कानू सन्याल
कानू सन्याल (इ.स. १९२९ - २३ मार्च, इ.स. २०१०) हे भारतातील हे डावे राजकारणी होते. ते मूळच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी)च्या संस्थापकांपैकी एक होते.
व्यक्तिगत जीवन
कानू सन्यालांचा जन्म इ.स. १९२९ साली दार्जीलिंग जिल्ह्यातील कुर्सिऑंग या गावात झाला. त्यांचे वडील अन्नादा गोविंद सन्याल हे न्यायालयात कारकून होते. कानू सन्याल हे भावंडात सर्वात लहान होते. त्यांना पाच भाऊ व एका बहिणीच्या असे सहा भावंड होते. इ.स. १९४६ साली कर्सिऑंगमध्येच ते मॅट्रिकची पर्यंत शिकले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी जलपाईगुडी महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. येथे त्यांचे इंटरपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी काम्पॉंग येथील न्यायालयात कारकुनाची नोकरी केली.
नक्षलवादी चळवळीतील सहभाग आणि राजकीय कारकीर्द
भारतातील नक्षलवादी चळवळीचा उगम जेथून झाला त्या घटनांच्या मुळाशी कानू सन्याल यांचे प्रमुख नाव आहे.[१] शोषित समाजाच्या मुक्तीसाठी सशस्त्र मार्गच हवा अशी भूमिका त्यांनी घेतली. १९४९ साली कम्युनिस्ट पक्षावर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ त्यावेळचे मुख्यमंत्री बी.सी. राय यांना काळे झेंडे दाखविण्याच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुगवासातच त्यांची भेट चारू मुजुमदार यांच्याशी झाली. चारू मुजुमदार यांच्यासोबत त्यांची गाढ मैत्री जमली. तुरुंगातून सुटल्यावर सन्याल यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम सुरू केले. त्यांचे विचार जहाल होते व सशस्त्र क्रांतीचा मार्ग त्यांना जास्त जवळचा वाटत होता. इ.स. १९६४ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली तेव्हा चारू मुजुमदार व कानू सन्याल दोघेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील संयुक्त सरकारमध्ये कृषिमंत्री असलेल्या हरेकृष्ण कोणार यांनी ‘कसेल त्याची जमीन’ ही घोषणा दिली. याच सुमाराला दार्जीलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी या तिबेटच्या जवळ असलेल्या एका छोट्या खेड्यातील वातावरण शेतमजूर व जमीनदारांच्या संघर्षाने तापत होते. शेतात पीक आलेले होते व जमीनदार पीक कापण्याची परवानगी देत नाही यामुळे शेतकऱ्यांना पीक कापता येत नव्हते. लेनिन-मार्क्सवादाने भारावलेल्या कॉम्रेड चारू मुजुमदार, कॉम्रेड कानू सन्याल आणि जंगल संथाल यांनी नक्षलबारी आणि आजूबाजूच्या गावातील शेतकरी-शेतमजुरांना एकत्र केले व पिके कापण्याचे आंदोलन सुरू केले. नक्षलबारी या गावातून शेतमजुरांसाठी सुरू झालेल्या. ह्या चळवळीचे रूपांतर पुढे नक्षलवादात झाले. २५ मे, इ.स. १९६७ पासून नक्षलबारीत जमीनदारांच्या विरोधात शेतकऱ्यांचे हिंसक आंदोलन सुरू झाले. यातूनच नक्षलवादी चळवळीचा उगम झाला. स्वतःला नक्षलवादी म्हणवणाऱ्यांना कानू सन्याल यांचा कालांतराने विसर पडला, तर कानू सन्याल यांनीही आपला मार्ग चुकल्याचे पुढे अधिकृतपणे जाहीर केले व नक्षलवादी चळवळीच्या हिंसकतेलाच विरोध दर्शविला.[ संदर्भ हवा ]
१ मे, इ.स. १९६९ रोजी नक्षलबारी आंदोलनाच्या समर्थनार्थ कोलकाता ( तेव्हाचे कलकत्ता ) येथे झालेल्या सभेत २२ एप्रिल, इ.स. १९६९ला व्लादिमीर लेनिनच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) सीपीआय(एम-एल)ची करण्यात आल्याचे कानु सन्याल यांनी जाहीर केले. चारू मुजुमदार , कानू सन्याल आणि जंगल संथाल हे पक्षाचे संस्थापक होते.
कानू सन्याल यांचा तेव्हा तरुणांवर आणि बुद्धिजीवी वर्गावर प्रभाव पडला, तेव्हा त्यांचे नेतृत्व आणि त्यांचा पक्ष यांना पाठिंबा मिळत होता.[ संदर्भ हवा ] चीनचे माओचे जवळचे सहकारी लिनचे रेड गार्ड्सच्या क्रांतीचे तंत्र भारतीय कम्युनिस्ट (मार्क्सवादी-लेनिनवादी) पक्षाने सीपीआय(एम-एल) ने अधिकृतरीत्या स्वीकारले. ऑगस्ट, इ.स. १९७० साली चारू मुजूमदार, कानू सन्याल, जगंल संथाल यांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यातील चारू मुजुमदार यांचा तुरुंगवासातच मृत्यू झाला. जगंल संथाल हे तुरुंगातून सुटल्यानंतर दारूच्या आहारी गेले. ६ वर्षाच्या तुरुंगवासानंतर इ.स. १९७७ साली कानू सन्याल बाहेर आले, तोपर्यंत परिस्थिती बदलली होती. १९७७ साली केंद्रात जनता पक्षाचे सरकार होते. तसेच पश्चिम बंगाल मध्ये सी पी आय ( मार्क्सवादी)चे सरकार होते. सर्व परिस्थितीचा अंदाज घेत, सीपीआय(एम-एल)ची निर्मितीच चुकीची होती, लिन यांच्या सूत्रामुळे संपूर्ण चळवळ चुकीच्या मार्गाने गेली. सीपीआय (एमएल) हा कम्युनिस्ट पक्ष नव्हताच, तर ती एक अतिरेकी संघटना होती असे विचार ते जाहीरपणे मांडू लागले. 'हिंसा मान्य नसलेल्या गरिबांनाच हे माओवादी ठार मारू लागले आहेत. राजसत्तेची पोलिसी यंत्रणा याच गरिबांचा बळी देऊन माओवाद्यांना संपवू पाहतेय. दोन्हीकडून शेवटी गरीबच भरडला जातोय...' असे कानू सन्याल बोलू लागले. यामुळे जहाल नक्षलवाद्यांनी त्यांना जवळ केले नाही. नक्षलवादी चळवळ कानु सन्याल यांच्या प्रभावापासुन दूर आली होती. पुढे सन्याल यांनी कम्युनिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एम-एल) या नवीन पक्षाची स्थापना केली. इ.स. २००५ साली त्यांनी वेगवेगळे मार्क्सवादी-लेनिनवादी गट एकत्र करून सीपीआय (एम-एल) नावाचा पक्ष पुन्हा एकदा स्थापन केला. १८ जानेवारी २००६ मध्ये चहाचे मळे बंद होत असल्याच्या निषेधार्थ न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक, सिलिगुडी येथे राजधानी एक्सप्रेस अडवून त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अटक झाली. सिंगूरमध्ये शेतकऱ्यांनी सरकारकडून त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या विरुद्ध पश्चिम बंगालमधील कम्युनिस्ट सरकार विरोधात जे आंदोलन छेडले त्यात कानू सन्याल यांचा सहभाग होता.
अखेर
जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांना कॅन्सरसारखा असाध्य रोग जडला होता. आपल्या राहत्या घरातच २३ मार्च, इ.स. २०१०ला आत्महत्या करून त्यांनी स्वतःचे जीवन संपवले.
अखेर २३ मार्च, इ.स. २०१०ला सिलिगुडीपासून २५ किमी अंतरावरील गावात त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह फास घेऊन टांगलेल्या अवस्थेत आढळला. त्यांच्या शरीराला जडलेल्या व्याधींनी ते त्रस्त असल्याचा अंदाज होता.
संदर्भ
- ^ "नक्षलिझम फाउंडर कानू सन्याल फाउंड हॅंगिंग" (इंग्लिश भाषेत). 2010-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-05-18 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- "व्यक्तिवेध सदरातील माहिती".[permanent dead link]
- "नक्षलवादाचा प्रणेता".[permanent dead link]