काजवा हा प्रकाश टाकणारा किडा आहे. अधूनमधून किंवा एकसारखा प्रकाश देणारा एक कीटक. कोलिऑप्टेरा गणाच्या भुंग्याच्या (लॅपिरिडी) कुलात याचा समावेश होतो. काजवा निशाचर भुंगा आहे. त्याच्या सु. २,००० जाती असून अंटार्क्टिका खंड वगळता हा कीटक सर्व खंडांवर आढळतो. अगदी थोड्याच काजव्यांच्या बाबतीत अंडी, अळी, कोश व प्रौढ या विकासाच्या सर्व अवस्थांत प्रकाशाची उत्पत्ती होते; तथापि बहुतेक सर्व काजवे फक्त अळी व प्रौढावस्थेत स्वयंप्रकाशी असतात.
काजवे २-२.५ सेंमी. लांब व मऊ शरीराचे असून रंगाने मंद काळसर, पिवळे किंवा तांबूस असतात. नरांना पंख असतात व त्यांचे डोळे चांगले विकसित असतात. दिवसा ते लपून बसतात आणि रात्र झाली की बाहेर पडतात. काजव्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या माद्या अळीसारख्या असतात व त्या कमी हालचाल करतात. त्यांना पंख नसतात. त्यांचे डोळेही कमी विकसित झालेले असतात. प्रकाश देणारे अवयव नर काजव्यात उदराच्या खालील बाजूस सहाव्या व सातव्या खंडांत तर, मादीत त्यामागील खंडांत असतात.
प्रौढावस्थेत काजव्यांना फार थोडे अन्न लागते. त्यांच्या अळ्या मात्र मांसाहारी असून गोगलगाई व स्लग अशा जमिनीवरील मृदुकाय प्राण्यांवर त्या आपला उदरनिर्वाह करतात. याउलट हे कीटक अनेक पक्षी, सरडे, बेडूक, कोळी इत्यादींचे भक्ष्य आहेत.
काजव्यांचा प्रकाश पांढरा, पिवळा, नारिंगी हिरवा, निळा किंवा तांबडा असतो. त्यांच्या उदराच्या भागाचे आवरण पातळ व पारदर्शक असून आतील बाजूस प्रकाशपेशींचा जाड स्तर असतो. या प्रकाशपेशींमध्ये ल्युसिफेरीन नावाचे रसायन असते. हे रसायन ल्युसिफेरेज विकराच्या सान्निध्यात ऑक्सिजनाबरोबर संयोग पावते आणि प्रकाशनिर्मिती होते. काजव्यांची प्रकाशनिर्मिती हे जीवदीप्तीचे उदाहरण आहे. प्रकाशाबरोबर उष्णता निर्माण होत नसल्यामुळे काजव्यांचा प्रकाश उष्ण नसतो. या प्रकाशाची तरंगलांबी ५१०-६७० नॅनोमीटर इतकी असते. त्यात अतिनील किंवा अवरक्त प्रकाश नसतो.
सामान्यपणे काजव्यांचा प्रकाश मधूनमधून थांबणारा असतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या जाती विशिष्ट रीतीने प्रकाशतात. प्रजननकाळात नर आणि मादीला एकत्र आणण्यासाठी प्रकाश उपयोगी पडतो. नराचा विशिष्ट रीतीने चमकणारा प्रकाश त्याच जातीच्या मादीला अनुरूप वाटल्यास ती प्रकाशून प्रतिसाद देते आणि मीलन घडून येते. मिलनाचा हंगाम संपला की नर मरतात. मादी सामान्यपणे दमट जागी अंडी घालते. साधारणत: २०-२१ दिवसांनंतर अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. एक ते दोन वर्षांत अळ्यांची वाढ पूर्ण होते. त्यानंतर अळी कोशावस्थेत जाते. एक ते अडीच आठवड्यांत कोशातून पूर्ण वाढ झालेला काजवा बाहेर येतो. काजव्याची प्रौढावस्था ५-३० दिवस असते.[१]
जीवशास्त्र
A larviform female showing light-emitting organs on abdomen
प्रकाश आणि रासायनिक प्रक्रिया
Firefly (species unknown) captured in Eastern Canada. The top picture is taken with a flash, the bottom only with the self-emitted light.Fireflies in the woods near Nuremberg, जर्मनी. Exposure time 30 seconds.Firefly larva
.
Cyphonocerus ruficollis, a weakly-glowing member of the Cyphonocerinae
Stous, Hollend. 1997. A review of predation in Photuris, and its effects on the evolution of flash signaling in other New World fireflies. [१] (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)