Jump to content

कमला फडके

कमला फडके (४ ऑगस्ट, इ.स. १९१६ (नागपंचमी) - ६ जुलै, इ.स. १९८०) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडलांचे नाव गोपाळराव दीक्षित होते. मोठ्या बहिणीचे नाव इंदिरा होते. वडील तवंदीचे इनामदार असले तरी त्यांचे वास्तव्य त्यांच्या मामलेदारीच्या जागी म्हणजे कर्नाटकातल्या गदग, धारवाड, हावेरी अशा गावांमध्ये असे. गोपाळरावांना दोन बायका होत्या. पहिली पत्‍नी लक्ष्मीबाई विनापत्य म्ह्णून त्यांच्याच सांगण्यावरून गोपाळरावांनी राधाबाईंशी लग्न केले. गोपाळरावांना आपला मृत्यू जवळ आल्यासे वाटल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी एका दूरच्या चुलत भावावर सोपवली, आणि ते निधन पावले. या काकांनी दोन्ही बायकांना, सात वर्षाच्या इंदिराला आणि चार वर्षाच्या कमलाला कडक शिस्तीत वागवले, आणि त्यांचे बालपण करपवून टाकले.

कमलाचे शालेय शिक्षण बेळगावच्या वनिता विद्यालयात, कॉलेजचे पहिले वर्ष लिंगराज महाविद्यालयात झाले. काकांच्या लहरीपणामुळे दुसऱ्या वर्षासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम कोलेजात जावे लागले. पुण्याच्या फर्ग्युसनमध्ये शिकणाऱ्या इंदिरालाही (त्या पुढे इंदिरा संत झाल्या) राजाराम कॉलेजातच यावे लागले. महाविद्यालयात शिकताना त्यांना मराठी लेखक प्रा. ना.सी. फडके हे तत्त्वज्ञान हा विषय शिकवायला आले, आणि त्यांचे प्रेम जमले. पुढे ७ वर्षांनी त्यांनी २८ डिसेंबर १९४२ रोजी लग्न केले. ना.सी. फडके यांना एक पहिली बायकोही होती.

ना.सी. फडके यांच्या ’झंकार’ साप्ताहिकात कमला फडके यांचे लेख, मुलाखती व कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्याच साप्ताहिकात त्या इंग्रजी साहित्याचा परिचय करून देणारे एक सदर लिहीत. पुढील आयुष्यात कमला फडके यांनी आचार्य रजनीश (ओशो) यांच्या बऱ्याच इंग्रजी पुस्तकांचा मराठी अनुवाद केला. अनंत अंतरकरांच्या हंस आणि मोहिनी मासिकांत त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रकाशित होत असत. अन्य कथा किर्लोस्कर आणि स्त्री या मासिकांत प्रसिद्ध होत.

अन्य कलागुण

कमला फडके यांनी नागभूषण नावाच्या प्रख्यात गुरूकडून कथ्थक नृत्याचे शिक्षण घेतले होते. त्यांनी ना.सी. फडके यांच्या जानकी नाटकात केलेली मुख्य भूमिका चिंतामणराव कोल्हटकरसारख्यांनीही वाखाणली होती.

कमला फडके यांचे अन्य लेखन

  • आसावरी (संगीत विश्वावरची कादंबरी)
  • उटकमंडची यात्रा (प्रवासवर्णन)
  • एडगर पो यांच्या भयकथा (अनुवादित, मूळ इंग्रजी)
  • जेव्हा रानवाळा शीळ घालतो.(कादंबरी)
  • त्रिवेंद्रमची सफर (प्रवासवर्णन)
  • थोरांच्या सहचारिणी
  • धुक्यात हरवलेली वाट (कादंबरी)
  • निष्कलंक (कादंबरी, १९३९, अनुवादित, मूळ लेखक हिल्टन).
  • पाचवे पाऊल (एका अणुशास्त्रज्ञाची कथा सांगणारी कादंबरी)
  • प्रा. फडके यांची गाजलेली भाषणे (१९४०)
  • बंधन (मिरजेच्या कॅन्सर हॉस्पिटलात काम करणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावरची कादंबरी)
  • भूल (चुकून घडलेल्या खुनाची किंमत चुकवणाऱ्या एका पुरुषाची कथा सांगणारी कादंबरी)
  • मकरंद (कथासंग्रह, १९४२)
  • हृदयाची हाक (१९७१ साली जगातील पहिली हृदयारोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड याच्या ’वन लाईफ’ या मूळ इंग्रजी आत्मकथनाचा मराठी अनुवाद)

सन्मान

  • निष्कलंक या कादंबरीला या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात पारितोषिक मिळाले होते.