Jump to content

कणिक्कर जमात

कणिक्कर ही भारताच्या केरळ राज्यातील त्रिवेंद्रम व क्विलॉन जिल्ह्यातील एक जमात आहे. तमिळनाडूतही यांची थोडी वस्ती आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या १०,००० होती. २००७ च्या अंदानुसार ही स्ख्या १९,००० झाली.[] कणिक्कर बुटके व रंगाने पिंगट असतात. त्यांच्या नाकपुड्या रुंद, जबडा पुढे आलेला व डोकी रुंद असतात. पुरुष व स्त्रिया लांब केस ठेवतात आणि त्यांची पाठीमागे गाठ बांधतात. तमिळ व मलयाळम्‌ यांचे मिश्रण असलेली यांची बोली आहे.

परंपरा व् श्रद्धा

जमातीत कुळींचे विभाजन विस्तृत आहे. मुट्टि-इल्लोम व मेर-इल्लोम या कुळी आपापसांत विवाह संमत करतात; परंतु इतर कुळींना निकृष्ट मानल्यामुळे या दोन कुळी त्यांच्याशी विवाहसंबंध ठेवीत नाहीत. त्यांच्यात पूर्वी मातृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात असली, तरी पितृसत्ताक कुटुंबपद्धती हळूहळू अलीकडे प्रचारात येत आहे. जमातीच्या प्रमुखास वेट्‌टु-मल व देवऋषीस‘ल्पाथी’म्हणतात. आते-मामे भावंडाच्या (मुरापेन्नू) विवाहास अधिक्रम देण्यात येतो. देवरविवाह संमत आहेत. बहुपत्नीविवाह रूढ आहे. घटस्फोटाचे प्रमाण बरेच आहे. मूल जन्मल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिना स्त्रिया विटाळ पाळतात. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक मिळते.

सर्पाने चंद्राला गिळल्यामुळे ग्रहण लागते, असा त्यांचा समज आहे. दक्षिणेकडील द्रविड लोकांचा रक्षणकर्ता अगस्ती यास त्यांच्या धर्मविधीत महत्त्वाचे स्थान आहे. अलीकडे ख्रिस्ती धर्माचाही प्रसार वाढला आहे. कणिक्कर पूर्वी स्थलांतरित शेती करीत. ते हल्ली स्थिर शेती करून धान्याबरोबर डाळी, रताळी, गांजा, तंबाखू इ. पिके पिकवितात. काही जंगलखात्यात मजुरीचे कामही करतात. मध गोळा करण्यात हे लोक निष्णात आहेत. त्यांच्या जेवणात रानडुक्कर, हरिण, ससा, वानर, बोकड, कोंबडी, उंदीर इत्यादींच्या मांसाचा अंतर्भाव असतो. कणिक्कर मृतांना पुरतात. सुतक पंधरा दिवस पाळतात. त्यांचा आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास आहे.

संदर्भ

  1. ^ Kanikkaran A language of India. The Ethnologue Website, retrieved November 21, 2009