कलाशिक्षण
सामान्यत:कलाशिक्षणाची दोन प्रमुख उद्दिष्टे असतात : विद्यार्थ्यांना व्यावसायिक कलानिर्मितीच्या क्षेत्रात पारंगत बनविणे हे एक आणि त्यांच्यात कलास्वादाची क्षमता निर्माण करून एकूण सांस्कृतिक वातावरण समृद्ध करणे, हे दुसरे. दोहोंमध्येही सैद्धांतिक व प्रात्यक्षिक शिक्षणाचा अंतर्भाव होतो. प्रत्यक्ष कलानिर्मिती कशी करावी, तसेच आविष्काराचे माध्यम म्हणून कलेचा वापर कसा करावा, हे निर्मितीच्या अनुभवाने व सरावाने म्हणजेच प्रात्यक्षिकाने साध्य होते तर कलाकृतीचे आकलन व आस्वाद ह्या दृष्टींनी कलेचे सैद्धांतिक ज्ञान आवश्यक ठरते. विविध शिक्षणसंस्थांमधील तसेच शैक्षणिक उपक्रमांमधील कलाशिक्षणाचे स्थान सौंदर्यशास्त्रीय व सांस्कृतिक मूल्यांनुसार ठरत असते आणि ही मूल्ये स्थल-काल-परिस्थितिसापेक्ष असतात.
एखाद्या विशिष्ट कालामाध्यमामध्ये विद्यार्थ्याने विशेष प्रावीण्य संपादन करावे, म्हणून त्याला त्या शाखेचे खास प्रशिक्षण दिले जाते. तसेच सर्वसाधारण शिक्षणाचा एक आवश्यक भाग म्हणून कलेचे शिक्षण दिले जाते व पुढे कलाक्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे कलाशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये एक विशिष्ट सौंदर्यदृष्टी जोपासली जावी व तिचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात वस्तूंची निवड, मांडणी, सजावट, गृहशोभन, बागकाम आदी बाबींमध्ये व्हावा, अशीही एक भूमिका असते. तसेच तिच्या अनुषंगाने नगररचना, सार्वजनिक वास्तू, उद्याने इत्यादींच्या निर्मितीमागचे स्वास्थ्य व एकूण सामाजिक जीवनातील कलेचे मह्त्त्व विद्यार्थ्यास कळावे, अशी दृष्टी असते.
ह्या पार्श्वभूमीवर कलाशिक्षणाच्या ‘सर्वसाधारण शिक्षणातील कलाशिक्षण’ व ‘उच्च कलाशिक्षण’ अशा दोन प्रमुख शाखा आहेत’ त्यांचे स्वरूप समजावून घेणे आवश्यक ठरते.
सर्वसाधारण शिक्षणातील कलाशिक्षण :
स्थूलमानाने प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व त्यास यशस्वीपणे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे किमान शिक्षण म्हणजे सर्वसाधारण शिक्षण होय. याउलट प्रत्येकास त्याच्या विशिष्ट व्यवसायासाठी दिले जाणारे खास प्रकारचे शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण किंवा प्रशिक्षण होय. अर्वाचीन काळात कलाशिक्षण हा सर्वसाधारण शिक्षणाचा एक अनिवार्य भाग समजला जातो. सर्व सुसंस्कृत देशांत पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणाच्या अखेरीपर्यंत, निदान सक्तीच्या शिक्षणाच्या वयोमर्यादेपर्यंत, कला हा विषय सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचा म्हणून अभ्यासावा लागतो.
कलाशिक्षणाचे ध्येय :
शालेय शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी कलनिर्मितीचा व्यवसाय करणारे कलाकार व्हावेत, असा कलाशिक्षणाचा हेतू नाही. सर्वसाधारण शिक्षणाचे सर्वमान्य ध्येय व्यक्तिमत्त्वाचा सर्वागीण विकास हे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी शारीरिक, बौद्धिक, भावनिक व इतर मानसिक शक्ती असतात. त्या सर्वांचा समतोल व एकात्म विकास झाला, तर त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल. जुन्या शिक्षणपद्धतीत व्यक्तिगत भिन्नता व प्रत्येकाचा त्या कुवतीनुसार संपूर्ण विकास या गोष्टी विचारात घेतल्या जात नसत. त्यामुळे वैयक्तिक आवडीनिवडी किंवा क्षमता लक्षात न घेता ठराविक विषयांत पारंगत होण्याचा एकांगी प्रयत्न सर्वसाधारण शिक्षणाच्या द्वारे केला जात असे. परंतु मानसशास्त्रातील अर्वाचीन संशोधनानंतर हा दृष्टिकोन नाहीसा होऊन व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण व परिपूर्ण विकासाचे ध्येय आता सर्वमान्य झाले आहे.
प्रत्येक बालकाला सौंदर्यविषयक संवेदनक्षमता असते व तिच्या विकासासाठी कलेच्या द्वारे आपल्या विचारांची, भावनांची व कल्पनांची अभिव्यक्ती करण्याची भरपूर संधी त्याला शिक्षणात उपलब्ध झाली पाहिजे. या प्रकारच्या कलात्मक आविष्कारामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वविकासाला विघातक ठरणाऱ्या सहजप्रावृत्तिक अनिष्ट उर्मींचे उदात्तीकरण होते व त्याचा कोंडमारा होत नाही. मनोविकासाचे प्रभावी साधन या दृष्टीने कला या विषयाचा अंतर्भाव सर्वसाधारण शिक्षणामध्ये एक आवश्यक अंग म्हणून करण्यात आला आहे.
सुसंस्कृत जीवनासाठी सर्जनशील कलानिर्मिती व तिच्या रसग्रहणाची क्षमता यांची गरज आहे. मनुष्याच्या मूलभूत प्राथमिक गरजा भागल्या, तरी जीवन समृद्ध व संपन्न करण्यासाठी त्याला कलांपासून लाभणाऱ्या विशुद्ध, निरपेक्ष आनंदाची गरज असते. विविध कलांचे जीवनात महत्त्वपूर्ण स्थान असते, ते याच दृष्टीने. आधुनिक यांत्रिक व गतिमान जीवनात तर त्यांची विशेष जरुरी आहे. पूर्वीच्या काळी निरनिराळ्या वस्तूंची निर्मिती स्वतःच्या हातांनी करण्यामुळे मनुष्याच्या सर्जनप्रवृत्तीला संधी व समाधान प्राप्त होत असे. यंत्रयुगात या गोष्टींना तो पारखा झाला आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला विशुद्ध आनंद मिळविण्यासाठी कलेच्या उपासनेखेरीज अन्य मार्ग उरलेला नाही व यासाठीच सर्वसाधारण शिक्षणात हा विषय अनिवार्य स्वरुपात ठेवण्यात येतो.
याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे : अनेक प्रकारच्या बंधनांमुळे व्यक्तीला आपल्या कित्येक भावना, कित्येक सहजप्रावृत्तिक उर्मी व इच्छा-आकांक्षा दडपून टाकाव्या लागतात. अशा कोंडमारा झालेल्या भावना फार काळ तशाच राहिल्या, तर मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते व अनेक प्रकारचे हानिकारक मनोगंड निर्माण होतात. म्हणून अशा दडपलेल्या भावनांना वाट करून देणे, मानसिक निकोपतेसाठी आवश्यक असते. हे कार्य मुख्यत: कला किंवा क्रीडा यांच्या द्वारे परिणामकारकपणे होते, असे आधुनिक मानसशास्त्र सांगते. सारांश, सर्वसाधारण शिक्षणातील कलाशिक्षणाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) सर्जनशील आत्माविष्कार करण्याच्या प्रत्येक बालकाच्या जन्मजात प्रवृत्तीचे संगोपन व विकास घडविणे (२) प्रतिभा आणि कल्पनाशक्ती यांचा विकास करणे व भावना संपन्न आणि तीव्र बनविणे (३) सौंदर्याची संवेदनक्षमता विकसित करणे व कलास्वाद घेण्याची क्षमता निर्माण करणे (४) बौद्धिक शिक्षणाइतकेच महत्त्वपूर्ण असणारे प्रशिक्षण हातांना व डोळयांना देणे (५) मुलांच्या निर्मितिप्रवृत्तीला व दडपल्या गेलेल्या भावनांना प्रगटीकरणासाठी वाव देऊन मानसिक आरोग्य सांभाळणे आणि (६) या सर्व प्रक्रियांच्या द्वारे संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविण्यास मदत करणे (हंसा मेहता समितीचा अहवाल श्रीमती हंसा मेहता ह्यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ मध्ये त्यावेळच्या मुंबई राज्यातील कलाशिक्षणविषयक परिस्थितीची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यासाठी ही समिती नेमली गेली होती. तिचा अहवाल पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाला आहे.).