Jump to content

कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई: व्यक्ती आणि वाङ्मय)

पुस्तकाचा विषय

'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई: व्यक्ती आणि वाङ्मय)' या डॉ.केतकी मोडक लिखित संशोधन- ग्रंथात संत मुक्ताबाईंचे जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङ्मय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे.

पुस्तकाचे प्रकाशन

दि. ०४ ऑक्टोबर २००५ रोजी पुणे येथे संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ.अशोक कामत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी डॉ.गं.ना.जोगळेकर, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.रा.ग.जाधव उपस्थित होते.[][]

पुस्तकाची मांडणी

या पुस्तकाची मांडणी चार विभागात करण्यात आली आहे.

विभाग शीर्षक आशय
०१ मुक्ताबाईंचे चरित्र चरित्र, गोरक्षनाथ - मुक्ताबाई भेट, मुक्ताबाईचा अज्ञातवास, समाधी (मुक्ताबाईंचे स्वरुपाकार होणे - त्यांचे चिरकाळ निरंतर अभंग अस्तित्व)
०२ मुक्ताबाईंची प्रभावळ मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, विसोबा खेचर, नामदेव, वटेश्वर, चांगदेव यांच्यातील अनुबंध, मुक्ताबाईंबद्दल गौरवपर उल्लेख
०३ मुक्ताबाईंचे वाङ्मय मुक्ताबाई दिलेली सनद, ताटीचे अभंग, ज्ञानबोध, मुक्ताबाईंचे अभंग, मुक्ताबाई सार्थ गाथा, मुक्ताबाईंचे संकलित अभंग
०४ परिशिष्ट मुक्ताबाई एक की दोन या वादाचा परामर्श, लोकसाहित्यातील मुक्ताबाई, विविध सूची, संदर्भ ग्रंथ सूची.
कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्मय)

लेखकडॉ.केतकी मोडक
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारसंशोधनात्मक लिखाण
प्रकाशन संस्थामहेश मोडक
प्रथमावृत्ती०४ ऑक्टोबर २००५
चालू आवृत्तीतृतीय आवृत्ती
पृष्ठसंख्या३२०

नवोपल्ब्धी

  • संत मुक्ताबाईंचा गाथा म्हणून आजवर जे ४२ अभंग प्रकाशित झाले होते, त्या सर्व अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला आहे.
  • मुक्ताबाईंच्या अलक्षित अभंगांचे संकलनही या ग्रंथात करण्यात आले आहे. प्रकाशित ४२ अभंगांव्यतिरिक्त २०२ अभंग या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत.[]
  • मुक्ताबाई आणि गुरू गोरक्षनाथ यांची भेट हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे.[] ही भेट हा मुक्ताबाईच्या जीवनातील इतका केंद्रवर्ती भाग आहे की या प्रसंगापासून त्यांची अवस्थाच बदलली आणि त्यातून त्यांच्याकडे पाहण्याची इतरांची दृष्टीही बदलली. मुक्ताबाई आता 'माय' या स्वरुपात सर्वाना जाणवू लागली. या भेटीचे रहस्य ज्ञात नसल्याने मुक्ताबाई एक नसून दोन असाव्यात असे संशोधक मानत होते. गोरक्षशिष्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाई या दोन वेगवेगळ्या असाव्यात असे प्रतिपादन डॉ.रा.चिं.ढेरे यांनी केले होते. [] परंतु गोरक्षनाथ शिष्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई या एकच असल्याचे या ग्रंथातून निर्विवादपणे सिद्ध होते, असे संत साहित्याच्या अभ्यासक डॉ.सुशीला पाटील यांनी म्हणले आहे.[] []
  • संत नामदेव यांची गोरोबा यांनी केलेली परीक्षा व मडके कच्चे असल्याचा निर्वाळा हा जो प्रसंग आहे, या प्रसंगातील नामदेवांची परीक्षा करणारे गोरोबा म्हणजे गोरक्षनाथ होते हे या पुस्तकात सप्रमाण मांडण्यात आले आहे.
  • गुरू गोरक्षनाथ आणि संत मुक्ताबाई यांच्या भेटीचे स्वरूप नेमके काय होते, त्या भेटीचा परिणाम काय झाला? यासंबंधी मुक्ताबाई व त्यांची भावंडे, खुद्द नामदेव यांची प्रतिक्रिया काय होती, या साऱ्याचा खुलासेवार विचार प्रथमच या ग्रंथात झाला आहे.
  • ताटीचे अभंग हे ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचे प्रेरणास्त्रोत असावेत असा निष्कर्ष या पुस्तकात साधार मांडण्यात आला आहे. []
  • मुक्ताबाईंच्या अज्ञातवासाचे ठिकाण आळंदीजवळील सोळू हे गाव असावे असा अंदाज येथे साधार मांडण्यात आला आहे. []
  • मुक्ताबाई यांना 'तववरी तिचे शरीर चिरकाळ अभंग निरंतर' हा कृपाशीर्वाद कसा प्राप्त झाला, त्याचा आध्यात्मिक अर्थ काय याचे आकलन करण्याचा प्रयत्नही येथे झाला आहे.
  • या पुस्तकामध्ये संत निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांचा संवाद असे स्वरूप असलेल्या ज्ञानबोध या ग्रंथावर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे.[]
  • मुक्ताबाई यांनी शरीराचे परिवर्तन कसे करून घेतले, याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न या पुस्तकात झाला आहे.[]

पुस्तक-परिचय

प्रशस्ती

  • हिंदू स्त्रियांनी कर्तृत्वाचे, तपस्येचे आणि अत्यंत श्रेष्ठ अशा अध्यात्मविद्येतील सर्वोच्च अधिकाराचे किती उत्तुंग मानदंड निर्माण केले आहेत हे समजून घेण्याच्या दृष्टीने हे चरित्र महत्त्वाचे आहे. - दै.सामना []
  • लेखिकेने मुक्ताबाईला आख्यायिकांच्या भूलभुलैय्यातून बाहेर काढून तिची खरी ओळख सिद्ध करणारे स्वयंप्रेरित व तर्कशुद्ध संशोधन केले आहे - डॉ.रा.ग.जाधव. []
  • योगोत्तर व्यक्तींची प्रतिनिधी असणाऱ्या मुक्ताबाईची सांस्कृतिक ओळख करून देण्याचा आणि आत्मशोधाचा प्रयत्न मोडक यांनी या निमित्ताने केला आहे. एका स्त्रीच्या उपेक्षित कर्तृत्वाला न्याय देण्याचा असा प्रयत्न सुमारे सातशे वर्षांनी झाला आहे. - डॉ.अशोक कामत.[]
  • ज्ञानदेवांनी मुक्ताईची उपेक्षा केली असा माझा सूर होता, पण तशी उपेक्षा झाली नाही हे मोडक यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले, ते वाचून मला आनंद झाला. - डॉ.सुशीला पाटील []
  • हा ग्रंथ मुक्ताईविषयक ग्रंथांत सर्वाधिक प्रमाणग्रंथ झाला आहे. त्यामुळे मुक्ताईचा समग्र अभ्यास करणाऱ्यांच्या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथ मोलाचा आहे. - डॉ.सुशीला पाटील []

पुरस्कार

बाह्य दुवा

अधिक वाचन

निवृत्ती मुक्ताई संवादरूप ज्ञानबोध ग्रंथ - नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय प्रकाशन, संपादक श्री.सुरेश जोशी, इ.स. १९७६

संदर्भ

  1. ^ दै.लोकमत, ३०.०९.२००५
  2. ^ a b दैनिक सकाळ, १० ऑक्टोबर २००५
  3. ^ a b c d e दैनिक सकाळ, ले.डॉ.प्रल्हाद वडेर, २० नोव्हेंबर २००५
  4. ^ दै. प्रभात, ले. शुभदा वर्तक, दि.१६.१०.२००५
  5. ^ गुरुमाऊली अंक, १९८९, संपादक - डॉ.रा.चिं.ढेरे
  6. ^ a b c डॉ.सुशीला पाटील (२६ मे २००८). "कडकडोनि वीज - अनुबंध संशोधन ग्रंथ". जनमाध्यम, अमरावती.
  7. ^ a b दै.सामना, एक आलेख, दि. ३०.०४.२००६
  8. ^ दै.लोकसत्ता, दि. १७.१०.२००५
  9. ^ दैनिक लोकमत, २७ जून २००६
  10. ^ दैनिक लोकसत्ता, १७ मे २००६
  11. ^ दैनिक लोकसत्ता, ०८ फेब्रुवारी २००६
  12. ^ दैनिक केसरी, २१ डिसेंबर २००६
  13. ^ दैनिक लोकमत, नगर आवृत्ती, १९ डिसेंबर २००६
  14. ^ दैनिक लोकसत्ता, २० डिसेंबर २००६
  15. ^ दैनिक लोकमत, पिंपरी आवृत्ती, २३ नोव्हेंबर २००६
  16. ^ दैनिक सकाळ, पिंपरी आवृत्ती, २३ नोव्हेंबर २००६