Jump to content

कार्तिक दीपोत्सव

उत्सवी दिवे

कार्तिक दीपम् हा भारत देशाच्या केरळ राज्यातील हिंदूंचा सण आहे. थ्रिकार्थिका, कार्थिकै विलाक्किडु या नावानेही तो ओळखला जातो. केरळच्या जोडीने तमिळनाडू आणि श्रीलंका येथेही हा उत्सव संपन्न होतो. तमिळ पंचांगानुसार कार्तिक महिन्यात म्हणजे ग्रेगोरिअन महिना नोव्हेंबर मध्य ते डिसेंबर मध्यापर्यत हा सण साजरा होतो.[] कार्तिक पौर्णिमेला कार्थिय्यायेनी भगवती देवीच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो. या महिन्याचे तमिळमधील नाव கார்த்திகை कार्तिकै असे आहे. आंध्र प्रदेश मधील तेलुगू कुटुंबातही कार्तिक महिन्याचे विशेष धार्मिक महत्त्व आहे.

स्वरूप

दिवाळीच्या दिवशी कार्तिक महिन्याचा प्रारंभ होतो आणि त्या दिवसापासून एक महिना हा उत्सव साजरा केला जातो. महिनाभर दररोज घराच्या दारामधे दिवे लावले जातात. या काळात दररोज दिवसभर व्रताचा भाग म्हणून उपवास केला जातो आणि रात्री एकदाच अन्नग्रहण केले जाते. उपवास सोडताना खीर इ. गोड पदार्थ आणि प्रामुख्याने मीठ नसलेले पदार्थ खाल्ले जातात. पौर्णिमेच्या दिवशी ३६५ वातींपासून तयार केलेली ज्योत शिवमंदिरात प्रज्वलित केली जाते. या व्रताचा भाग म्हणून अडई, अप्पम, दूध, फळे यांचा नैवेद्य दररोज गोरज काळी देवाला महिला अर्पण करतात आणि पणत्या लावतात.[]

धार्मिक महत्त्व

तिरूवन्नामलाई येथील रथ

कार्तिक महिना हा भगवान कार्तिकेयांच्या उपासनेशी जोडला गेला आहे. शिवांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यापासून कार्तिकेय या आपल्या पुत्राची निर्मिती केली अशी धारणा आहे. दुसऱ्या एका कथेनुसार सहा कृत्तिकांपासून सहा मुखे असलेल्या कार्तिकेयाची निर्मिती झाली अशीही आख्यायिका प्रचलित आहे. सहा कृत्तिकांच्या या संबंधामुळेच या देवतेचे कार्तिकेय हे नाव पडले आहे.[]

सणाचा इतिहास

संगम साहित्याच्या काळात इसवी सन पूर्व २००- इसवी सन ३०० या दरम्यान रचल्या गेलेल्या अगनानूरू या ग्रंथात या सणाचा उल्लेख सापडतो. दक्षिण भारतीय कालगणनेनुसार कार्तिक पौर्णिमेला हा सण साजरा केला जात असे.[] केरळमधील सर्वात प्राचीन सणांपैकी हा एक प्रमुख सण मानला जात असे. अविय्यर या कवयित्रीच्या कवितांमधे या सणाचे वर्णन आढळते.

उत्सवातील विविध संकल्पना

  • कार्तिक महिन्यातील या दीपोत्सवात प्रज्वलित केले जाणारे दिवे हे मांगल्याचे प्रतीक मानले जातात. त्यायोगे दुष्ट शक्ती पळून जातात अशी धारणा आहे.या निमित्ताने बहिण आपल्या भावाच्या कल्याणाची प्रार्थना करते आणि त्याच्यासाठी पणती लावते.
  • मालिवक्कू-तांदूळ पिठी, गूळ, वेलची पूड, तूप आणि सुंठ पूड घालून गोळा तयार केला जातो. या गोळ्याला पणतीसारखा आकार दिला जातो. या पणतीत तूप घालून ती प्रज्वलित करणे हे या सणाचे वैशिष्ट्य आहे.[]
  • तिरूवन्नामलाई येथील उत्सव-तिरूवन्नामलाई महादीपम् या पवित्र पर्वतीय उत्सवाचे विशेष महत्त्वआहे. या पर्वताला शिवलिंगस्वरूप मानले जाते. सुमारे ३५००किलो तूप वापरून महाज्योत प्रज्वलित केली जाते. अर्धनारीश्वरस्वरूप शिव यावेळी भक्तांना आशीर्वाद देतात अशी धारणा आहे.[][]
  • तमिळनाडूमधेही कार्तिक दीपम् उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. अप्पा कार्थिगै, वडई कार्थिगै आणि थिरू कार्थिगै असे तीन दिवस हा उत्सव होतो. शेवटच्या दिवशी मुख्य महापूजा संपन्न होते. पर्वतावरील मंदिरात महादीप प्रज्वलित केला जातो तो लांबच्या परिसरापर्यंत दिसू शकतो. भक्त या दिवशी मंदिरात जाऊन येथे प्रार्थना करतात. नैवेद्य अर्पण करतात.[]
  • कोळशापासून तयार केलेले घरगुती फटाके हे तमिळनाडू मधील या उत्सवाचे आकर्षण असते. कार्तिकेय छुत्रु असे त्याला म्हणले जाते.

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "2020 Karthigai Deepam | Karthikai Deepam Date and Time for New Delhi, NCT, India". Drikpanchang (इंग्रजी भाषेत). 2020-12-06 रोजी पाहिले.
  2. ^ Classic Cuisine and Celebrations of the Thanjavur Maharashtrians (इंग्रजी भाषेत). Notion Press. 2019-04-29. ISBN 978-1-68466-649-2.
  3. ^ Tales of Lord Kartikeya (इंग्रजी भाषेत). Pitambar Publishing. ISBN 978-81-209-0769-0.
  4. ^ Kerala State Gazetteer (इंग्रजी भाषेत). State Editor, Kerala Gazetteers. 1986.
  5. ^ "Karthigai Deepam Vidhi: Know how to celebrate this festival of lights". Times Now News (इंग्रजी भाषेत). 2021-10-14 रोजी पाहिले.
  6. ^ "The Hindu" (इंग्रजी भाषेत). Tiruvannamalai. 2019-12-10. ISSN 0971-751X.
  7. ^ Pilgrimage to Temple Heritage 2017 (इंग्रजी भाषेत). Info Kerala Communications Pvt Ltd. 2017-09-01. ISBN 978-81-934567-0-5.
  8. ^ Sri Venkateshwara (इंग्रजी भाषेत). Jaico Publishing House. 2014-01-07. ISBN 978-81-8495-445-6.