Jump to content

काइटबोर्डिंग

काइटसर्फिंग हा काइटबोर्डिंगचा एक विशिष्ट प्रकार आहे ज्यामध्ये नियमित सर्फबोर्ड्स किंवा ह्यासाठी विशिष्ट आकार दिलेले बोर्ड्स वापरण्यात येतात.

काइटबोर्डिंग ह्या साहसी खेळाच्या विविध शैली आहेत ज्यामध्ये फ्री-स्टाईल, फ्री-राईड, डाऊन विंडर्स, स्पीड, कोर्स रेसिंग, वेक स्टाईल, जम्पिंग आणि समुद्रातील लाटांमध्ये काइटसर्फिंग यांचा समावेश होतो. २०१२ मध्ये ISAF आणि IKAच्या आकडेवारीनुसार जगभरात १.५ मिलियन काईटसर्फर्स होते. काईटसर्फिंगशी संबंधित वस्तूंची जागतिक बाजारपेठ २५० मिलियन अमेरिकन डॉलर्सची आहे.

विक्रम

फ्रेंच काईटसर्फर सेबॅस्टियन कॅटेलॅन हा पहिला व्यक्ती होता ज्याने ५० कनॉटसचा वेग पार करून ५०.२६ कनॉटसचा वेग ३ ऑक्टोबर २००८ रोजी लुडेरिट्झ स्पीड चॅलेंज, नामिबिया येथे गाठला.

ऑक्टोबर २०१० मध्ये, रॉब डोग्लस याने ५०० मीटर्सचे अंतर ५५.६५ कनॉटस या वेगाने पार करून नवीन विक्रम घडविला.

लुईस टॅपर याने जुलै/ऑगस्ट २०१० मध्ये साल्वाडोर ते साओ लुईस, ब्राझील हे २००० कि.मी.चे अंतर सलग २४ दिवस काईटसर्फिंग करून पार केले. हा असा एक प्रवास आहे जो कुठलाही सपोर्ट क्रू सोबतना घेता, फक्त एकच काईटचा वापर करून आणि ३५ लिटर्स पाणी सोबत घेऊन केला गेला आहे.

प्रशासन

आंतरराष्ट्रीय काईटबोर्डिंग असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय नौकानयन संस्थेची एक जागतिक स्तरावरील संस्था आहे. तिची जबाबदारी खेळाचे जागतिक स्तरीय प्रशासन सांभाळणे आणि जगातील विविध इव्हेंट्स एकाच रॅंकिंगशी जोडणे आहे. अनेक देशांमध्ये काईटसर्फिंगच्या राष्ट्रीय आणि विभागीय असोसिएशन्स आहेत.

तंत्र

काईटसर्फिंगच्या मुलभूत गोष्टी

काईटबोर्डिंग सर्फर्स, किनाऱ्याजवळ उभे असलेले लोक तसेच बीचवर असलेल्या इतर लोकांना धोका उत्पन्न करू शकते. प्रशिक्षण केंद्रात शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन काईटिंग शिकण्याचा धोका तसेच इतर समस्या कमी केल्या जाऊ शकतात. काईटसर्फिंग प्रशिक्षण केंद्रात काईट लौंच करणे, उडविणे, उतरविणे, बारचा उपयोग, लाईन्स आणि सुरक्षा साधनांचा वापर या गोष्टी शिकविल्या जातात.

काईट वळविणे

शिकाऊ लोक थांबून किंवा मागच्या बाजूला पाण्यात झुकून काईट वळवू शकतात. आणि नंतर काईट विरुद्ध दिशेला वळवून पुन्हा सुरुवात करू शकतात. ‘हिल टर्न जिब’ हे एक जलद आणि कुशल वळण आहे ज्यामध्ये गती कमी करून, बोर्ड सपाट करून, नंतर मागील पाय हवेच्या दिशेने घेऊन त्याला पुढचा पाय म्हणून वापरून बोर्ड उलट फिरवून परत पाण्यावर सरळ केला जातो. जर हे वळण व्यवस्थित नाही घेतले तर सर्फर हवेत उडू शकतो आणि त्यानंतर जर बोर्ड एका विशिष्टकोनात नाही ठेवला गेला तर सर्फर हेलकाऊ खाऊ शकतो.

नियंत्रित उडणे आणि उडी मारणे

नियंत्रण ठेवून उडणे या खेळात शक्य आहे आणि ते या खेळातील एक महत्त्वाचे आकर्षण आहे. उडी मारण्यापूर्वी सर्फर बोर्डच्या कडेवर उभा राहून लाईन्समध्ये तणाव निर्माण करतो. तेव्हा काईट अचानक डोक्यावर येतो. जसा काईट वर उठू लागतो तसा बोर्डच्या कडेवरून पाय उचलले जातात आणि सर्फर हवेत उडतो. नंतर काईट डोक्यावरून आपण जात असलेल्या दिशेला वळविला जातो. उडी मारतांना विवध प्रकारचे स्टंट्स करून दाखविता येतात. उडी मारणे काही परिस्थितींमध्ये धोकादायक असू शकते.

धोका आणि सुरक्षा

पॉवर काईटसमध्ये तो वापरणाऱ्याला हवेत उंचावर ओढण्याची तसेच पाण्यात ओढत नेण्याची क्षमता असते. आणि जर त्याच्यावरील नियंत्रण सुटले तर गंभीर प्रसंग ओढवण्याची शक्यता असते. अश्या प्रसंगांमध्ये सर्फर पाण्यात ओढला गेल्याने, उंचावरून वेगाने पाण्यात आपटल्याने, पाण्याच्या आत इखाद्कावर आदळून, रेतीमध्ये ओढला जाऊन, किंवा इमारत, घरांवर आदळून जखमी होण्याची दाट शक्यता असते.

नीट शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन, हळूहळू अनुभव घेऊन, व्यवस्थित अंदाज घेऊन तसेच सुरक्षा साधनांचा वापर करून हानी कमी करता येऊ शकते.

२००५ पासून पुढे काईटच्या डिझाईनमध्ये विशिष्ट बदल करून, कंट्रोल बार आणि क्विक रिलीज यंत्रणेमध्ये सुधारणा करून हा खेळ अजून सुरक्षित करण्यात आला आहे.