोक तेरा’ या नाटकाची तयारी जोरात सुरू झाली, पण नायिका कोण ते ठरेना. कुणीतरी माहिती आणली की ‘एमआयजी’ कॉलनीतली एक मुलगी नाटकात कामे करते. तिचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली. तासन्तास बस स्टॉपवर ताटकळत राहिल्यावर एके दिवशी ती दिसली. पाहता क्षणीच तिला आपल्या नाटकाची नायिका म्हणून पसंत केली. तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याची जबाबदारी नाटकाचा दिग्दर्शक म्हणून किशोर प्रधान यांच्याकडे आली. आधी पसंत केलेल्या ३-४ नायिकांच्या घरून नकारघंटा मिळाली होती, त्यामुळी भीतभीतच किशोर प्रधान आपल्या ३-४ मित्रांसह त्या मुलीच्या घरी गेले. मुलीचे वडील त्या काळचे सुप्रसिद्ध नाटककार व्यंकटेश वकील निघाले. पण त्यांना भेटल्यावर किशोर प्रधानांची बोबडीच वळली आणि तोंडातून शब्द फुटेना. मित्र मदतीला आले, आणि त्यांच्या विनंतीवरून व्यंकटेश वकिलांनी आढेवेढे न घेता, शोभा वकील हिला म्हणजे त्यांच्या मुलीला नाटकात काम करण्यास परवानगी दिली. दोन महिन्यात कॉलनीतल्या छोट्या कम्युनिटी हॉलच्या रंगभूमीवर हे नाटक आले, प्रयोग तुफान रंगला. तो पाहून श्याम फडके यांनी नवीन नाटक लिहून दिले. त्या नव्याकोऱ्या ’काका किशाचा’(१९७०) या स्व-दिग्दर्शित नाटकाने किशोर प्रधान यांना लोक ओळखू लागले. पण त्यापूर्वीच २३ ऑक्टोबर १९६६ला त्यांचे लग्न शोभा वकील यांच्याशी झाले होते. वर्तमानपत्रात बातमी आली, "सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभा वकील यांचा विवाह किशोर प्रधान यांच्याशी"
भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. किशोर प्रधान यांनी १८हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत.
नाटकाच्या ऑफर्स
त्या काळातील अनेक स्पर्धामधून ‘काका किशाचा’ या नाटकाला अभिनय, दिग्दर्शनासाठी पारितोषिके मिळाली. नाटकाच्या प्रसिद्धीमुळे यशवंत पगार हे नाट्यनिर्माते प्रधानांकडे आले आणि त्यांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याविषयी निमंत्रण दिले. एका प्रयोगाचे सहाशे रुपये मानधन नक्की झाले आणि पगार यांनी पहिल्या पाच प्रयोगांची आगाऊ रक्कम प्रधानांना दिली. ‘काका किशाचा’ या नाटकाचे सुमारे २०० प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ असायचा. ‘काका किशाचा’या नाटकामुळे मला व्यावसायिक रंगभूमीवर नाटकातून काम करण्यासाठी तसेच नाटक बसविण्यासाठी बोलावणी येऊ लागली.
‘ग्लॅक्सो’तील नोकरी सांभाळून प्रधानांनी दुसऱ्या दिग्दर्शकांच्या नाटकात कामे करायला सुरुवात केली. आत्माराम भेंडे यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हॅंड्स अप’, ‘संभव असंभव’ आदी नाटके केली
त्यानंतर किशोर प्रधानांनी ‘रात्र थोडी सोंगं फार’ हे नाटक दिग्दर्शित केले, तेही गाजले.
बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली.
चित्रपटांतली कारकीर्द
बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली. याच कालावधीत त्यांना मराठी चित्रपटाच्याही ‘ऑफर्स’ येत होत्या. पण तेव्हा मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचे. तसेच ते सलग काही दिवस असल्याने नोकरीतून रजा घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यांनी तेव्हा चित्रपट नाकारले. पण निवृत्तीनंतर मात्र काही चित्रपट केले. ‘मामा भाचे’ हा त्यांची भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट. पुढे ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’ या चित्रपटातून त्यांनी काम केले.
हिंदी चित्रपट
‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.
दूरचित्रवाणी
मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर दूरदर्शनवरून ‘निरोप’ हे पहिले मराठी नाटक सादर झाले त्यात त्यांची भूमिका होती. पुढे दूरदर्शनच्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. याकुब सईद यांच्यासमवेत सादर झालेल्या ‘हास परिहास’कार्यक्रम ते होते. दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘गजरा’ हा कार्यक्रम त्यांनी त्यांची अभिनेत्री पर्नी शोभासह सादर केला.
निवृत्तीनंतर
‘ग्लॅक्सो’मध्ये २८ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर १९९४ मध्ये किशोर प्रधान ‘ऑर्गनायझेशन अँड मेथड’ विभागाचे ‘अखिल भारतीय व्यवस्थापक’ या पदावरून निवृत्त झाले. नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी, दौरे त्यांनी केले.
किशोर प्रधान यांनी एका ‘हेअर डाय’ कंपनीच्या जाहिरातीत काम केले आहे. कपडे धुण्याच्या साबणाच्या एका जाहिरातीतही त्यांची भूमिका आहे.
किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित केलेली आणि त्यांत भूमिका केलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- कल्पनेचा खेळ (या नटकात किशोर प्रधानांनी प्रोफेसरची भूमिका केली होती)
- काका किशाचा (पहिले जाहीर नाटक-१९७०) (किशाची भूमिका)
- घरोघरी मातीच्या चुली (सुनील)
- तीन चोक तेरा (खासगी रंगभूमीवरचे पहिले नाटक)
- ती पाहताच बाला (बंड्या)
- पळता भुई थोडी
- प्रीतिच्या रे पाखरा
- बेबी (डायरेक्टर)
- भुतावळ
- मालकीण मालकीण दार उघड (दिग्दर्शक - आत्माराम भेंडे)
- मिळाली परी तरी ब्रम्हचारी
- या, घर आपलंच आहे (नाथ)
- रात्र थोडी सोंगं फार (भरत)
- लागेबांधे (लेखक - दत्ता केशव, दिग्दर्शन - आत्माराम भेंडे; महिला मंत्र्याच्या पीएची भूमिका)
- हॅटखाली डोके असतेच असे नाही (दिग्दर्शक - आत्माराम भेंडे)
- हनिमून झालाच पाहिजे (दिग्दर्शक - आत्माराम भेंडे)
- Best of bottoms up (२००७ पासून) या नाटकाचे २५०हून अधिक प्रयोग झाले. (सात-आठ वेगवेगळ्या भूमिका, कधी हवालदार, कधी डॉक्टर तर कधी आणिक कुणी)
- Bindhast (१९९१-९२)
- Bottoms up
- Carry on Bombay (१९९१)
- Carry on heaven (२००६)
- Circus (१९९८)
- Grandson of bottoms up (१९९६)
- Its all yours janab (१९९३-९४)
- Last tango in heaven (१९८९-९०)
- Mind your stethoscope (१९९७)
- Monkey business (१९९५)
- Oh no not again (२०००)
- Purush (२००६)
- Sons of bottoms up (१९८७-८८)
- Tamasha Mumbai eshtyle (२००४)
- World is weak (१९९२)
किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित केलेली पण त्यांची भूमिका नसलेली नाटके
किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित न केलेली पण त्यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- जेव्हा यमाला डुलकी लागते (बाळासाहेब)
- झाकली बाई सव्वा लाखाची
- तात्पर्य
- ती पाहताच बाला
- ब्रम्हचारी असावा शेजारी
- मालकीण, मालकीण दार उघड
- युवर्स फेथफुली
- लागेबांधे (सेक्रेटरी)
- लैला ओ लैला (मनोहर)
- संभव-असंभव : मूळ गुजराती नाटकाचा मराठी अनुवाद; अनुवादक - शोभा प्रधान
- हनिमून झालाच पाहिजे (बनचुके)
- हॅंड्स अप (रविराज)
किशोर प्रधान यांची भूमिका असलेले चित्रपट
- उचला रे उचला
- कशाला उद्याची बात
- खिचडी़ (हिंदी)
- गॉड ओन्ली नोज (इंग्रजी, सेक्रेटरी)
- छोडो कल की बातें (हिंदी)
- जब वी मेट (हिंदी) : या नाटकातली ’अकेली लड़की खुली तिजोरी की तरह होती है’ म्हणणाऱ्या स्टेशनमास्तरची भूमिका
- जिगर (हिंदी)
- डॉक्टर डॉक्टर (विसरभोळ्या डॉक्टरची भूमिका. त्यांचा असिस्टंट लक्ष्मीकांत बेर्डे होते.
- त्याचा बाप तिचा बाप
- नवरा अवली बायको लव्हली
- नवरा माझा ब्रम्हचारी
- नाना मामा
- प्राईम टाईम (पुरुषोत्तम आपटे)
- फॅमिली कट्टा
- बाप तिचा बाप
- Brave Heart (आजोबांची भूमिका)
- भिंगरी
- मस्ती एक्सप्रेस (हिंदी)
- मामा भाचे (मामाची भूमिका. यशवंत देव हे भाचा होते.)
- मास्तर एके मास्तर
- मीराबाई नॉट औट (हिंदी, स्कूल-प्रिन्सिपाल))
- मी शिवाजी राजे भोसले बोलतोय
- रफ़्तार (हिंदी)
- रानपाखरा
- रूल्स-प्यार का सुपरहिट फ़ॉर्म्यूला (हिंदी, दादा)
- लगे रहो मुन्नाभाई (हिंदी) (प्राध्यापकाची भूमिका)
- लाडीगोडी
- लालबाग परळ
- वन रूम किचन
- वरचा मजला रिकामा त्याचा
- शहाणपण देगा देवा
- शिक्षणाच्या आईचा घो
- शेजारी शेजारी
- सिटी ऑफ गोल्ड - मुंबई १९८२ : एक अनोखी कहानी (हिंदी, भूमिकेचे नाव खेतान)
- स्टेपनी (सहअभिनेता भरत जाधव)
- हॉर्न (हिंदी)
- ह्यांचा काही नेम नाही
किशोर प्रधान यानी काम केलेल्या दूरचित्रवाणी मालिका
- अदालत (हिंदी, प्रकरण राज चौथे चोर का, भूमिकेचे नाव यशवंत लोहार)
- गजरा (दिग्दर्शन आणि निर्मिती किशोर आणि शोभा प्रधान)
- जबान संभाल के (भूमिकेचे नाव - मुर्दा (प्रेत))
- सीआयडी (मालिका, प्रकरण खूनी चष्मा, भूमिकेचे नाव - रतन)