काळ्या शेंडीचा बुलबुल
शास्त्रीय नाव | पायनोनोटस मेलॅनिक्टेरस [टीप १] |
---|---|
कुळ | वल्गुवदाद्य [टीप २] |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | ब्लॅक-क्रेस्टेड बुलबुल [टीप ३] ब्लॅक-हेडेड यलो बुलबुल [टीप ४] |
हिंदी | जर्द बुलबुल |
काळ्या शेंडीचा बुलबुल (शास्त्रीय नाव: Pycnonotus melanicterus, पायनोनोटस मेलॅनिक्टेरस ; इंग्लिश: Black-crested Bulbul, ब्लॅक-क्रेस्टेड बुलबुल) ही भारतीय उपखंडातील भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका इत्यादी देश, तसेच थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादी आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळणारी वल्गुवदाद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची एक प्रजाती आहे. हे साधारणपणे १९ सें. मी. आकाराचे स्थानिक निवासी पक्षी असतात. यांचे डोके, चेहरा, गळा, मान काळ्या रंगाचे असतात, डोक्यावर काळ्या रंगाची शेंडी असते आणि उर्वरीत भागाचा रंग जर्द पिवळा असतो. यांचे डोळे फिकट पिवळे असतात. या पक्ष्यांमधील नर-मादी दिसायला सारखेच असतात.
माणिक कंठी बुलबुल हे काळ्या शेंडीच्या बुलबुलांसारखे दिसणारे वल्गुवदाद्य कुळातील अन्य एका प्रजातीचे पक्षी आहेत.
आढळ
काळ्या शेंडीचा बुलबुल हिमालयाच्या दक्षिणेपासून सिमला, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम, मध्य प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र, उत्तर आंध्र प्रदेश, गोवा तसेच नेपाळ, बांगलादेश, भूतान या ठिकाणी दिसतो.
खाद्य
हा बुलबुल मुख्यत्वे फलाहारी असला, तरी क्वचित कीटकही खातो.
प्रजनन
प्रामुख्याने जानेवारी ते जून हा काळ्या शेंडीच्या बुलबुलाचा वीणीचा हंगाम आहे. गवत, कोळ्याचे जाळे वगैरे वापरून तयार केलेले याचे घरटे कमी उंचीच्या झाडावर किंवा झुडपात दडलेले असते. मादी एकावेळी २ ते ३ लालसर पांढऱ्या रंगाची अंडी देते. या अंड्यांवर लाल रंगाच्या विविध छटा असलेले ठिपकेही आढळून येतात. घरटे तयार करण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालण्यापर्यंतची सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
संकीर्ण
काळ्या शेंडीचा बुलबुल हा गोव्याचा राज्य पक्षी आहे.
चित्रदालन
तळटिपा
बाह्य दुवे
- "काळ्या शेंडीच्या बुलबुलांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)