ऑपरेशन अँथ्रोपॉइड
ऑपरेशन ॲंथ्रोपॉइड राइनहार्ड हाइड्रीक या जर्मन अधिकाऱ्याच्या हत्येच्या योजनेचे नाव होते. ही महाराष्ट्रातल्या रॅंडच्या वधासोबत साधर्म्य असणारी पण दुसऱ्या महायुद्धारम्यान घडलेली घटना होती. चेकोस्लोव्हेकियावर अॅडॉल्फ हिटलरचा ताबा आल्यावर राइनहार्ड हाइड्रीक या अधिकाऱ्याने प्रागमध्ये चालवलेल्या दमनसत्राचा बदला तेथील क्रांतिकारकानी घेतला होता. ऑपरेशन डे ब्रेक नावाचा एक या कथेवर आधारीत चित्रपट ही बनला आहे.
राइनहार्ड हाइड्रीक आर एस एच एचा १९३९पासून प्रमुख होता. राष्ट्रीय मुख्य सुरक्षा कार्यालय (राइखसिकेरहाइटशॉप्टाम्ट तथा RSHA). तो हिटलरच्या अतिशय विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होता. युरोपातुन ज्यूंच्या उच्चाटनाच्या योजनेतील प्रमुख भागीदार होता. त्यामुळेच चेकोस्लोव्हेकियावर ताबा मिळवल्यानंतर काही वर्षांनी सप्टेंबर १९४१ मध्ये हिटलरने राइनहार्ड हाइड्रीकला अधिकाऱ्याला बोहेमिया आणि मोराव्हिया प्रांताचा कारभारी म्हणून पूर्ण अधिकार देऊन पाठवले. कॉन्स्टान्टिन फोन न्यूरॅथ हा त्याजागीचा पूर्वीचा अधिकारी हिटलरच्या मते मवाळ होता. हायड्रीकचा स्थानिक जनतेत प्रचंड दरारा होता. हायड्रीकला त्यानी अनेक टोपणनावे दिली, उदा. प्रागचा कसाई, ब्लॉंड जनावर, जल्लाद (हॅंगमन), इ.आपल्या घरापासून ते ऱ्हाडकॅनी किल्ल्यातल्या कार्यालयापर्यंत रोज उघडया मर्सिडीझ गाडीतून जात असे. यातुनच तो आपल्या म्रग्रुरीचं जणु प्रदर्शन करत असे. कदाचित यामुळेच नाझी सत्तेला व विचारसरणीला धक्का देण्यासाठी हायड्रीकला लक्ष्य केले गेले.
पार्श्वभूमी
झेकोस्लोव्हाकिया हा हिटलरच्या दबावतंत्रापुढे झुकुन इतर देशांच्या तुलनेत काहीच विशेष प्रतिकार न करता जर्मनीच्या ताब्यात गेला. त्यामुळे झेक लोकांत उदासिन्याची भावना होती. पुढेही झेकोस्लोव्हाकियाची भुमी युद्ध काळातही शांत राहुन जर्मनीसाठी युद्धसामग्री उत्पादित करत राहिली. कदाचित यामुळे अथवा प्रागच्या सौंदर्याची भुरळ असेल हिटलरनेही झेक राज्यात फारसे नुकसान केले नाही. यामुळे नाझी झटकादेण्यासाठी ‘ऑपरेशन अॅथ्रोपॉईड’ची आखणी झाली.
योजना
२० ऑक्टोंबर १९४१ रोजी याच्या तयारीला सुरुवात झाली ती ब्रिटनच्या स्पेशल ऑपरेशन्स एक्झेक्युटिव्ह सोबत. इंग्लंडमध्ये तरुण चेक सैनिकांच्या एक गटाने हायड्रीकला संपवण्याची योजना आखली. या योजनेला नाव ऑपरेशन अॅथ्रोपॉईड हे नाव दिले गेले. वॉरंट ऑफिसर जोसेफ गॅबचिक आणि स्टाफ सार्जंट कारेल स्वोबोदा यांची निवड या कामाकरता करण्यात आली. मूळ योजनेनुसार हत्या चेकोस्लोव्हेकियाच्या स्वातंत्र्यदिनी (२८ ऑक्टोंबर १९४१) होणार होती पण प्रशिक्षणा दरम्यान स्वोबोदाच्या डोक्याला जखम झाली. त्यामुळे त्याच्याजागी जॅन कुबिशची निवड करण्यात आली. पण कुबिशचे प्रशिक्षण झाले नसल्याने योजनेला उशिर झाला.
प्रागमध्ये प्रवेश
२९ डिसेंबर १९४१ च्या रात्री या कामगिरीसाठी जोसेफ गॅबचीक आणि जॅन कुबीश हे इतर सात सैनिकांच्या सोबत लंडनच्या हॅलीफॅक्स तळावरून विमानातून निघाले आणि पॅरॅशूटच्या साहाय्याने त्याच रात्री १० वाजता प्रागच्या पुर्वेस नेहविझ्दी येथे (Nehvizdy) २० किमी अंतरावर उतरले. मूळ योजनेनुसार त्यांना पिल्सेन येथे उतरायचे होते. पण वैमानिकांना काही अडचणी होत्या. नंतर ते पिल्सेनला पोहचुन आपल्या इतर साथीदारांना मिळाले. पुढील काळात प्रागमध्ये गुप्तपणे राहून गॅबचिक आणि कुबीश यांनी हायड्रीकच्या दररोजच्या कार्यक्रमाची माहिती करून घेतली. प्रथम हायड्रीकला ट्रेन मध्ये मारण्याचा विचार होता. पण तो व्यवहार्य वाटला नाही. नंतर त्यांनी प्रागच्या बाहेरील जंगलातल्या रोडवर हायड्रीकला मारण्याचा बेत आखला पण तो जुळला नाही अखेरीस त्याला प्राग मध्येच मारण्याचा निर्णय झाला.
हायड्रीकची हत्या
प्रागच्या मुख्य शहरापासून पूर्वेला ट्रामने साधारण १५-२० मिनिटांच्या अंतरावर होलेसोव्हिक नावाचा भाग आहे. इथे बुलोव्का रुग्णालयाजवळ असणाऱ्या ट्रामच्या थांब्यानजीक रस्त्यावर अरुंद वळण होते, यामुळे हायड्रीकची गाडी या वळणावर सावकाश चढते, याचं निरीक्षण गॅबचीक आणि कुबीश यांनी करून ठेवलं होतं. २७ मे १९४२ या दिवशी सकाळी दोघेही सायकलवरून होलेसोव्हिकच्या या वळणावर पोचले व ट्रामच्या थांब्यावर हायड्रीकची वाट पाहत थांबले. या वळणाच्या १०० मीटर आधी गाडी आलेली दिसली की व्हलासिक हा तिसरा सहकारी छोटा आरसा उन्हात चमकवून गॅबचीक आणि कुबीश यांना इशारा देणार असं ठरलं होतं. गॅबचीकच्या कोटाखाली स्टेनगन लपवली होती तर कुबीशकडे बॅगेत लपवलेला हातबॉंब ( वास्तविक हा काही बदल केलेला टॅंकविरोधी बॉंब) होता. साधारण सकाळी १०.३० च्या सुमारास, हायड्रीकच्या गाडीत ड्रायव्हर आणि संरक्षक क्लार्दनही होते. क्लार्दनच्या शेजारीच हायड्रीक बसला होता. गाडीने वळण पार केलं आणि गॅबचिक त्याची स्टेनगन सरसावत सरळ गाडीच्या पुढे आला. गॅबचिकने नेम धरला पण, ऐनवेळी त्याची बंदूक चाललीच नाही. हायड्रीकला लवकरच घटना लक्षात आली. त्याने ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली. आणि उभे राहुन आपले पिस्तूल बाहेर काढलं त्याचवेळी कुबीशने आपला बॉम्ब गाडीच्या दिशेने उडवला. तो गाडीच्या बाहेरच फुटला, पण हायड्रीक जबर जखमी झाला होता. त्यासोबत स्वतः कुबीशही जखमी झाला. त्याअवस्थेतच हायड्रीक गाडीबाहेर येऊन गॅबचिकला पकडण्यासाठी पळायचा प्रयत्न केला, पण जागीच कोसळला. ते पाहून क्लार्दन कुबीशचा माग सोडुन परत आला. पण हायड्रीकने त्याला गॅबचिकला पकडण्यास सांगितले. यावेळी मात्र गॅबचिकने स्वतःचे रिव्हॉलवर वापरले आणि पुढील चकमकीत क्लार्दनवर दोन गोळ्या झाडल्या. आणि निसटले.
हायड्रीकचा मृत्यु
हायड्रीकला बुलोव्का रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. कुबीश व गॅबचिकला वाटले की कट अयशस्वी ठरला. ते भुमिगत झाले. येथे साधारण तासाभराच्या शस्त्रक्रियेत हायड्रीकचे फुफ्फुसे आणि बरगड्या यांच्या जखमावर उपचार करण्यात आले. तसेच बॉंबचे शरीरात अडकलेले तुकडेही काढण्यात आले. प्रागच्या चार्ल्स विद्यापीठातील शस्त्रक्रियेचा मुख्याधिकारी प्रोफेसर हॉलबॉम आणि त्याच्यामदतनीस डॉ. डिक यांनी ही शस्त्रक्रिया केली. २९ मे पासून मात्र हायड्रीकच्या उपचारांचा ताबा एसएस दलाच्या आणि हायड्रीकच्या खाजगी डॉक्टरांनी घेतला तो कायमचा. पुढील सात दिवसांनी हायड्रीकच्या तब्बेतीत सुधारणा होतेय असे वाटत असतांना हायड्रीकने दुपारच्या जेवणासाठी उठायचा प्रयत्न केला, व तेव्हाच तो कोसळला. याचा त्याला धक्काबसुन दुसऱ्या दिवशी सकाळी ४ जुनला त्याचा मृत्यु झाला.
नाझींचा सुड
हायड्रीकच्या मृत्युने हिटलर प्रचंड खवळला. एसएस दलाला याचा क्रुर बदला घेण्याचे तसेच मारेकरी शोधण्याचे आदेश देण्यात आले. १३००० हुन जास्त जणांना तत्काळ अटक करण्यात आली. यात कुबीशची प्रेयसी ऍना मलिनोव्हा हीचा ही समावेश होता. पुढे छळछावणीत (Mauthausen-Gusen concentration camp) ती मरण पावली. ९ जूनला रात्री साडेनऊ वाजता प्रागपासून जवळच असणाऱ्या लिडित्से या गावी सर्वात भीषण कारवाई झाली. १५ वर्षाच्यावर वय असणाऱ्या १९९ पुरुषांना जणांना ठार करण्यात आले. तर इतर मुले आणि स्त्री यांना अटक करण्यात आली. संपूर्ण प्राग व आसपसच्या प्रदेशावर याहत्याकांडाची सामुहिक जबाबदारी लादली. नाझींच्या याकारवाई मुळे मग इतर प्रमुख नाझींच्या हत्येच्या कारवाया बारगळल्या. दरम्यान मारेकऱ्यांचा पत्ता सांगणाऱ्याला एक कोटी क्राऊनचं (झेक चलन) बक्षीस जाहीर करण्यात आलं.
मारेकऱ्यांच्या मागावर
सुरुवातीला मारेकरी दोन कुटुंबांकडे लपले होते. त्यानंतर त्यांनी सिरील आणि मेथोडिअस चर्च यात आश्रय घेतला. झुरडा हा क्रांतिकारकांचा सहकारी मात्र अखेर फुटला. त्याने गेस्टेपो दलाला स्थानिक मदतनीसांची नावे व पत्ते उघड केली. यातले एक मोरावेक कुटुंब झुझ्कोव्ह येथे राहणारे होते. १७ जुनला सकाळी ५:०० वाजता त्यांच्या घरी धाड पडली. सर्व कुटुंबाला एकाबाजुला उभे करून घराचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान श्रीमती मोरावेक यांना मात्र स्वच्छतागृहाचा वापर करायची परवानगी दिली गेली. येथेच त्यांनी सायनाईड खाऊन आत्महत्या केली. उरलेल्या कुटुंबाला आता जेरेबंद करून नेण्यात आले. त्यांचा मुलगा अटा याचा दिवसभर छळ करण्यात आला. अखेर त्याला त्याच्या आईचे शीर एका माशांच्या टाकीत ( फिशटॅंक) मध्ये ठेवुन दाखवण्यात आले. अखेर अटाने गेस्टेपोला सर्व माहीती दिली.
नाझी व मारेकऱ्यांतील चकमक
सिरील आणि मेथोडिअस चर्च या चर्च मध्ये गॅबचिक, कुबीश आणि त्यांचे ५ साथीदार लपून बसले होते. क्रिप्ट (चर्चशी संबंधित धार्मिक संतांचे मृतदेह जतन करायचं तळघर) मध्ये त्यांनी आश्रय घेतला होता. सुगावा मिळताच एस्. एस्. दलाच्या जवानांनी चर्चला घेरले. ७०० जर्मन सैनिकांनी या कारवाईत भाग घेतला. ७ जणांनी पुढील दोन तास ७०० जणांशी लढा दिला. सात भूमिगतांपैकी तिघे जण वरच होते आणि चौघे जण तळघरात होते. तळघराला एक रस्त्याच्या बाजुला एक झरोका होता , या झरोक्यातून सैनिकांनी पाणी, अश्रुधूर आत सोडुन यातल्यांची कोंडी करायचा प्रयत्न केला. चर्चमधून तळघरात उतरणारा एका गुप्त जिना होता. एस्. एस्. दलाच्या जवानांनी वरच्या तिघांना ठार करत तो तळघराच्या जिन्याचा दरवाजा बॉम्ब लावून फोडला. अखेर आतील चौघांनी जर्मनांच्या ताब्यात जाण्यापेक्षा स्वतःवर गोळ्या झाडुन आत्महत्या केली. एकही जणाला जिवंत पकडता आले नाही तसेच एस्. एस्. दलाचे १४ जण मारले गेले आणि २१ जवान जखमी झाले.
बाह्य दुवे
लोकप्रभा मासिकातील लेख Archived 2010-08-05 at the Wayback Machine.