Jump to content

ऑपरेशन ब्लू स्टार

ऑपरेशन ब्लू स्टार ( ਬਿਲਯੂ ਸਟਾਰ ) हे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदिरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे.[] अमृतसरमधील सुवर्णमंदिरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदिर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी यातुन कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला.[] तत्कालिन पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे पर्या‍वसान पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले. अखेरीस ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. जर्नेल सिंह भिंद्रनवाले सह बरेच दहशतवादी यात मारले गेले, इतरांनी शरणागती पत्करली. पण सुवर्णमंदिरात त्यावेळी बरेच नागरिकही उपस्थित होते. त्यांचाही यात मृत्यु झाला. याचमुळे शिखांचे सर्वोच्य धार्मिक स्थळ सुवर्णमंदिरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली. हिंसाचाराची मालिका येथेच न संपता याचीच परिणिती पुढे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन झालेली हत्या व त्यानंतर उसळलेल्या शीख विरोधी दंग्यांत झाले.

पंजाबातील घडामोडी

१९६६ मध्ये शीख बहुल असणारा पंजाब राज्य रचना झाली. पण त्यानंतरही पंजाबच्या राजकारणात पकड कायम ठेवण्यासाठी अकाली दलाकडुन आक्रमक राजकारण चालु राहिले. चंडिगड पंजाब मधील सामिल करावे. पंजाबमधुन जाणाऱ्या नद्यांवरील पाणी हरियाणा व राजस्थानला देणे यावरूनही विवाद होता. हळुह़ळु याचे रूपांतरण फुटीरतावादी चळवळीत झाले. पंजाबच्या राजकारणात फुट पाडण्यासाठी काँग्रेस ने जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना छुपा पाठिंबा दिला. याची कबुली काँग्रेसने २०११ साली आपल्या पक्षाचा जो अधि़कृत इतिहास प्रकाशित केला त्यात दिली. पण त्याची जबाबदारी ही दिवंगत नेते व इंदिरा गांधींचे जेष्ठ पुत्र संजय गांधी यांच्यावर टाकली.

१९७३ मध्ये आनंदपुर साहिब मध्ये एक ठराव पास करण्यात आला. याठरावानुसार केंद्र सरकारने केवळ विदेश, संरक्षण व मुद्रा अशी पाच खाती सांभाळावीत आणि इतर अधिकार पंजाबला देत स्वायत्तता द्यावी अशी मागणी करण्यात आली.मार्च १९८१ मध्ये स्वायत्त खलिस्तानचा झेंडा आनंदपुर साहिब वर फडकवण्यात आला. दरम्यान जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांनी जहाल भाषणे देण्यास सुरुवात केली.दमदमी टकसालच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. जहालमतवादी लोकांचा त्यांना पाठिंबा मिळु लागला व आपल्या मागण्यांसाठी सशस्त्र मार्ग त्यांनी निवडला. दमदमी टकसाल आणि निरंकारी पंथाचे शीख यांत एप्रिल १९७७ मध्ये संघर्ष झाला यात १३ शीख मारले गेले. पुढे २४ एप्रिल १९८०ला निरंकारी पंथाचे प्रमुख गुरबचन सिंह यांची हत्या करण्यात आली. मग ९ सप्टेंबर १९८१ला हिंद समाचार समूहाचे प्रमुख जगत नारायण यांची हत्या झाली व याआरोपावरून जर्नेल सिंह यांना अटक करण्यात आली. अकाली दलाने जर्नेल सिंहच्या सुटके साठी केंद्र सरकार बरोबर चर्चा केली. पण २९ सप्टेंबर १९८१ला गजिंदर सिंह आणि सतनाम सिंह यांनी त्यांच्या दल खालसाच्या इतर ३ सदस्यांसोबत ( जसबीर सिंह, तेजंदरपाल सिह, करम सिंह) मिळून श्रीनगरहुन दिल्लीला येणारे इंडियन एयरलाइंसच्या विमानाचे अपहरण करून लाहोरला (पाकिस्तान)नेले व जर्नेल सिंह यांच्या सुटकेची मागणी केली. अखेर पुढच्याच महिन्यात ऑक्टोंबर १९८१ मध्ये जर्नेल सिंह यांना सोडण्यात आले. एप्रिल १९८२ मध्ये अकाली दलाने यमुना-सतलज योजनेला जोरदार विरोध केला.

यानंतर पंजाबातील परिस्थिती आणखी बिघडली.

  • १९८२ च्या ऑगस्ट मध्ये अकाली दल ने धर्म युद्ध मोर्चाची घोषणा केली. याच महिन्यात दिल्ली हुन श्रीनगर जाणारे इंडियन एअरलाइंसचे विमान अपहरण करून पुन्हा लाहोरला नेण्यात आले. पण पाकिस्तान कडुन विमान उतरवण्यास परवानगी नाकारली. तेव्हा ते पुन्हा अमृतसरला ( पंजाब )परतले व अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली. यानंतर मुसीबत सिंहने इंडियन एअरलाइंसचे जोधपुरमार्गे मुंबई हुन दिल्ली येणारे विमानाचे अपहरण केले. याखेपेलाही पाकिस्तानने लाहोरला विमान उतरवण्यास परवानगी नाकारली. अखेर अमृतसर विमानतळावर कमांडो कार्रवाई करण्यात आली. यात अपहरणकर्ता मुसीबत सिंह ठार झाला.
  • २३ एप्रिल १९८३ला मध्ये पंजाब पोलिसचे डीआईजी अवतार सिंह अटवाल यांची सुवर्ण मंदिरच्या परिसरात दर्शानासाठी गेले असतांना सुवर्ण मंदिरच्या समोरच गोळी मारून हत्या झाली. यावेळी तेथे साधारण १०० पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तरीही अटवाल यांचे शव तेथेच २ तास पडुन होते.
  • जुन ते ऑगस्ट दरम्यान अकाली दलातर्फे मोठ्या प्रमा़णात रेल रोको व बंद करण्यात आले.
  • ५ ऑक्टोंबरला रात्री एका बस मधुन उतरवुन ६ हिंदू प्रवाशांना गोळी घालुन मारण्यात आले. अखेर ऑक्टोंबर १९८३ साली कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून पंजाबमधील कांग्रेसशासित राज्यसरकारच्या बरखास्तीची केंद्र सरकारने घोषणा करून राज्यात राष्ट्रपती शासन लागू केले.
  • डिसेंबर १९८३ मध्ये जर्नेल सिंह यांनी सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त साहिब मध्ये आश्रय घेतला.
  • फेब्रुवारी १९८४ला प्रीतलारी मासिकाचे संपादक आणि वरिष्ठ पत्रकार सुमित सिंह शाम्मी यांची हत्या करण्यात आली.
  • एप्रिल १९८४ला अमृतसरमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख हरबंस लाल खन्ना यांची व त्यांच्या अंगरक्षकांची हत्या केली गेली.
  • मे १९८४ला हिंद समाचार समूहाचे भुतपूर्व संपादक जगत नारायण यांचे पुत्र व विद्यमान प्रमुख रमेशचंद्र यांची जालंधर मध्ये हत्या.
  • याच दरम्यान अकाली दल व केंद्र सरकार यांत चाललेल्या वाटाघाटी विफल झाल्याचे अकाली दलाने घोषित केले.
  • अखेर जून महिन्यात केंद्र सरकारने ऑपरेशन ब्ल्युस्टारचा निर्णय घेतला.

ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई

अकाल तख्त यातच जर्नेल सिंह व शाबेग सिंह सह प्रमुख दहशवादी तळ ठोकुन होते.

ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात होते. त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाबेग सिंह यांच्याकडे होते. (शाबेग सिंह हे पुर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते, १९७१ च्या युद्धात त्यांनी बांगलादेश मुक्तीबाहिनीच्या सभासदांना प्रशिक्षित केले होते. त्यांनी भा‍रतीय सैन्यात अतिविशिष्ठ सेवा पदक व परमविशिष्ठ सेवा पदक मिळाले होते.)

आपल्या ऑपरेशन ब्लू स्टार: अ ट्रु स्टोरी या पुस्तकात मेजर जनरल बरार म्हणतात. ३० मे रोजी मेरठ मधुन त्यांना तातडीने चंदिगढ येथे पोहचण्याचा संदेश मिळाला. तेथेच त्यांना संभाव्य कारवाईचे आदेश व नेतृत्व देण्यात आले. पुढे सांगण्यात आले, परिस्थिती फार बिघडली असुन येत्या २/४ दिवसात खलिस्तानची घोषणा होऊ शकते. यानंतर पंजाब पोलीस दल खलिस्तानच्या स्वाधीन होईल. यानंतर दिल्ली व हरियाणातील शीख पंजाब कडे कूच करून, हिंदुं पंजाबातुन बाहेर येतील. १९४७ प्रमाणे दंगली उसळन्याची शक्यता आहे. याचवेळी पाकिस्तानही सीमा पार करून समर्थन देऊ शकतो व बांगलादेश निर्मिती सारखा प्रकार भारतातही घडवला जाऊ शकेल.

३ जून पासुनच भारतीय सेनेने सुवर्ण मंदिराच्या परिसरात मोर्चे बांधणी सुरू केली होती. आजुबाजुच्या काही इमारतींचा ताबा घेऊन त्यावर मशिनगन्स बसवल्या गेल्या. त्याचबरोबर ३ जून पासून सुवर्ण मंदिरा सभोवतालच्या परिसरात संचारबंदी लागु करण्यात आली. ३ जून पासून ५ जून पर्यंत अधुन मधुन काही फैरी दोन्ही बाजुंकडुन झाडण्यात आल्या. सुवर्ण मंदिरा जवळील इतर इमारतीतील दहशतवाद्यांनी फारसा प्रतिकार न करता समर्पण केले. मुख्य कारवाईस सुरुवात सुवर्ण मंदिरात ५ जुनला रात्री १० वाजेच्या सुमारास झाली.

कारवाईची सुरुवात रात्री ७ वाजेच्या सुमारास करण्याची योजना होती. त्यामुळे ५ वाजता भारतीय सेनेने लाउडस्पीकर वरून सुचना देऊन ज्यांना बाहेर पडायचे असेल त्यांना बाहेर येण्यास सुचवले. पण कोणीही बाहेर आले नाही. पुन्हा रात्री ७ वाजता तशाच सुचना देण्यात आल्या पण प्रतिसाद मिळाला नाही अखेर रात्री ९ वाजता पुन्हा सुचना दिल्यानंतर ८ ते १० वृद्ध माणसे बाहेर आली. जनरल बरार यांच्या म्हणण्यानुसार या माणसांनी सांगितले की आत मधुन इतर जणांनाही बाहेर यायचे आहे पण त्यांना येऊ दिले जात नाही. अखेर सैन्याने कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सैन्याची सुरुवातीची योजना होती की दहशतवाद्यांचे बाहेरील कडे नष्ट झाल्यावर जर्नेल सिंह सकट इतर दहशतवाद्यांना समर्पण करायला लावायचे. पण प्रत्यक्ष सुवर्ण मंदिरात दडलेल्या दहशतवाद्यांच्या तयारीची व शस्त्र सामग्रीची सैन्याला कल्पना नव्हती. १० च्या सुमारास पॅराशुट रेजिमेंटच्या जवानांना मुख्य दरवाजातुन प्रवेश करून मध्यभागी असणारया तळ्याच्या कडेने अकाल तख्त कडे पोहोचण्यास सांगितले. पण जवानांनी मुख्य दरवाजातुन आत प्रवेश करताच पायऱ्यांच्या दोन्ही बाजुंनी मशिन गन्स मधुन मारा करण्यात आला. यात बरेचसे जवान मारले गेले, काही जवान त्यावर मात करून आत प्रवेश करण्यात यशस्वी झाले पण त्यांवर आतल्या इमारतींतुन गोळेबार‍ झाला अखेर त्यांनी बाहेर पडुन पहिला हल्ला नाकाम झाल्याचे जनरल बरार यांना कळवले.

यानंतर १० व्या बटालियनचे जवान त्यांच्या मदतीला देऊन पुन्हा हल्ला करण्यात आला. यावेळी जवानांनी पायऱ्यांजवळीन मशिन गन्स निकामी करण्यात यश मिळवले. यानंतर जवानांनी "परिक्रमा" भागात प्रवेश केला. पण आतील बाजुत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार व ग्रेनेडचा हल्ला केला यामुळे जवानांना अकाल तख्त पर्यंत पोहोचता आले नाही. दहशतवाद्यांनी दरवाजे आणि खिडक्यांवर वाळुने भरलेली पोती लावली होती. यामुळे त्यांच्या वर सरळ गोळीबार करता येत नव्हता त्यातच अश्रुधुराप्रमाणे काम करणारे सन ग्रेनेड भारतीय सैनिकांनी फेकल्यावर ते उलटुन परत येत होते. सैनिकांनी यानंतर सुवर्ण मंदिराच्या दिशेने फार मारा होत असुन प्रत्युतरासाठी सुवर्ण मंदिराच्या दिशेने गोळीबार करण्याची परवानगी मागितली. पण सुवर्ण मंदिराच्या वास्तुला कसलेही नुकसान न करण्याचे निर्देश असल्याने जनरल बरार यांनी गोळीबाराची परवानगी दिली नाही. तेव्हा सैन्याच्या प्राणहानीच्या बातम्या सतत येत राहिल्या. सैनिक अकाल तख्तच्या जवळही जाऊ शकत नाहीत आणि प्राणहानीचा आकडाही वाढत होता तेव्हा एका चिलखती गाडी तुन जवानांना अकाल तख्तजवळ जाण्यासाठी पाठवन्यात आले. पण दहशतवाद्यांनी रॉकेट लॉंचरने ती चिलखती गाडी उडवली. यानंतर जनरल बरार यांनी वरिष्ठांकडे रणगाड्यांचा वापर करण्याची प‍रवानगी मागितली व ती मिळाली. प्रथम रणगाड्यांच्या हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशाने दहशतवाद्यांवर प्रखर प्रकाशझोत मारून हल्ला करायचा प्रयत्न झाला पण तोही यशस्वी झाला नाही. अखेर रणगाड्यांतुन अकाल तख्त वर मारा करन्यात आला जो यशस्वी ठरला. यानंतर रात्री १ वाजेच्या (६ जुनच्या सकाळी) सुमारास काही जण पांढरे निशाण फडकवुन बाहेर आले तेव्हा सैन्याला कारवाई यशस्वी झाल्याचा अंदाज आला. नंतर अकाल तख्तमध्ये घुसुन जर्नेल सिंह व शाबेग सिंह यांची प्रेते मिळाली व त्यांची ओळख पटवण्यात आली. आजुबाजुच्या परिसरातील सर्व दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याची कारवाई आणखी काही तास सुरू राहिली.

जिवितहानी

भारत सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारी नुसार यात भारतीय सेनेचे ८३ जण मारले गेले. यात ४ अधिकारी , ४ कनिष्ठ अधिकारी व ७५ जवान होते. सुमारे २०० जण जखमी झाले. तर ४९२ दहशतवादी या कारवाईत मारले गेले. अनधिकृत आकडे यापेक्षा जास्त आहे

कारवाईचे परिणाम

खलिस्तानची चळवळ लगेचच खंडित झाली नाही. सुवर्ण मंदिराच्या कारवाईने शीख समाजात तीव्र रोष निर्माण झाला. भारतीय सैन्यातही काही शीख सैनिकांनी बंड केले, त्याचवर्षी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख सुरक्षारक्षकांकडुन हत्या करण्यात आली व त्यानंतर राजधानी दिल्लीत शीख विरोधी दंगे उसळले.

६ जून नंतर भारतीय सैन्यातील काही शीख सैनिकांनी कारवाईच्या निषेधार्थ बंड केले व अमृतसर कडे कूच केले. राजस्थान मधील गंगानगर, बिहार मधील रामगढ, मुंबई जवळील ठाणे, तसेच अलवर, जम्मू आणि पुणे येथे शीख सैनिकांचे बंड झाले होते. रामगढ मधील सैनिकांनी ब्रिगेडियर पुरींची हत्याही केली. पण लवकरच भारतीय सैन्यातर्फे हे बंड मोडण्यात आले. बंडात सामील असणाऱ्या सैनिकांवर जेल मध्ये शिक्षा भोगण्याची कारवाई सुद्धा झाली पण जेल मधुन सुटल्यावर या सैनिकांना पुन्हा भारतीय सैन्यात सामावुन घेण्यात आले.

बीबीसी वृतवाहिनीला रामगढ येथील विद्रोहात सहभाग घेतलेले सैनिक बलजीत सिंह यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हणले.

"मी शीख रेजिमेंटल सेंटर रांची मध्ये होतो. १० जूनला जवानांनी गुरूद्वाऱ्यात अमृतसरला जाण्याची शपथ घेतली. दुपारीच काही तुकड्यांत १६०० जवान निघाले. यावेळी ब्रिगेडियर एस. सी. पुरी यांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या वर गोळ्या चालवल्या गेल्या त्यात ते मारले गेले. माझे वडील हे येथे कॅप्टन होते पण त्यांचे आम्ही ऐकले नाही. आमच्या कडे एमएमजी, एलएमजी, ग्रेनेडस होते. पण पुढील दिवशीच जोनपुर, लखनऊ व कानपूर मध्ये आम्हाला अडवण्यात आले. यानंतर जेलची शिक्षा झाली आणि जेल मधुन सुटल्यानंतर पुन्हा सैन्यात प्रवेश मिळाला व मी पुढील १७ वर्षे नोकरी केली."

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Operation BlueStar, 20 Years On
  2. ^ "Operation Bluestar, [[5 June]] [[1984]]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]] [http://wayback.archive.org/web/20080316164707/ विदागारातील आवृत्ती". 2008-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-07 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)

http://khabar.ibnlive.in.com/news/13930/1 Archived 2011-10-31 at the Wayback Machine.

http://www.bbc.co.uk/hindi/news/cluster/2009/06/090605_bluestar25_sikhs_as.shtmlhttp://www.bbc.co.uk/hindi/specials/920_bluestar1_rebels/