कालानमक तांदूळ
कलानमक हा नेपाळ आणि भारतात लागवड केला जाणारा एक सुगंधित तांदूळ आहे. या तांदळाचा भुसा काळ्या रंगाचा असल्याने याचे नाव कालानमक चावल असे पडले आहे. बौद्ध काळापासून (600 ईसापूर्व) या जातीची लागवड केली जात आहे. हे नेपाळच्या हिमालयी तराईमध्ये म्हणजे कपिलवस्तु आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये लोकप्रिय आहे. उत्तर प्रदेश मध्ये हा सुगंधित काळा मोती चावल म्हणून ओळखले जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या स्पेशॅलिटी राईस ऑफ द वर्ल्ड या पुस्तकात हे वैशिष्ट्यीकृत करण्यात आले आहे.
या वाणाखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने घट झाली असून, हे वाण पुढील काही कारणाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे:
- १९९८ आणि १९९९ मध्ये पॅनिकल ब्लास्ट महामारी.
- पिकाच्या जास्त उंचीमुळे पीक लवंडते.
- दीर्घकालावधी चे पीक. (६ ते ७ महिने)
- निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि संशोधनाचा अभाव.
सिद्धार्थ नगर, संत कबीर नगर, महाराजगंज, बस्ती, गोंडा आणि गोरखपूर या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कपिलवस्तु आणि यूपीच्या तराई पट्ट्यात कालानमक चे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात होते. इ.स. १९९० पर्यंत, सिद्धार्थनगरमधील एकूण भात लागवडी च्या क्षेत्रफळाच्या १०% पेक्षा जास्त प्रांतात या जातीचा समावेश होता. तथापि, २००२ मध्ये या जिल्ह्यात या जातीचे एकरी क्षेत्र एकूण भात लागवडीच्या 0.5% पेक्षा कमी पर्यंत घसरले.
कालानमक तांदळाची लागवड बौद्ध काळापासून (600 ईसापूर्व) केली जात आहे. [१] कपिलवस्तुच्या उत्खननात कालानमकच्या साळी आणि दाणे सापडले. अलिगढवाच्या उत्खननादरम्यान कालानमकसारखे कार्बनयुक्त तांदळाचे धान्य सापडले.
GI टॅग
कलानमक तांदळाला भारत सरकारने २०१२ मध्ये भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान केला होता. कालानमक तांदूळ जेथे उत्पादित केले जाऊ शकते ते भौगोलिक क्षेत्र परिभाषित केले गेले. जो कालानमक तांदूळ या परिभाषित क्षेत्रात पिकवलेला आहे केवळ त्यालाच कालानमक तांदूळ असे लेबल केले जाऊ शकते. [२] GI टॅग कृषी, नैसर्गिक आणि उत्पादित वस्तूंसाठी वापरला जातो.
कालानामक भाताचे भौगोलिक क्षेत्र युपी मध्ये 26° 42′ उत्तर ते 27° 75′ उत्तर अक्षांश आणि 81° 42′ ते 83° 88′ पूर्व रेखांश दरम्यान आहे.
कालानमक तांदूळ यूपीच्या झोन 7 मधील 11 जिल्ह्यांसाठी मंजूर आहे. हे 11 जिल्हे गोरखपूर (देवरिया, गोरखपूर, महराजगंज, सिद्धार्थ नगर जिल्हे), बस्ती (बस्ती, संत कबीर नगर, सिद्धार्थ नगर जिल्हे) आणि देवीपाटन (बहराइच, बलरामपूर, गोंडा, श्रावस्ती जिल्हे) या विभागात आहेत.
कालानमक तांदूळ हा एक नॉन-बासमती तांदूळ आहे ज्याची लांबी मध्यम असून याचा दाणा पातळ आहे. केएन 3, बाउना कालानमक 101, बाउना कलानामक 102 आणि कालानमक किरण या कालानमकच्या चार जाती डॉ. आर.सी. चौधरी यांनी विकसित केल्या आहेत. कालानामक तांदळाचा सुगंध बुद्धाची देण असल्याचे म्हणले जाते. ही बासमती जातींपेक्षा मजबूत प्रजाती आहे. शिजल्या नंतर याच्या शिताची कमी वाढते, हे याचे गुणवत्तेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. [३] शिजवलेले कालानमक तांदळाच्या इतर जातींपेक्षा मऊ आणि फुगीर असते. बासमतीमध्ये 24% च्या तुलनेत अमायलोजचे प्रमाण 20% च्या जवळपास आणि जास्त आहे. अमायलोजच्या उच्च पातळीमुळे तांदूळ कडक आणि कोरडा होतो. 16% आणि 22% च्या दरम्यान मध्यम अमायलोज सामग्री असलेले तांदूळ सामान्यतः मऊ शिजवतात आणि धान्य अधिक सहजपणे चिकटतात.
आरोग्यदायी फायदे
कालानमक तांदूळ लोह आणि झिंक सारख्या सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे हा तांदूळ पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करतो असे म्हणले जाते. कालनामक तांदळाचे नियमित सेवन केल्याने अल्झायमर रोग टाळता येतो. त्यात ११% प्रथिने आहेत, जे सामान्य तांदूळ जातींपेक्षा जवळजवळ दुप्पट आहेत. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (49% ते 52%) आहे ज्यामुळे ते तुलनेने साखर मुक्त आणि मधुमेहासाठी योग्य आहे. भारत सरकारने २०१३ मध्ये आपली पोषण-शेती योजना घोषित केली, ज्याचा उद्देश समाजातील असुरक्षित वर्गाची पोषण स्थिती सुधारण्यासाठी गंभीर सूक्ष्म पोषक घटक देणाऱ्या अन्न पिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आहे. या योजनेसाठी निवडलेल्या पोषक पिकांपैकी कालानमक तांदूळ हे एक होते.
संदर्भ
- ^ Rediscovering Scented Rice Cultivar Kalanamak; Reproduced from Asian Agri-History Vol. 9, No. 3, 2005 (211–219)
- ^ GOVERNMENT OF INDIA GEOGRAPHICAL INDICATIONS JOURNAL NO. 48 NOVEMBER 29, 2012 / AGRAHAYANA 08, SAKA 1934
- ^ "संग्रहित प्रत". 2018-09-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-01-16 रोजी पाहिले.