Jump to content

काळा समुद्र

काळ्या समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)

काळा समुद्र (तुर्कस्तान: Karadeniz, कारादेनिझ ; ग्रीक: Μαύρη Θάλασσα ; रशियन: Чёрное море ; इंग्लिश: Black Sea, ब्लॅक सी ;) आग्नेय दिशा युरोपातील हा भूवेष्टित समुद्र आहे. या समुद्रास युरोप, अनातोलियाकॉकेशसाने वेढले असून, भूमध्य समुद्र एजियन समुद्र व अनेक सामुद्रधुन्यांद्वारे अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. तसेच, तो बोस्फोरस सामुद्रधुनीमार्फत मार्माराच्या समुद्राशी जोडला गेला आहे, तर डार्डेनेल्झची सामुद्रधुनी त्याला भूमध्य समुद्राच्या 'एजियन समुद्र' या उपसमुद्राशी जोडते. ही जलराशी पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांना दुभागते. काळा समुद्र हा कर्चच्या सामुद्रधुनीद्वारे अझोवच्या समुद्राशीही जोडला गेला आहे. काळ्या समुद्राचे क्षेत्रफळ ४,३६,००० वर्ग कि.मी. (१६८,५०० वर्ग मैल) (अझोवाचा समुद्र वगळता), सर्वाधिक खोली २,२०६ मी. (७,२३८ फूट), आणि आकारमान ५४७,००० घन कि.मी. (१३१,२०० घन मैल) इतके आहे. बल्गेरिया, जॉर्जिया, रशिया, रोमेनिया, तुर्कस्तान आणि युक्रेन यांमध्ये तयार होणाऱ्या पूर्व पश्चिमोत्तर लंबवर्तुळाकार भूभागात काळा समुद्र तयार झालेला आहे. याच्या दक्षिणेस पोंटिक पर्वतरांगा, तर पूर्वेस कॉकेसस पर्वतरांगा आहेत.या समुद्राची जलपृष्ठावरील पूर्व पश्चिम दिशेतील सर्वाधिक लांबी (पूर्व-पश्चिम) १,१७५ कि.मी. आहे.

इस्तंबूल हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर याच समुद्राच्या काठावर वसलेले आहे. बातुमी, बुर्गास, कोन्स्टान्ट्सा, गिरेसुन, होपा, इस्तंबूल, कर्च, खेर्सन, मंगालिया, नावोदारी, नोवोरोस्सिक, ओदेसा, ओर्दू, पोटी, रिझे, सामसुन, सेव्हास्तोपोल, सोत्शी, सुखुमी, त्राब्झोन, व्हर्ना, याल्ता आणि झोगुल्डाक ही या समुद्राच्या काठाने वसलेली काही महत्त्वाची शहरे आहेत.

काळा समुद्र ही एक बाह्यप्रवाही जलराशी आहे; म्हणजेच, प्रत्येक वर्षी येऊन मिळणाऱ्या एकूण पाण्यापेक्षा साधारण ३०० घन कि.मी. इतके जास्त पाणी काळ्या समुद्रातून, बोस्फोरस आणि दार्दनेलस सामुद्रधुनींमार्गे, एजियन समुद्रात जाते. भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणारे पाणी हे "द्विस्तरीय जलप्रवाह प्रणाली" तयार करते. काळ्या समुद्रातून बाहेर पडणारे जास्त थंड आणि कमी खारट पाणी हे भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणाऱ्या पाण्याच्या वर तरंगत राहते, ज्यामुळे पाण्यात खोलवर ऑक्सिजन अभावित पाण्याचा स्तर तयार होतो. काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील युरेशियाई जलप्रणालीतील नद्यांतूनही यात पाणी येते, ज्यातील डॉन, नीपर आणि डॅन्यूब या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत.

भूतकाळात पृथ्वीवरील जलपातळी अनेक वेळा कमी जास्त झालेली आहे, की ज्यामुळे, तुलनेने कमी खोल असलेला काळ्या समुद्राचा तळ कधी काळी भूभागही होता. सध्याच्या काळात ही जलपातळी जास्त असल्यामुळे, सध्यातरी काळा समुद्र हा मुख्य सागरप्रणालीशी तुर्की सामुद्रधुनी तसेच भूमध्य समुद्रामार्गे जोडलेला आहे. जलपातळी कमी/जास्त होत असता, तुर्की सामुद्रधुन्या हा काळ्या समुद्राचा मुख्य जलनिचऱ्याचा मार्ग आहे. ज्या ज्या काळात काळ्या समुद्राला मुख्य सागर प्रणालीशी जोडणारे जलप्रवाह अस्तित्वात नसतात, त्या त्या वेळी, काळा समुद्र हा एक मोठे सरोवर असल्याप्रमाणे असतो. तुर्की सामुद्रधुनीत बोस्फोरस, मार्माराचा समुद्र आणि दार्दनेलस या जलराशींचा समवेश होतो.


नावाची व्युत्पत्ती

आधुनिक

वेगवेगळ्या प्रदेशांत/लोक समूहांत सध्या प्रचलित असलेली काळ्या समुद्राची नावे ही नावाची गुणधर्मनिदर्शक भाषांतरे आहेत. अद्यिघे:, ग्रीकः मावरी थलासा, बुल्गेरीयाई: चेर्नो मोरे, जॉर्जियाई: शावी झ्ग्वा, लाझ: उचा त्झुगा किंवा फक्त त्झुगा 'समुद्र', रोमनियाई: मारेया नेग्रा, रशियाई: चोर्नोये मोरे, तुर्की: कारादेनीझ़, युक्रेनियाई: चोर्ने मोरे, ऊबिख़.

वरील नावे ही इ.स.च्या बाराव्या शतकापूर्वीची आहेत, असे मानले जाते. काळ्या समुद्राला त्याचे नाव हे ओस्मानी तुर्कांकडून प्राप्त झालेले आहे. मध्ययुगीन तुर्की भाषेत 'कारा (शब्दशः अर्थ: काळा)' या शब्दाचा एक अर्थ उत्तर दिशा असाही होता. उदाहरणार्थ, 'कारा-देनित्झी' (कारा समुद्र), हा काळ्या समुद्राप्रमाणेच सायबेरियाई याकुत तुर्कांच्या उत्तरेस असणारा एक समुद्र आहे. त्याचप्रमाणे, तुर्कीत 'लाल' हा 'दक्षिण दिशा' या अर्थानेही वापरतात. उदाहरणार्थ, 'लाल समुद्र' जो अनातोलियाच्या दक्षिणेस आहे. याप्रमाणेच 'अक्'-पांढरा पश्चिमेसाठी. प्राचीन अनातोली तुर्कीत (तुर्की भाषेत) एजियन आणि भूमध्य यांना एकत्र 'अक्देनित्झ'-पांढरा समुद्र, असे संबोधत, तर आधुनिक तुर्की भाषेत फक्त भूमध्य समुद्रालाच अक्देनिझ संबोधतात कारण भूमध्य समुद्राच्या उत्तरेकडील भागाला एजियन समुद्र हे पाश्चात्य नावाला अनुसरून नाव देण्यात आले आहे. ओट्टोमन तुर्कांच्या वेळी असे नव्हते, कारण त्या वेळी ओट्टोमन तुर्क एजियन समुद्राला, त्यातील ग्रीस आणि अनातोलिया यांच्या मध्ये असणाऱ्या १२ बेटांचा निर्देश करीत, 'बेटांचा/द्वीपांचा सागर'-अदलर देनित्झी, असे संबोधित.

काळा समुद्र हा चार पैकी एक समुद्र आहे, ज्यांची इंग्रजी नावे ही रंगांवर आधारित आहेत. लाल समुद्र, पांढरा समुद्र आणि पिवळा समुद्र हे त्यातील इतर तीन समुद्र होय.

प्राचीन

स्त्राबोच्या भूगोलाप्रमाणे (१.२.१०), काळा समुद्र हा प्राचीन काळी फक्त 'समुद्र' (हो पोंतोस) या नावाने ओळखला जात असे. ग्रीको-रोमन याला (hospitable sea) 'मैत्रीपूर्ण/सौहार्दपूर्ण समुद्र'-युक्सेइनोस पोंतोस (Εὔξεινος Πόντος) असे म्हणत, की जो त्याआधीच्या त्याच्या 'वितुष्टी समुद्र' (inhospitable sea) - 'पोंतोस अक्सेइनोस', या नावाचा विरोधाभास आहे, ज्याचा प्रथम दाखला हा पिंडारच्या काव्यातून मिळतो (ई.सा. पूर्व पाचच्या शतकाचा पूर्वार्ध ~४७५ ई.सा.पूर्व). स्त्राबोच्या (७.३.६) मते काळ्या समुद्राला वितुस्टी म्हणण्याचे कारण की त्यात दिशाज्ञान होणे कठिण होते, तसेच त्याच्या तटांवर असंस्कृत जमातींचे वास्तव्य होते. मिलेशियाईंनी त्याच्या दक्षिण तटावर, पोंतुसवर, वसती करून त्याला ग्रीक सभ्यतेचा भाग बनविल्यानंतरच काळा समुद्र हा 'मैत्रीपूर्ण/सौहार्दपूर्ण' या नावाने ओळखला जाऊ लागला.

अशीही शक्यता आहे की, अक्सेइनोस (inhospitable) हे नाव शब्दव्युत्पत्तीशास्त्राप्रमाणे सिथियन इरानिक axšaina-'धूसर','अंधार', पासून आले असावे. म्हणूनच, काळा समुद्र हे नाव प्राचीन असण्याची शक्यता आहे.

ओर्टेलिसेस थीएट्रुम (Ortelis's Theatrum) मधील 'एशिया नोव्हा डिस्क्रिप्टो' (Asiae Nova Descripto) या नावाचा इ.स. १५७० या काळातील नकाशात काळ्या समुद्राला 'मार माज्जोर' (Mar Maggior) असे नाव आहे.

भूगर्भशास्त्रीय माहिती

बाह्य दुवे