कपोत
कपोत हा दक्षिण आकाशातील एक लहान तारकासमूह आहे. याला इंग्रजीमध्ये Apus (ॲपस) म्हणतात. ॲपस या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ "पाय नसलेला" असा आहे. हा तारकासमूह नंदनवन पक्षी दर्शवतो, ज्याला पाय नसतात असा पूर्वी गैरसमज होता. अल्फा अपोडिस हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.
वर्णन
खगोलावरील २०६.३ चौ. अंश म्हणजे ०.५००% क्षेत्रफळ व्यापणारा हा तारकासमूह आकारमानानुसार आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये ६७व्या क्रमांकावर आहे.[१] ७° उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील निरीक्षकांना संपूर्ण तारकासमूह पाहता येऊ शकतो.[१] त्याच्या उत्तरेला पीठ, दक्षिण त्रिकोण आणि कर्कटक, पश्चिमेला मक्षिका आणि वायुभक्ष, दक्षिणेला अष्टक आणि पूर्वेला मयूर हे तारकासमूह आहेत. इ.स. १९२२ मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने स्वीकृत केलेले याचे लघुरूप 'Aps' आहे.[२] या तारकासमूहाच्या सीमा विषुवांश १३ता ४९.५मि ते १८ता २७.३मि यादरम्यान आणि क्रांती -६७.४८° ते -८३.१२° यादरम्यान आहेत.[३]
वैशिष्ट्ये
तारे
या तारकासमूहामध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे ३९ तारे आहेत.
अल्फा ॲपोडीस हा पृथ्वीपासून ४४७ ± ८ प्रकाश-वर्षे अंतरावरील[४] ३.८ दृश्यप्रतीचा तारा आहे.[५][६] तो तारा अनेक वर्षे निळा मुख्य अनुक्रम तारा होता. पण त्याच्या केंद्रातील हायड्रोजन संपल्याने तो प्रसरण पावला, थंड झाला आणि तेजस्वी झाला.[७] आता त्याची तेजस्विता सूर्याच्या ९२८ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ४३१२ केल्व्हिन आहे.[८] बीटा ॲपोडीस हा एक नारंगी राक्षसी तारा आहे. तो पृथ्वीपासून १५७ ± २ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४] त्याची दृश्यप्रत ४.२ आहे.[५] त्याचे वस्तुमान सूर्याच्या अंदाजे १.८४ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ४६७७ केल्व्हिन आहे.[९] गॅमा ॲपोडीस हा पृथ्वीपासून १५६ ± १ प्रकाश-वर्षे अंतरावरील[४] ३.८७ दृश्यप्रतीचा तारा आहे. तो सूर्याच्या ६३ पट तेजस्वी असून त्याच्या पृष्टभागाचे तापमान ५२७९ केल्व्हिन आहे.[८] डेल्टा ॲपोडीस हा एक द्वैती तारा आहे.[१०] डेल्टा१ हा लाल राक्षसी तारा पृथ्वीपासून ७६० ± ३० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[४] डेल्टा२ ५.३ दृश्यप्रतीचा नारंगी राक्षसी तारा आहे.[६] तो पृथ्वीपासून ६१० ± ३० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४][५]
झीटा ॲपोडीस हा एक नारंगी राक्षसी तारा आहे जो प्रसरण पावून थंड झाला आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान ४६४९ केल्व्हिन आणि तेजस्विता सूर्याच्या १३३ पट आहे.[८] तो पृथ्वीपासून २९७ ± ८ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४]
ईटा ॲपोडीस हा पृथ्वीपासून १३८ ± १ प्रकाश-वर्षे अंतरावरील मुख्य अनुक्रम तारा आहे.[४] त्याची दृश्यप्रत ४.८९ असून, त्याचे वस्तूमान सूर्याच्या १.७७ पट, तेजस्विता सूर्याच्या १५.५ पट आणि त्रिज्या २.१३ पट आहे. २५० ± २०० दशलक्ष वर्षाचा हा तारा अतिरिक्त २४ मायक्रोमीटर अवरक्त प्रारण उत्सर्जित करत आहे, जे कदाचित त्याच्याभोवतीच्या ३१ खगोलीय एककापेक्षा जास्त अंतरावरील धुळीच्या चकतीमुळे होत असावे.[११]
थीटा ॲपोडीस हा पृथ्वीपासून ३७० ± २० प्रकाशवर्षे अंतरावरील लाल राक्षसी तारा आहे.[४] त्याची तेजस्विता अंदाजे सूर्याच्या ३८७९ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ३१५१ केल्व्हिन आहे.[८] हा एक चलतारा असून त्याची दृश्यप्रत दर ११९ दिवसांनी ०.५६ ने बदलते.[१२] तो दरवर्षी सूर्याच्या १.१ × १०−७ पट एवढे वस्तुमान त्याच्या सौर वादळामुळे गमावत आहे. जसजसा हा तारा दीर्घिकेमध्ये प्रवास करत आहे तसतसा त्याने उत्सर्जित केलेल्या वादळातील धुळीचा आसपासच्या आंतरतारकीय माध्यमाशी झालेल्या संपर्कामुळे धनुष्याच्या आकाराचा अभिघात(भास?) निर्माण होत आहे.[१३]
या तारकासमूहातील दोन ताऱ्यांभोवती परग्रह आढळले आहेत.[१५] जो प्रसरण पावून थंड होऊ लागला आहे असा एचडी १३४६०६ हा एक सूर्यासारखा पिवळा तारा आहे .[१६] त्याच्याभोवती तीन ग्रह १२, ५९.५ आणि ४५९ दिवसांच्या कक्षेमध्ये फिरत आहेत.[१७] एचडी १३७३८८ हा आणखी एक तारा आहे जो सूर्यापेक्षा थंड आहे.[१६] सूर्याच्या अंदाजे ४७% तेजस्विता, ८८% वस्तूमान आणि ८५% व्यासाचा हा तारा ७.४ ± ३.९ अब्ज वर्षे जुना आहे.[१८] त्याच्याभोवती पृथ्वीच्या ७९ पट वस्तुमानाचा एक ग्रह ०.८९ खगोलीय एकक एवढ्या सरासरी अंतरावरून ३३० दिवसांच्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत आहे.[१९]
दूर अंतराळातील वस्तू
कपोतमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या दूर अंतराळातील वस्तूंमध्ये एनजीसी ६१०१ आणि आयसी ४४९९ हे गोलाकार तारकागुच्छ तसेच आयसी ४६३३ ही सर्पिलाकार दीर्घिका आहे.
- एनजीसी ६१०१ हा १४व्या दृश्यप्रतीचा गोलाकार तारकागुच्छ आहे. तो गॅमा ॲपोडीसच्या सात अंश उत्तरेकडे आहे.[६]
- आयसी ४४९९ हा आकाशगंगेच्या तेजोवलयातील एक गोलाकार तारकागुच्छ आहे.[२०] त्याची आभासी दृश्यप्रत १०.६ आहे.[२१]
- आयसी ४६३३ ही एक अंधुक सर्पिलाकार दीर्घिका आहे.[६]
संदर्भ
- ^ a b Ridpath, Ian.
- ^ Russell, Henry Norris (1922).
- ^ "Apus, constellation boundary".
- ^ a b c d e f g h van Leeuwen, F. (2007).
- ^ a b c Ridpath 2001, पाने. 76-77.
- ^ a b c d Plotner, Tammy (13 October 2008).
- ^ Kaler, James B. (6 April 2007).
- ^ a b c d McDonald, I.; Zijlstra, A. A.; Boyer, M. L. (2012).
- ^ Liu, Y. J.; Zhao, G.; Shi, J. R.; Pietrzyński, G.; Gieren, W. (2007).
- ^ Privett, Grant; Jones, Kevin (2013).
- ^ Plavchan, Peter; Werner, M.W.; Chen, C.H.; Stapelfeldt, K.R.; Su, K.Y.L.; Stauffer, J.R.; Song, I. (2009).
- ^ Yeşilyaprak, C.; Aslan, Z. (2004).
- ^ Cox, N.L.J.; Kerschbaum, F.; van Marle, A.-J.; Decin, L.; Ladjal, D.; Mayer, A.; Groenewegen, M. A. T.; van Eck, S.; Royer, P.; Ottensamer, R.; Ueta, T.; Jorissen, A.; Mecina, M.; Meliani, Z.; Luntzer, A.; Blommaert, J.A.D.L.; Posch, Th.; Vandenbussche, B.; Waelkens, C. (2012).
- ^ "IC 4499: A globular cluster's age revisited".
- ^ Reffert, S.; Quirrenbach, A. (2011).
- ^ a b Gray, R.O.; Corbally, C.J.; Garrison, R.F.; McFadden, M.T.; Bubar, E.J.; McGahee, C.E.; O'Donoghue, A.A.; Knox, E.R. (July 2006).
- ^ Schlaufman, Kevin C. (2014).
- ^ Bonfanti, A.; Ortolani, S.; Piotto, G.; Nascimbeni, V. (2015).
- ^ Dumusque, X.; Lovis, C.; Ségransan, D.; Mayor, M.; Udry, S.; Benz, W.; Bouchy, F.; Lo Curto, G.; Mordasini, C.; Pepe, F.; Queloz, D.; Santos, N. C.; Naef, D. "The HARPS Search for Southern Extra-solar Planets. Archived 2015-05-29 at the Wayback Machine.
- ^ Ferraro, I.; Ferraro, F.R.; Pecci, F. Fusi; Corsi, C.E.; Buonanno, R. (August 1995).
- ^ Frommert, Hartmut.