कर्नाटक ताल पद्धती
कर्नाटक ताल पद्धतीकिंवा धृवादी ताल पद्धती भारताच्या दक्षिण भागात प्रामुख्याने प्रचलित आहे.
ताल पद्धती
कोणत्याही समान क्रियांच्या साखळीतील वेळेचे समान अंतर म्हणजे लय. या लयीच्या माध्यमातून गायन, वादन, नर्तन क्रियेतील कालमापन करण्याच्या प्रमाणित क्रियेला ताल असे म्हणतात. ताल म्हणजे लययुक्त सांगीतिक चक्र. ‘ताल:काल क्रियमानम’ अशी तालाची व्याख्या केली जाते. तालचे विशिष्ट विभाग असतात आणि तो विशिष्ट क्रियांनी दाखवला जातो. तालाच्या दोन पद्धती भारतामध्ये प्रचलित आहेत.
- कर्नाटक ताल पद्धती
- हिंदुस्थानी ताल पद्धती
या दोन्ही पद्धतीतील तालांची नावे आणि त्यांच्या मात्रासंख्या वेगवेगळ्या असल्या तरीही मूळ संकल्पना आणि व्याख्या एकच आहेत. दोन्हीकडे ताल हस्तक्रियांनी दाखवला जातो. हिंदुस्थानी पद्धतीत हव्या त्या मात्रांचे ताल निर्माण करता येतात पण कर्नाटक ताल पद्धतीत मात्र ठरावीक १७८ तालांव्यतिरिक्त आणखी वेगळे ताल निर्माण करता येत नाहीत.
कर्नाटक ताल पद्धती – यांस धृवादी ताल पद्धती असेही म्हणतात. भारताच्या दक्षिण भागात ही पद्धती प्रामुख्याने प्रचलित आहे. तालाचे विभाग म्हणजे तालाची अंगे. अनुधृत,द्रुत,लघु,गुरू,प्लुत आणि काकपाद अशी याची सहा प्रमुख अंगे आहेत. प्रत्येक अंग विशिष्ट खुणेने दर्शवतात आणि प्रत्येकाची मात्रा संख्या ठरलेली असते.
अंग | चिन्ह | मात्रा |
---|---|---|
अनुधृत | U | १ |
द्रुत | O | 2 |
लघु | I | ४ |
गुरू | S | ८ |
प्लुत | 3 | १२ |
काकपाद | × | १६ |
सध्याच्या काळात पहिली तीन अंगे प्रचलित आहेत आणि नंतरची तीन मागे पडली आहेत.
जाती
तालाच्या मात्रासंख्येनुसार पाच जाती आहेत.
- तिश्र -३ मात्रा –त कि ट
- चतुश्र- ४ मात्रा –त क दि मी
- खंड - ५ मात्रा –त कत कि ट
- मिश्र – ७ मात्रा –त कि टत क दि मी
- संकीर्ण – ९ मात्रा –त क दि मीत कत कि ट
सप्तताल - ध्रुवो मठ्यो रूपकश्च झम्पा त्रिपुट एवच | अटतालस्य एकतालो सप्ततालात् प्रकीर्तित ||
जातिभेद
या सात तालांची विशिष्ट अंगे किंवा विभाग ठरलेले आहेत. त्या मध्ये लघु या अंगाच्या मात्रा या जातीप्रमाणे बदलतात. जी जाती असेल तितक्या लघुच्या मात्रा होतात. त्याप्रमाणे प्रत्येक तालाची पाच जातीनुसार वेगळी मात्रा संख्या होऊन जातिभेदातून नवीन ताल निर्माण होतो. म्हणजे मूळ सात ताल आणि प्रत्येकाच्या पाच जाती असे ३५ ताल निर्माण झाले. जातिभेदात मात्रा संख्या बदलते.
गतिभेद
प्रत्येक मात्रेमध्ये विशिष्ट अक्षरसंख्या असते. ही अक्षर संख्या बदलली की गतिभेद निर्माण होतो. पाच जातींनुसार गतिभेदाने ३५ तालांपासून १७५ ताल निर्माण झाले. गतिभेदांत मात्रा संख्या तीच राहते पण अक्षरसंख्या बदलते.
काही ताल ठेक्याने दर्शवले जातात, त्यांना चापू असे म्हणतात. खंड, मिश्र आणि संकीर्ण जातीचे ताल चापू मधून दाखवतात. म्हणून १७५ आणि हे तीन असे १७८ ताल कर्नाटक पद्धतीत वापरतात.
तालाचे नाव | चिन्ह | अंग | तिश्र | चतुश्र | खंड | मिश्र | संकीर्ण |
---|---|---|---|---|---|---|---|
ध्रुव | IOII | १ लघु १ द्रुत २ लघु | ११ | १४ | १७ | २३ | २९ |
मठ्य | IOI | १लघु १ द्रुत १ | ८ | १० | १२ | १६ | २० |
रूपक | OI | १ द्रुत १ लघु | ५ | ६ | ७ | ९ | ११ |
झंपा | IUO | १ लघु १ अनुदृत १ द्रुत | ६ | ७ | ८ | १० | १२ |
त्रिपुट | IOO | १ लघु २ द्रुत | ७ | ८ | ९ | ११ | १३ |
अट्ट | IIOO | २ लघु २ द्रुत | १० | १२ | १४ | १८ | २२ |
एक | I | १ लघु | ३ | ४ | ५ | ७ | ९ |
संदर्भ
- तंजावूर नृत्यप्रबंध -श्री पार्वतीकुमार