Jump to content

कालभैरवाष्टक

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


कालभैरवाष्टक हे शंकराचार्यांनी रचलेले एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे. हे स्तोत्र, नऊ श्लोकांचे असून त्यातील पहिल्या आठ श्लोकात भगवान कालभैरवाची स्तुती असून नवव्या श्लोकात फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठण केल्याने त्यापासून मिळणारे फायदे होय.

काळभैरव ही देवता भगवान शंकराचा अवतार मानली जाते. कालभैरवाचे मंदिर काशी शहराच्या वेशीवर असून त्यांना काशीचे कोतवाल असे म्हणतात. ही भलेही उग्र आणि तापट देवता असली तरीही ती न्यायप्रिय असल्यामुळे आपल्या भक्तांचे रक्षण करते असे मानले जाते.[][]

स्तोत्रम्

ॐ देवराजसेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं
व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥१॥

अनुवाद: साक्षात देवराज इंद्र ज्यांच्या चरणांची सेवा करतात, ज्यांनी शरीरावर सर्परूपी यज्ञोपवीत, आणि डोक्यावर चंद्र धारण केलेले आहेत, दिशा हे ज्यांचे वस्त्र आहेत आणि नारदादी योगीवृंद ज्यांना आदराने वंदन करतात, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं
नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥२॥

अनुवाद: ज्यांना तीन डोळे आणि निळा कंठ आहे आणि ज्यांचे कोट्यवधी सूर्यप्रकाशासम तेज आहे, ते निश्चितच संसाररूपी भवसमुद्र तरून जाण्यास सहाय्यक आहेत. जे अक्षय असून काळाचे महाकाळ आहेत, ज्यांचे नेत्र कोमल आहेत, ज्यांचे त्रिशूळ समस्त विश्वाचा आधार आहे, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं
श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥३॥

अनुवाद: ज्यांनी हातात त्रिशूळ, भाला, पाश, दंड, इत्यादी धारण केलेले आहेत. सावळा रंग असून जे निरामय असून विश्वाच्या आरंभापासून अस्तित्वात आहेत, जे महापराक्रमी असून अद्भुत तांडव करतात, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं
भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥४॥

अनुवाद: जे आपल्या भक्तांना भुक्ती आणि मुक्ती प्रदान करतात, ज्यांचे स्वरूप प्रशस्त आणि सुंदर आहे, ज्यांचे चारही लोकांत सामावलेले आहे, जे आपल्या भक्तांवर ममत्वाचा वर्षाव करतात, ज्यांच्या कमरेला मंजुळ आवाजात किणकिणणाऱ्या घंट्या आहेत, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं
कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥५॥

अनुवाद: जे धर्ममार्गाचे पालक तथा रक्षक असून अधर्माचा नाश करतात, ते दिसण्यास आनंददायी असून भक्तांच्या जन्मोजन्मीच्या कर्मपाशाचा नाश करतात. सर्पांनी शरीर वेढल्यामुळे जे शोभून दिसताहेत, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं
नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम् ।
मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥६॥

अनुवाद: पायात रत्नजडित पादुका धारण केल्यामुळे जे सुशोभित झाले आहेत आणि नित्य निर्मल, अविनाशी, अद्वितीय असून भक्तप्रिय आहेत. जे मृत्यूचा अहंकार दूर सारून आपल्या भयावह दातांनी काळापासून भक्तांचे रक्षण करतात, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं
दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥७॥

अनुवाद: ज्यांच्या विकट हास्याने संपूर्ण ब्रम्हांड विदीर्ण होते आणि ज्यांच्या एका दृष्टीकटाक्षाने सर्व पापांचा नाश होतो, तसेच ज्याचे शासन कठोर असून आपल्या भक्तांना जो सर्व प्रकारच्या सिद्धी देतो, अशा या नरमुंड धारक काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं
काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं
काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे ॥८॥

अनुवाद: जो समस्त भूत संघाचा नायक असून विशाल किर्तीदायक आहे, तसेच तो काशीपुरीत राहणाऱ्या भक्तांच्या पाप-पुण्याचा हिशोब ठेवतो. ज्याला नीती आणि अनीतीच्या मार्गाची जाण आहे तसेच तो अत्यंत प्राचीन काळापासून जगाचा स्वामी आहे, अशा या काशीपुरीच्या कालभैरव स्वामींची मी आराधना करतो.

कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं
ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं
ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं नरा ध्रुवम् ॥९॥

अनुवाद: जे लोक अशा या मनोहर कालभैरवाष्टकाचे निरंतर पठण करतात, त्यांना ज्ञान तथा मुक्तीचा लाभ होतो. तसेच त्यांच्या सर्व शोक, मोह, दैन्य, लोभ, कोप आणि ताप इत्यादींचा नाश होतो. अशा प्रकारे हे लोक अंती कालभैरवाच्या चरणी आपले स्थान प्राप्त करतात.

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम् ॥

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Kalabhairava Ashtakam - Symbolisms of Kalabhairava Ashtakam" (इंग्लिश भाषेत). ८ मार्च २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "काल भैरव क्रूर नहीं, बड़े दयालु-कृपालु" (हिंदी भाषेत). ८ मार्च २०२१ रोजी पाहिले.