Jump to content

काबुकी

काबुकी एक लोकप्रिय जपानी नाट्यप्रकार आहे. काबुकी हा शब्द ‘काबुकू’ या क्रियापदापासून तयार झाला. त्याचा मूळ अर्थ ‘प्रवृत्त’ किंवा ‘उद्युक्त करणे’ असा आहे. ही व्युत्पत्ती फारशी खात्रीलायक नाही. काबुकू हे क्रियापद निदान सध्यातरी जपानी भाषेत अस्तित्वात नाही. नवव्या शतकात नटांचा निर्देश करण्यासाठी ही संज्ञा वापरत असल्याचा पुरावा मिळतो. पुढे सतराव्या शतकात त्याचा अर्थ ‘चमत्कृतिजन्य’ असा होऊ लागला. त्यातच पुन्हा उत्तान शृंगारिक नृत्याविष्कारामुळे त्याला आत्यंतिक लैंगिकतेची अर्थच्छटाही प्राप्त झाली. अलीकडे मात्र काबुकी शब्दातील तीन ध्वनींवर आधारित असा या संज्ञेचा अर्थ करण्यात येतो, तो असा : ‘का’ म्हणजे गीत, ‘बु’ म्हणजे नृत्य व ‘की’ म्हणजे अभिनय-कौशल्य. या वरून गीत-नृत्य-नाट्य यांचा संगम म्हणजे काबुकी असे समीकरण रूढ झाले आहे.

उगम

काबुकी-नाट्यप्रकाराची सुरुवात १५९६ मधील एका प्रसंगातून झाली, असे म्हणतात. तो प्रसंग असा : एक दिवस ओकुनी नावाची एक शिंतो धर्मोपदेशिका एका नदीच्या शुष्क पात्रात नाचून-गाऊन बुद्धाची प्रार्थना करीत होती. तिच्या या नृत्याभिनयाने नदीतीरावरील हिरवळीवर बसलेल्यांना चांगलीच भुरळ घातली. विशेष म्हणजे तिचा एक प्रियकर नागोया सान्‌झाएमोन हा तिच्या नृत्याने आकर्षित झाला. पुढे त्याने तिच्या नृत्याला नो नाट्य या प्राचीन जपानी नाट्यप्रकारातील विशेषांची व तत्कालीन प्रसिद्ध लोकनृत्ये यांची जोड दिली. ओकुनीच्या या नृत्यामुळे सामान्यजनांची चांगलीच करमणूक होऊ लागली. त्यामुळे त्याची लोकप्रियता बरीच वाढली. या तिच्या काबुकी नृत्यात स्त्रिया पुरुषांचे व पुरुष स्त्रियांचे काम करीत असत, पुढे ओकुनीने आपला एक नटसंचच तयार केला व १६०३ मध्ये जपानभर दौरा करून सारा जपान तिने आपल्या नृत्य-नाट्याने भारून टाकला. त्याचवर्षी ६ मे रोजी क्योटो येथील राजवाड्यातही ओकुनीने शाही निमंत्रणावरून आपल्या नृत्य-नाट्याचा प्रयोग केला. १६०४ मधील उन्हाळ्यात तिने क्योटो येथे आपल्या या नृत्य-नाट्याच्या कार्यक्रमासाठी `नो' नाट्यगृहाच्या धर्तीवर एक तात्पुरत्या स्वरूपाचा  काबुकी रंगमंचही बांधून काढला. हाच पहिला काबुकी रंगमंच होय.

विस्तार व प्रगती

‘काबुकी’च्या लोकप्रियतेमुळे पुढे पुढे गैशांनीही या कलाप्रकाराचा आश्रय घेतला व ठिकठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. परिणामतः काबुकी-नाट्यात उत्तान शृंगार, क्षुद्र विनोद व अश्लीलता यांनी थैमान घातले. त्यामुळे शासनाने त्यास हरकत घेतली आणि २३ ऑक्टोबर १६२९मध्ये ‘ओन्ना काबुकी’ म्हणजे ‘स्त्रियांच्या काबुकी’ वर कायद्याने बंदी घालण्यात आली. काबुकीमध्ये स्त्रियांनी काम करणे बंद झाल्यामुळे स्वरूपसुंदर युवक आपल्या कपाळावर लांबसडक केसांची आकर्षक झुलपे सोडून व स्त्री- वेशभूषा परिधान करून काबुकी नृत्ये-नाटके करू लागले. त्याला ‘वाकाशू काबुकी’ म्हणत, परंतु त्याच कारणाकरिता शासनाने १६३० मध्ये त्यावरही बंदी घातली. तेव्हा लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर गेलेला हा नाट्यप्रकार टिकवून ठेवण्यासाठी वृद्धांनी त्यात पुढाकर घेतला व स्त्री-पुरुषांची सोंगे घेऊन त्यांनी काबुकी टिकवून धरली. याला ‘यारो काबुकी’ म्हणत. यातील मूक अभिनय, नृत्यातील पदन्यास आणि प्रणयरम्य गूढगुंजनात्मक गीते यांमुळे त्याकाळी काबुकीने जनमनाची चांगलीच पकड घेतली होती खरी; परंतु पुढे सतराव्या शतकांत काष्ठपांचालिकांच्या प्रयोगांचा परिणाम होऊन काबुकीला जरा उतरती कळा लागली. मग काष्ठपांचालिक नाट्याकडून कथानक व ‘नो’ नाट्याकडून रंगमंच घेऊन काबुकीने आपला नवा संसार उभा केला व तेव्हापासून आजतागायत आपले अस्तित्व व वैशिष्ट्य काबुकीने टिकवून ठेवले आहे. दुसऱ्या महायुद्धकाळात जपानी सरकारने राजकीय प्रचारासाठी काबुकीचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. महायुद्धानंतर काही काबुकी नाटकांवर बंदीही घालण्यात आली होती. या शतकाच्या उत्तरार्धात या नाट्यप्रकारास आधुनिक वळण देण्याचा प्रयत्न होत आहे.

स्वरूप

पुराणकालीन कथाप्रसंग, शोकांतिका ऐतिहासिक कथानके व सामाजिक प्रेमकथा हे आजच्या काबुकीचे विषय असून त्यांचा आविष्कार नृत्य व संगीत यांच्या द्वारे ढंगदार शैलीने करण्यात येतो. कथानक अगदी साधे आणि सर्वसाधारण एकाच प्रसंगावर आधारलेले असते. त्यातच मग विदूषकी प्रहसन, परंपरागत पद्धतीची भारी व भडक रंगांची   वेशभूषा, लेप, मुखवटे, रंगीबेरंगी व झगमगीत रंगमंच या साऱ्यांचे वैचित्र्यपूर्ण संमिश्रण केलेले असते. अलीकडील काबुकीमध्ये प्राचीन काबुकीच्या मानाने संवाद अधिक असतात. त्यांत वाङ्‍मयीन मूल्यांपेक्षा प्रायोगिक मूल्यांवर, विशेषतः नटाच्या नृत्याभिनयावर, अधिक भर देण्यात येतो. नटही आपल्या ठसठशीत व प्रतीकात्मक नृत्याभिनयाद्वारे उत्कृष्ट प्रकारे कथाकथन करीत असतो. त्याचा भर हालचालीपेक्षा मुद्रा व अभिनय यांचा विस्तार करण्यावर अधिक असतो व त्यातून तो भावदर्शन व नाट्य-सौंदर्य यांची एकरूपता साधतो. कथाकथनाचे मुख्य काम नटाकडे नसते. ते काम रंगमंचाच्या डाव्या (प्रेक्षकांच्या उजव्या) बाजूला बसलेले तीन कथावाचक करतात.

काबुकी नाट्यप्रकारात परंपरेने सर्वांत अधिक महत्त्व नटांना प्राप्त झाले आहे. तसेच त्यातील ‘नृत्य’ घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नृत्यप्रकारांची विविधताही त्यात आढळते. म्हणूनचसंगीतिकेपेक्षा हा प्रकार वेगळा व अधिक व्यापक ठरतो. फिरता रंगमंच, किमयावाहक (ट्रॅप-लिफ्ट) व हानामिची ही काबुकीची खास वैशिष्ट्ये आहेत. ‘हानामिची’ म्हणजे ‘पुष्पपथ’. नटांचे रंगमंचावरील गमनागमन व जनान्तिकासारखे प्रसंग यांसाठी या ‘पुष्पपथा’चा उपयोग करतात. फिरता रंगमंच व किमयावाहक यांचे कार्य दृश्यांतराच्या दृष्टीने परस्परपूरक असते. दोहोंच्या संयुक्त कार्याने रंगमंचावर घडून येणारा परिणाम अतिशयच नेत्रोद्दीपक असतो. रंगमंचावर नटांचे अवजड पोशाख संभाळण्यासाठी आणि इतर गोष्टींची आवराआवर करण्यासाठी नखशिखांत काळा पेहराव केलेल्या आणि डोक्यावर काळा बुरखा घेतलेले मुली ये-जा करीत असतात. त्या अदृश्य असतात असे प्रेक्षकांनी मानायचे. काबुकी रंगमंच रुंदीला जास्त व त्यामानाने उंचीला कमी असतो. एकाच वेळी सु. ३,००० प्रेक्षकांना बसण्याची सोय असलेल्या टोकिओमधील एका ‘काबुकी-झा’ म्हणजे काबुकी नाट्यगृहातील रंगमंचाची रुंदी सु. २७⋅३० मी. असून उंची मात्र अवघी सु. ७⋅५ मी. आहे. तेथील ‘हानामिची’ हा भरपूर रुंदीचा व सु. १४ मी. लांबीचा मार्ग रंगपीठाच्या उजव्या बाजूने निघून, प्रेक्षकांमधून थेट प्रेक्षागाराच्या मागे जाऊन भिडतो. या ‘हानामिची’ ख उपयोग रंगपीठाप्रमाणेही होतो. यावरून पात्रांचे आगमन-निर्गमन तर चालू असतेच, शिवाय त्यावर विविध निसर्गदृश्येही प्रसंगोपात्त उभी करण्यात येतात. या निसर्गदृश्यांत मग कधी डोंगरदऱ्यांचा मार्ग, घनदाट वृक्षराजी, समुद्रावरील खाड्या, तर कधी राजप्रासादाच्या आवारातील सुशोभित मार्ग यांचाही समावेश केलेला असतो आणि अश्वारूढ योद्धा, पालखीस्थ श्रेष्ठी आणि त्याचा लवाजमा, नटांचा समूह यांचेही वास्तव्य या हानामिचीवर अधूनमधून असतेच. हानामिचीमुळे प्रेक्षक व नट यांचे सामीप्य साधून रंगमंचावर त्रिमितीय स्वरूपाचा परिणाम साधला जातो.

नृत्य, नाट्य, संगीत, दृश्यसौंदर्य इ. अंगांनी परिपूर्ण असलेला हा नाट्यप्रकार जागतिक रंगभूमीच्या क्षेत्रात अनन्यसाधारण  मानला जातो. या नाट्यप्रकारात लवचिकता, विकसनशीलता हेही गुण असल्याने आधुनिक काळातही तो प्रभावी ठरला.

संदर्भ

  1. Bowers, Faubion, Theatre in the East, New York, 1956.
  2. Ernst, Earle, The Kabuki Theatre, New York, 1956.
  3. Nicole, Allardayce, World Drama, London, 1949.
  4. Scott, A.C.The Kabuki Theatre of Japan, London, 1955.