Jump to content

कारेन होर्नाय



अमेरिकन मनोविश्लेषक. बर्लिन (जर्मनी) येथे जन्मली. तिचे वडील नॉर्वेजियन आणि आई डच होती. बर्लिन विद्यापीठातून एम्.डी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर (१९१२) सिग्मंड फ्रॉइडचा जवळचा सहकारी कार्ल अब्राहम ह्याच्याकडून तिने मनोविश्लेषणाचे प्रशिक्षण घेतले. १९१५ च्या सुमारास बर्लिनमधल्या इस्पितळांतून काम केल्यानंतर १९२०–३२ ह्या कालखंडात मनोविश्लेषकाचा खाजगी व्यवसाय तिने केला ‘बर्लिन सायकोअनॅलिटिक इन्स्टिट्यूट ‘मध्ये अध्यापनही केले. त्यानंतर ‘इन्स्टि- ट्यूट फॉर सायकोअनॅलिसिस’ ह्या संस्थेची सहसंचालक म्हणून ती अमेरिकेत गेली. १९३४ मध्ये ती पुन्हा आपला व्यवसाय खाजगी रीत्या करू लागली. ‘न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च’ ह्या संस्थेत तिने अध्यापनही केले.

नेक वर्षे मनोविश्लेषणाच्या क्षेत्रात काम केल्यावर फ्रॉइडच्या विचारांशी ठामपणे चिकटून राहण्यास विरोध केल्यानंतर तिने ‘असोसिएशन फॉर द ॲड्व्हान्समेंट ऑफ सायकोअनॅलिसिस’ ह्या नावाने आपला स्वतंत्र गट संघटित केला. जीवशास्त्रीय प्रचोदनांपेक्षा (ड्राइव्ह्ज) सामाजिक आणि परिसरीय परिस्थिती व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरवीत असते आंतरव्यक्तिगत( इंटरपर्सनल) नातेसंबंधांची ह्यात मोठी भूमिका असते मज्जाविकृती आणि विस्कटलेले व्यक्तिमत्त्व ह्यांच्यामागे हीच महत्त्वाची कारणे असतात, असे तिचे मत होते. कामप्रेरणा आणि मृत्युप्रेरणा ह्या संकल्पनांना फ्रॉइडने दिलेल्या महत्त्वालाही तिचा आक्षेप होता.

न्यूरॉटिक पर्सनॅलिटी ऑफ अवर टाइम (१९३७), न्यू वेज इन सायकोअनॅलिसिस (१९३९), अवर इनर कॉन्फ्लिक्ट्स (१९४५) आणि न्यूरोसिस अँड ह्यूमन ग्रोथ (१९५०) हे तिचे विशेष महत्त्वाचे ग्रंथ होत. ह्यांखेरीज सेल्फ अनॅलिसिस (१९४२) हा तिचा ग्रंथही उल्लेखनीय आहे.

होर्नायची मनोविश्लेषणप्रणाली एक मनोविश्लेषक म्हणून तिलाआलेल्या अनुभवांतून, तिने लिहिलेल्या अनेक लेखांतून आणि तिच्या उपर्युक्त पाच पुस्तकांतून विकसित झाली. न्यूरोसिस अँड ह्यूमन ग्रोथ ह्या पुस्तकात या प्रणालीचे पूर्ण रूप प्रत्ययास येते. वाढणे आणि आपल्या अंतःशक्ती विकसित करणे, हे मानवी जीवाच्या स्वभावातच असते, ही तिच्या विचारांची मध्यवर्ती कल्पना आहे.

ओक वृक्षाचे लहानसे बीभूमीत पेरले असता हवा, पाणी, माती ह्यांची अनुकूलता लाभल्यास त्याचा महान वृक्ष होतो तसेच माणसाचेही आहे. आदम आणि ईव्ह यांनी ज्ञानवृक्षाचे फळ खाऊन मूळ पाप (ओरिजिनल सिन) केल्यामुळे मनुष्य हा मुळातच पापमय आहे, ही पारंपरिक समजूत तिने नाकारली. मज्जाविकृतिबाबतचे तिचे विचार थोडक्यात असे :

मज्जाविकृतीचा (न्यूरोसिस) उगम बालपणात निकोप वाढीला प्रतिकूल ठरणाऱ्या परिसरात शोधावा लागतो. ह्या अशा परिसरामुळेच मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकृत वाढीची प्रक्रिया सुरू होते. मज्जाविकृती हीमाणसाचे सुख आणि सर्जनशीलता ह्यांत अडथळे आणते.

माणसाच्याव्यक्तिगत, तसेच एखाद्या समूहाच्या सामूहिक जीवनात दुःख आणण्यास कारणीभूत ठरते. माणसाच्या नैसर्गिक विकासाला प्रतिकूल आणि अनेकदा थेट विरोधी परिसर घडवून आणण्याच्या संदर्भात आंतर कौटुंबिक घटक विशेष कारणीभूत ठरतात.

आईवडिलांचा मृत्यू, त्यांचा होणारा घटस्फोट, त्यांनी टाकून दिल्यामुळे त्यांच्यापासून अलग होणे, बालकांचे लैंगिकशोषण, आईवडिलांमध्ये होणारी कडाक्याची भांडणे, ह्यांमुळे बालकाच्यामनाला तीव्र धक्का बसतो. कुटुंबात अनुभवास येणारी संवेदनशून्यता, चिंता निर्माण करणारा आत्यंतिक एकाकीपणा, पक्षपात, वागण्यातील विसंगतींमुळे आईवडिलांपैकी एकाकडून वा अनेकदा उभयतांकडून बालकाला मिळणारे परस्परविसंगत संदेश, त्याच्याकडून केल्या जाणाऱ्या अवास्तव आणि अतिरेकी अपेक्षा ही कारणे अधूनमधून येणाऱ्या प्रक्षोभक घटनांपेक्षा अधिक महत्त्वाची आहेत.

त्यांच्यामुळे बालक अधिकाधिक अगतिक होत जाते. हे जग शत्रुवत् आणि प्रेमशून्य असून त्यात आपण एकाकी पडत चाललो आहोत, अशी त्याची भावना होते. ह्यातूनच मज्जाविकृतीची मुळे धरतात. बालकाची जगाकडे पाहण्याची वृत्तीही शत्रुत्वाची होते.

ते अत्यंत चिंतातुर बनते. त्यामुळे असे बालक आपले आई वडील, भावंडे आणि इतर माणसे ह्यांच्याशी स्वतःला स्वाभाविक रीत्या जोडून घेऊ शकत नाही. त्याच्या आंतरिक गरजा, इच्छा, भावना मोकळ्या मार्गांनी प्रकट होऊ शकत नाहीत. उलट, आपली सुरक्षितता हा त्याच्या आत्यंतिक काळजीचा विषय बनूनराहतो. प्रेम देण्यासाठी आणि प्रेम घेण्यासाठी जी उत्स्फूर्तता आवश्यक असते, ती त्याच्यापाशी राहत नाही.

त्या उत्स्फूर्ततेची जागा कोणालातरी सतत चिकटून राहणे, कोणाला तरी शरण जाणे आणि कोणाच्यातरी आज्ञा निमूटपणे पाळणे अशा वृत्ती घेतात. त्याचप्रमाणे स्वतःसाठी ठामपणे उभे राहणे, आपल्या हक्कांसाठी लढणे ह्यांच्या जागी अवज्ञाकरणे, अनादर प्रकट करणे, हल्ला करणे अशी प्रवृत्ती दिसून येते. कोणताही अडथळा न येता एकट्याने खेळणे हे निकोप मनाच्या मुलात दिसूनयेते परंतु अतिशय काटेकोरपणे दुसऱ्यापासून अंतर राखणे, कमालीची गुप्तता पाळणे आणि स्वतःला गुंतवून न घेणे हे प्राकृत वा सामान्य( नॉर्मल) मानता येणार नाही.

जगाशी संबंध ठेवण्याचे हे सर्व मार्ग एकाच वेळी बालकापुढे असल्यामुळे परस्परविसंगत अशा सक्तियुक्त वेदनांच्या( कंपल्सिव्ह ड्राइव्ह्ज) संघर्षात मूल सापडते. त्यामुळे आधीच भयग्रस्त, प्रक्षुब्ध आणि दुबळे झालेले मूल अधिकच दुबळे होऊन जाते. ह्यास्थितीला होर्नाय ‘मूलभूत संघर्ष’ (बेसिक कॉन्फ्लिक्ट) असे म्हणते.

ह्या संघर्षातून सुटका करून घेण्यासाठी अबोध मनाच्या पातळीवर स्वयंचलितपणे काही प्रयत्न सुरू होतात. निरोधनाच्या (रिप्रेशन) मार्गानेदोन वा तीन प्रवृत्तींमधल्या संघर्षाची जाणीव नष्ट करता येते : उदा दुसऱ्यांच्याइच्छेपुढे मान झुकवून ‘चांगलं पोर’ असे म्हणवून घेणे, बंडखोर वृत्तीने प्रतिकार करणे किंवा पूर्णतः अलिप्त, उदासीन प्रवृत्ती धारण करणे.


तथापि दुर्दैवाची गोष्ट ही आहे, की निरोधनामुळे अधिकच दुबळे झालेले मूल स्वतःच्या काही पैलूंना जाणू शकत नाही. निरोधनामुळे संघर्ष संपतनाही. तो फक्त आतल्या आत गाडला जातो. संघर्षातून बाहरे पडण्यासाठी मुलाला एकात्मता, सामर्थ्य, स्वतःचे मूल्य आणि स्वतःची ओळखज्यामुळे मिळेल असा काही पर्याय मिळायला हवा.

अबोध मनाच्यापातळीवर स्वतःच्या आदर्शीकृत प्रतिमेची (आय्डिअलाइज्ड इमेज) निर्मिती हा तो पर्याय.

ह्या आदर्शीकृत प्रतिमेची घडण वास्तव आणि काल्पनिक अशा दोन्ही गुणांनी घडत असते. ह्या गुणांना अद्भुतरम्य आणि भव्य असे स्वरूप दिलेले असते. अद्भुतरम्यतेचे धुके विसंगतींना सुसंवादित्व देते. उदा., सक्तीची पराधीनता चांगुलपणाचे रूप घेते. सक्तीतून आलेली, दुसऱ्याला या-ना त्याप्रकारे कमी लेखण्याची प्रवृत्ती स्पष्टवक्तेपणा ठरते.

सक्तीतून येणारे एकाकीपण म्हणजे स्वातंत्र्य होते. थोडक्यात मज्जाविकृत मनुष्य स्वतःच्या मानसिक गरजांचे रूपांतर अजाणता सद्गुणांमध्ये करीत असतो. माणसाची ऊर्जा स्वतःमध्ये असलेल्या अंतःशक्तींना साकार करण्याऐवजी स्वतःच्या आदर्शीकृत प्रतिमेबरहुकूम स्वतः होण्यासाठी धडपडू लागतो, तेव्हा तो अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक पाऊल उचलीत असतो कारण यानंतरचे त्याचे उद्दिष्ट केवल, पूर्णतावेधी आणि अशक्य कोटीतले असे असते.

त्याला ईश्वरासारखे सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञ व्हायचे असते.आपण एक स्खलनशील मर्त्य आहोत आपली बुद्धिमत्ता, ऊर्जा आणि इच्छाशक्तीही मर्यादित आहे, ही त्याची जाणीव अंधुक होत जाते आणि अखेरीस नाहीशी होते.

त्याचा भव्यदिव्यतेचा शोध त्याला अटळपणे वाढत जाणाऱ्या गुंतागुंतीच्या जाळ्याकडे घेऊन जातो. त्याच्या पदरी वैफल्य येते आणि त्याचे स्वतःबरोबरचे आणि इतरांबद्दलचे नातेसंबंध विकृत होतात.

जेव्हा तो भव्यदिव्यतेच्या मार्गावरून चालू लागतो, तेव्हा तो मज्जा-विकृत गर्वाने (न्यूरॉटिक प्राइड) पछाडला जातो. त्याच्या आदर्शीकृत ‘स्व’च्या गुणांबद्दल वाटणारा हा गर्व असतो पण हे गुण मुख्यतःत्याच्या कल्पनेतलेच असतात. हा गर्व म्हणजे त्याच्यापाशी नसलेल्या आत्मविश्वासाचा पर्याय म्हणून निर्माण झालेला असतो.

त्यातून त्याला एकात्मतेची, स्वतःच्या महत्त्वाची आणि सामर्थ्याची जाणीव मिळत राहते पण ही जाणीव खोटी असते. कारण तिला वास्तवतेचा भक्कम आधार नसतो. शिवाय ह्या गर्वाला कधीही दुखापत होण्याची शक्यता असते. ह्यातून दोन गोष्टी घडतात :

(१) आपल्या गर्वाला धक्का लागू नये म्हणून तो सतत प्रयत्नशील असतो.

(२) जर कुणी त्याच्या गर्वाला धक्का लावला, तर या–ना त्याप्रकारे त्या माणसावर कुठे तरी सूडबुद्धीने विजय मिळवतो आणि हा विजय त्याचा गर्व शाबूत ठेवतो. ह्या माणसाला तो प्रत्यक्षातजो काही असतो, त्याचा राग असतो. तो त्याच्या वास्तविक स्वरूपाचा तिरस्कार करतो.

पूर्णतेच्या आणि श्रेष्ठत्वाच्या उंच शिखरावरून तो पायथ्याशी असलेल्या आपल्या खऱ्या ‘स्व ‘कडे पाहात असतो. त्यामुळे स्वतःचे आदर्शीकरण आणि मज्जाविकृत गर्व ह्यांचा एक अटळ परिपाक म्हणजे स्वतःविषयीचा तिरस्कार. मज्जाविकृत गर्व आणि आत्मघृणा ह्या एकाच नाण्याच्या दोन खोट्या बाजू म्हणता येतील. त्याच्या आत्मघृणेचे प्रकटन अनेक प्रकारांनी होत असते.

तो स्वतःपाशी अत्यंत कठोर, निर्दयी स्वरूपाच्या मागण्या करतो. त्या पूर्ण होण्यासारख्या नसतात पण तरीही तो त्या अपयशाबद्दल स्वतःला शिक्षा करीत असतो. सततच्या आत्मदमनाचे जीवन तो जगत असतो. स्वतःला तो नेहमीच कमी लेखून असतो. अशा अवस्थेतला विद्यार्थी एखाद्या विषयात १०० पैकी ८० गुण मिळाले, तर आपले यश फडतूस आहे, असे समजतो. आत्मघृणेचा आणखी एक प्रकार म्हणजे स्वतःवर सतत काहीतरी आरोप करत राहाणे आणि अपराधाची यातनामय जाणीव बाळगत राहाणे.

स्वतःचा छळ करण्याच्या ह्या प्रवृत्तीतून विविध व्याधीभ्रम (हायपोकोंड्रायसिस) आणि त्यातून येणारे भय जन्माला येऊ शकते. उदा., थोडे पाय दुखले, तर आपल्याला पोलिओ झाला, अशी भावना होणे थोडी छातीतून कळ आली, तर आपल्याला हृदयविकार झाला असे मानणे. असा माणूस आयुष्याचा आस्वादही नीट घेऊ शकत नाही. आत्मघृणेचा सर्वांत टोकाचा मार्ग म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न करणे.

आत्मघृणेतून येणाऱ्या सर्व यातनांतून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मज्जाविकृत माणूस स्वयंचलितपणे आणि अबोधपणे आपल्या दुःखांचेखापर इतरांवर फोडू लागतो.

मज्जाविकृत आत्मसमीक्षा करतो पण निकोप, प्राकृत माणसाच्याविधायक आत्ममूल्यमापनासारखी ती नसते. ती विध्वंसक असते. क्वचित कधीतरी आपण स्वतःकडे अतिरेकी मागण्या करतो आहोत ह्याचीजाणीव त्याला होतेही पण स्वनिर्मित आदर्शीकृत प्रतिमा प्रत्यक्षात आणण्यातील प्रक्रियेतल्या अविवेकीपणाची आणि विध्वंसकतेची त्याच्या आवाक्याची जाणीव सहसा होत नाही.

आपली आदर्शीकृत प्रतिमा प्रत्यक्षात आणण्याच्या प्रयत्नात काही चूक आहे, ह्याचे आकलन त्याला होतच नाही. लोकांची पसंती मिळवण्यात चूक काय ⇨ असा त्याचा प्रश्न असतो. अशा माणसांची आणखी एक कृती म्हणजे मला जे हवे, ते मला मिळण्याचामला हक्कच आहे, असे समजणे. उदा., डॉक्टरांनी मला भेटण्याची वेळ सकाळची दिलेली आहे पण मला दुपारची हवी आहे. ती मिळालीचपाहिजे.

मग डॉक्टरांना वेळ असो वा नसो ! मला एका विशिष्ट दिवशीकुठे तरी जायचे आहे. त्या दिवशी पाऊस पडता कामा नये. रस्त्यात वाहनांची कोंडीही मुळीच असता कामा नये. ह्या वृत्तीला होर्नाय ‘मज्जा-विकृत दावे’ (न्यूरॉटिक क्लेम्स) म्हणते. पण अशा दाव्यांना बाह्य जगाकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मज्जाविकृताच्या पदरी वैफल्यआणि निराशाच येते. आपल्यावर अन्याय होतो आहे, अशी त्याची भावना होते. चुकून कधी तरी त्याच्या दाव्याप्रमाणे घडले, तर मात्र तो फार आनंदित होतो.

आपली आदर्शीकृत प्रतिमा खरीच आणि योग्यच ठरलेली आहे अशी त्याची खात्री पटते आणि मज्जाविकृत दावे हा त्याच्या मानसिकतेचा एक आवश्यक घटक होऊन जातो.

मज्जाविकृत गर्व, आत्मघृणा, आदर्शीकृत प्रतिमेच्या अवघड मागण्या, मज्जाविकृत दावे हे सर्व मिळून मज्जाविकृताच्या जीवनातली एक मानसिक व्यवस्था तयार होते आणि गर्व हे ह्या व्यवस्थेचे अधिष्ठान असल्यामुळे होर्नायने तिला ‘गर्व व्यवस्था’ (प्राइड सिस्टिम) म्हणले आहे.

न्यू यॉर्क येथे ती निधन पावली.