कल्पना दत्ता
कल्पना दत्ता | |
कल्पना दत्ता (बांग्ला: কল্পনা দত্ত) (२७ जुलै १९१३ - ८ फेब्रुवारी १९९५ ) (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केला . ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली. [१]
सुरुवातीचे जीवन
कल्पनाचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, ती कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी घेण्यासाठी गेली. तेथे असतानाच ती विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्थेची सदस्य झाली. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.
सशस्त्र चळवळ
चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३०ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मेमध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या 'भारतीय रिपब्लिकन आर्मी’च्या चितगांव शाखेत भरती झाली. सप्टेंबर १९३१ला सूर्य सेनने तिला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच तिला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसऱ्या सुनावणीत तिला शिक्षा झाली. १९३९ मध्ये तिची सुटका झाली.
नंतरचे जीवन
कल्पना १९४०ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाली, व भाकपची सदस्य झाली. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिने स्वयंसेवक म्हणून काम केले. तिने तिचे आत्मकथात्मक पुस्तक, चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ला इंग्रजीत प्रकाशित केले. १९४६मध्ये ती बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढली, पण जिंकू शकली नाही.
नंतर तिने भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तिचा मृत्यू झाला.
वैयक्तिक जीवन
कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.
चित्रपट
चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पनाचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ला 'चितगांव' हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.
टिपा व संदर्भ
- ^ "Kalpana Joshi, 81; Struggled for India". न्यू यॉर्क टाइम्स. 26 February 1995. 19 May 2010 रोजी पाहिले.
बाह्य दुवा
- Women in India and Pakistan: The Struggle for Independence from British Rule (Part 3) Archived 2012-12-11 at Archive.is