Jump to content

काळभैरव

काळभैरव

वाहनकुत्रा (श्वान)
शस्त्रखट्वांग , त्रिशूल
पत्नीत्रिपुरभैरवी
या देवतेचे अवताररुद्र
या अवताराची मुख्य देवताशिव
मंत्रॐ काल भैरवाय नमः

काळभैरव एक तांत्रिक देवता आहे; हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून कालभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा, ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.

भैरवचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो. (भय + रव = भैरव अर्थात् भय पासून रक्षा करणारा). हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले आते.[१]वज्रयान बौद्ध धर्मात, त्यांना बोधिसत्व मंजुश्री यांचा क्रोधापासुन उत्पत्ती मानले जाते आणि त्यांना हेरुका, वज्रभैरव आणि यमंतका म्हणूनही ओळखले जाते.

त्याची पूजा भारत, श्रीलंका आणि नेपाळ तसेच तिबेटी बौद्ध धर्मात केली जाते.[२]

पौराणिक कथा[१]

पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले. म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला. तोच दमनक वा तातिरी हा वृक्ष होय. त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फल मिळणार नाही, असा शिवाने उःशाप दिला. ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्मला, त्याने ब्रम्हाचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले. सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही. शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रम्हाचे मस्तक जेथे ठेवले, तेथे कपालमोचनतीर्थ बनले. कालिकापुराणाच्या मते पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला, त्याचा जन्म रात्रीच्या चौथ्या प्रहरी झाल्याचे मानले जाते. कार्तिक वद्य अष्टमीला भैरवजयंती हे काम्यव्रत केले जाते.

गळ्यात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार, आठ, बारा वा अधिक हातांतून तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इ. आयुधे ५ चेहरे इ. रूपांतील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो. दांडगाई करणाऱ्या माणसाला ‘टोळभैरव’ म्हणतात, याचे कारणही भैरवाची उग्रताच होय. महाराष्ट्रातील त्याच्या मूर्ती नग्न, तर ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या असतात. तेथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या, तर काही मूर्ती तिसरा डोळा आणि मिशा यांचा अभाव असलेल्या असतात. राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती वा तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो, म्हणून त्याला श्वाश्व (कुत्रा हा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे, तो) म्हणतात. तो शैवमंदिरांचा द्वारपाल व शक्तिपीठांचा संरक्षक आहे, भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ मानली जाते. शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याला आवाहन केले जाते.

संस्कृत शब्द[१]

भैरव हा शब्द भीरु (भित्रा) या संस्कृत शब्दापासून बनल्यासारखे दिसते आणि कोशकारांचेही तसेच मत आहे परंतु भीरु म्हणजे भित्रा आणि भैरव म्हणजे भीषण असा त्या दोन शब्दांच्या अर्थांत पूर्णपणे विरोध दिसतो. त्यामूळेच भैरों, बहिरोबा वा भैरोबा या ग्रामदेवतेचे शिवाशी तादात्म्य मानले गेले, तेव्हाच त्या देवतेच्या देशी नावाचे भैरव असे सांस्कृतिकरण झाले असण्याची शक्यता आहे.

भैरव शब्दाचे भैरवा असेही स्त्रीलिंगी रूप असून दुःखाची देवता निर्ऋती व अप्सरांचा एक वर्ग असे त्याचे अर्थ आहेत.

काल भैरव, वसन्तपुर दरबार क्षेत्र (बसंतपूर, काठमांडू,नेपाळ )

शैव धर्म

शैव आगमांनुसार एकूण चौसष्ट भैरवांचे आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना अष्टभैरव असे म्हणतात. तंत्रग्रंथांनुसार ६४ भैरव हे ६४ योगिनींचे स्वामी असतात. तर या सर्व भैरवाचे प्रमुख म्हणजे कालभैरव आहेत असे मानले जाते. अष्टभैरवांच्या नावांविषयी बरेच मतभेद आहेत. संहार वा महासंहार, असितांग, रूरू, काल, क्रोध, ताम्रचूड, कपाल, चंद्रचूड, रुद्रभैरव, चंड, उन्मत्त व भीषण या नावांपैकी वेगवेगळ्या आठ नावांचा अष्टभैरवांत समावेश केला जातो.[३] विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लम्बित, देव, उग्र व विघ्न या प्रत्येकाला शेवटी ‘राज’ हे पद जोडूनही ही यादी केली जाते. शांतिकर्मात व शैव व्रताच्या उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते.

चौसष्ट भैरवाचे प्रमुख असलेल्या कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हणले जाते. त्याला पापभक्षण, आमर्दक, काळराज इ. नावेही आहेत. काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावयाचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा, अशी प्रथा आहे. उज्जैनजवळील भैरवगढ या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते. आश्विन, कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते. शेंदूर व तूप यांनी संतुष्ट होणारा एक बालभैरवही आहे. नेपाळमधील नेवार लोक वीरभद्राचे रूप असलेल्या पाचलीभैरवाची पूजा करतात. सूर्य व शिव यांचे संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंडभैरवाची त्रिमुखी मूर्ती आढळली आहे. शिवाचे बटुकभैरव नावाचे एक तामसरूपही आढळते. दक्षिण भारतातील शैव मंदिरांची रक्षकदेवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात. राजस्थानात भूतपिशाचांना ताब्यात ठेवणारे काला व गोरा असे दोन भैरव असून माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो. मुसलमान लोक यतिभैरवाची उपासना करतात.

काल भैरव, वसन्तपुर दरबार क्षेत्र (बसंतपूर, काठमांडू,नेपाळ )

‘भीषण गोष्टींना भिवविणारा’ या अर्थाने विष्णू व शंकर यांना भैरवतर्जक म्हणले जाते. कालिकापुराणानुसार वारणासीचा राजा व खांडवनाचा निर्माता विजय हा भैरवाचा वंशज होता. भैरव हे नाव धारण करणारे भैरवपुराण, भैरवतन्य इ. ग्रंथ आढळतात. भीतीची भावना निर्माण करणाऱ्या संगीतातील रागाला भैरव असे नाव आहे.

भैरवी हे भैरव या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असून दुर्गेचे एक रूप, महाविद्यांपैकी सहावी देवी, शिवाच्या दहा शक्तींपैकी एक, आठ अबांपैकी एक, नित्य प्रलय घडवून आणणारी मृत्युशक्ती, दुर्गेच्या महोत्सवात दुर्गेचे काम करणारी १२ वर्षांची मुलगी, हिंदुस्थानी संगीतातील एक राग इ. अर्थांनी हा शब्द वापरला जातो. काशीला मरण पावलेल्या व्यक्तीला सद्‌गती मिळण्यासाठी भैरव ज्या यातना भोगावयास लावतो, त्यांना भैरवी यातना म्हणतात.

भैरवनाथाची मंदिरे

महाराष्ट्रात भैरवनाथाची मंदिरे खालीलप्रमाणे आहेत.

  • (आगडगाव) (अहमदनगर)
  • (सोनारी) (उस्मानाबाद)
  • . (मेडद) (माळशिरस)
  • .(जातेगाव) (अहमदनगर)
  • (धारूर) (उस्मानाबाद
  • (हिप्परगा) (सोलापूर)
  • (थोरगव्हाण) (जळगाव)
  • (देवीभोयरे) (अहमदनगर)
  • (वीर) (पुरंदर, पुणे)
  • (रिळे) (बत्तीस शिराळा)
  • (वडनेर भैरव) (चांदवड - नाशिक)
  • (भैरोबा अंकोली)(सोलापूर तालुका मोहोळ)
  • (खरसुंडी) (सांगली)
  • यवतेश्वर सातारा
  • आसगाव ता. जि. सातारा.

हे सुद्धा पहा

संदर्भ यादी

  1. ^ a b c "भैरव". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-03 रोजी पाहिले.
  2. ^ "Bhairava". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-05.
  3. ^ "भैरव". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-02.