Jump to content

कयाधू नदी

कयाधू नदी
उगम आगरवाडी, ता.रिसोड जि. वाशिम
पाणलोट क्षेत्रामधील देशनांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, महाराष्ट्र राज्य

पैनगंगा नदीची उपनदी म्हणून ओळखली जाणारी कयाधू नदी ही महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगांव, हिंगोली या तालुक्यांतून वाहते व शेवटी नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीला मिळते. ही हिंगोली जिल्ह्यातील एक मुख्य नदी असून ती औंढा-कळमनुरी तालुक्याच्या सीमेवरून वाहते. पूर या गावात नदीवर मोठा पूल बनवला असून त्या ठिकाणी नदी अधिक रुंद आहे. ती पुढे वाहून भानेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे पैनगंगेला मिळते. [].[]

हिंगोली जिल्ह्यात पैनगंगा, पूर्णा व कयाधू या तीन नद्या आहेत. पैनगंगा नदीपूर्णा नदी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहतात. त्या नदींतील निम्मे पाणी हिंगोली जिल्ह्यात, तर निम्मे पाणी शेजारील जिल्ह्यांत वापरले जाते. कयाधू नदी हिंगोली जिल्ह्याच्या मध्यातून वाहते, म्हणून त्या नदीला जिल्ह्याची ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. या नदीचा उगम वाशीम जिल्ह्यातील कंकरवाडी या गावी होतो, तर तिचा संगम, म्हणजे कयाधू म्हणून तिच्या अस्तित्वाचा शेवट नांदेड जिल्ह्यातील चिंचोली या गावी होतो. ती तेथे पैनगंगा नदीला मिळते. कयाधू नदीची लांबी ९९ किलोमीटर आहे. नदी तीव्र उताराची असल्याने व पाणलोट क्षेत्रविकासाची रचनात्मक कामे झालेली नसल्याने नदी केवळ जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाहते.

कयाधू नदी सुमारे सन १९७०पर्यंत बारमाही वाहत होती. गावातील मुले उन्हाळ्यामध्ये पोहण्यास नदीवर जात, तर पालक आजोबा नदीमध्ये बरू व अंबाडी पिकांचे अवशेष भिजण्यासाठी ठेवत असत. त्यांपासून पुढे ताग काढला जाई. ताग दोरी बनवण्यासाठी तर अंबाडी व बरू झोपडी बनवण्यासाठी वापरत असत. परंतु वाळू उपसा, पाणी उपसा, पाण्याचे सुनियोजन झाले नाही, लोकस्तरावरून पुनर्भरणासाठी प्रयत्न केव्हाच केले गेले नाहीत, वृक्षतोड सतत चालू होती, हे सारे प्रमाण जसे वाढत गेले तसतसा नदीचा प्रवाह आटत गेला.

हिंगोली जिल्हा-तालुक्यातील कयाधू नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘उगम ग्रामीण विकास संस्था’ व तिचे संस्थापक जयाजी पाईकराव यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या नदीवर लवकरच साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत, असे समजते.

संदर्भ

  1. ^ हिंगोली.गव्ह.इन-हिंगोली जिल्ह्याचे सरकारी संकेतस्थळ (इंग्रजी/मराठी मजकूर)
  2. ^ "कयाधू नदीवर होणार सोळा साखळी बंधारे". ई-सकाळचे संकेतस्थळ. २५/१०/२०१६ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]