Jump to content

ऋषी पंचमी

१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

ऋषी पंचमी हे हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे,भाद्रपद शुद्ध पंचमीला स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले.[]

आशय व महत्त्व

कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण आठ सुपाऱ्या मांडून ही पूजा सिद्ध केली जाते.[] ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलस्त्य, क्रतु, पुलस्त्य, मरीचि, अत्रि आणि वसिष्ठ या ऋषींचे पूजनही या दिवशी केले जाते.[] या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे. अशा रितीने ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी हे व्रत आहे असे मानले जाते.[] गृहस्थाश्रमी पुरुषांच्या बाबतीत या व्रताची मुख्य योजना मुख्यत: आचार प्रणालींची ओळख व्हावी व गृहस्थाश्रम हा त्यांच्याप्रमाणेच आचारसंपन्न व्हावा या हेतूने असतो. स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतर हे व्रत अशा प्रकारे केल्यास त्यांच्याकडून पूर्वी रजोदर्शन काळात घडलेल्या स्पर्शात्मक दोषांचे मानसिक पातळीवर निरसन होऊ शकते असे मानले जाते.[][] ज्या विद्यार्थ्याना श्रावणी (वेदाध्ययन करणाऱ्या वर्गासाठी विहित व्रत)संस्काराचा लाभ होत नाही अशा सर्ववर्णीय स्त्री पुरुषांनी त्यांच्या नित्य कर्मातील त्रुटी व स्खलन यांच्या परिहारासाठी ऋषिपंचमी हे व्रत करावे, असे सांगितले आहे.[]

व्रताचार

कोणत्याही व्रताचा काल व आचार निर्धारित होताना प्रामुख्याने भौगोलिक वातावरणाचा विचार केलेला असतो. त्यानुसार चातुर्मास काळात येणाऱ्या या ऋषी पंचमी व्रतामध्ये ऋषी पूजनाखेरीज आघाड्याच्या काष्ठाने दंतधावन, पंचगव्य प्राशन, सुवासिनींना हरिद्रास्नान, भस्मस्नान, गोमय स्नान, मृत्तिकास्नान, महासंकलपयुक्त तीर्थस्नान, अर्घ्यदान, अशा अनेक महत्त्वाच्या विधींचा अंतर्भाव केलेला आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी विशिष्ट व्रताहार आणि ऋषी स्मरण (सप्तर्षीची पूजा ) या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असून धर्मशास्त्रकारांना अभिप्रेत असणारा व्रताहार हा नेहमीच्या उपवासाहून पूर्णतया भिन्न आहे.[] कारण एरवीच्या उपासात रसाहार,फलाहार किंवा हविष्यान्न विहित असते. परंतु ऋषी पंचमीच्या दिवशी व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले अर्थात, न नांगरलेल्या जमिनीमधील पदार्थाचे सेवन करणे अभिप्रेत असते.[] तसेच या व्रतातील विविध स्नाने सांप्रतकाली लोकप्रिय असणाऱ्या निसर्ग उपचार प्रणाली मध्ये आचरली जातात व त्यापासून होणारे लाभही दिसून येतात.[]

प्रांतनिहाय

महाराष्ट्रात ग्रामीण भागात विशेषतः कोकण भागात हे व्रत महिला करतात त्याचप्रमाणे नेपाळमधील महिलाही हे व्रत करतात.[][१०][११]

ऋषीची भाजी

या दिवशी एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते. अळूची पाने, सुरण, वाल, लाल भोपळा, मटार, भेंडी, कोवळा माठ( भाजी) या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. यांतली कोणतीही भाजी बैलाच्या श्रमाची नसते.[१२]

गजानन महाराज समाधी दिन

संत गजानन महाराज मूर्ती

भाद्रपद शुक्ल पंचमीच्या म्हणजे ऋषिपंचमीच्या दिवशी महाराष्ट्र राज्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा समाधीदिन असतो.[१३][१४]

गणेश विसर्जन

गणपती देवता

श्री गणेश चतुर्थी या दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेल्या दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन या पंचमीला करतात.[१५]

हे सुद्धा पहा

भाद्रपद

भोगीची भाजी

संदर्भ

  1. ^ a b Verma, Manish (2013). Fasts and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171820764.
  2. ^ Ph.D, James G. Lochtefeld (2001-12-15). The Illustrated Encyclopedia of Hinduism, Volume 2 (इंग्रजी भाषेत). The Rosen Publishing Group, Inc. ISBN 9780823931804.
  3. ^ Verma, Manish (2013). Fasts and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-7182-076-4.
  4. ^ Beḍekara, Śarada (1997). Janamanātīla Īśvara. Granthālī.
  5. ^ Stone, Linda (2006). Kinship and Gender: An Introduction (इंग्रजी भाषेत). Westview Press. ISBN 9780813343020.
  6. ^ "ऋषि पंचमी 2019: मासिक धर्म से जुड़ी है इस व्रत की कथा, ऐसे क ." ३. ९. २०१९. ३. ९. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ a b Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  8. ^ शास्त्र असे सांगते (पूर्वार्ध). कोल्हापूर: वेदवाणी प्रकाशन. शके १९२५. pp. १२४. |first= missing |last= (सहाय्य); |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ Shrestha, Bimala (1997). Social life in Nepal, 1885-1950 (इंग्रजी भाषेत). Vani Prakashan Co-operative Ltd.
  10. ^ The Nepalese Perspective (इंग्रजी भाषेत). Gorkhapatra Corporation. 1967.
  11. ^ Delhi, All India Radio (AIR),New (1954-02-07). सारंग (आल इंडिया रेडियो का पाक्षिक पत्र ): वर्ष -19,अंक-4 ( 7 फ़रवरी 1954 ) (हिंदी भाषेत). All India Radio (AIR),New Delhi.
  12. ^ नेवरेकर, दीपाली (२५. ८. २०१७). "गणेशोत्सव विशेष - ऋषीपंचमीची भाजी कशी बनवाल?". ३. ९. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ यंगलवार, प्रा विजय (2015-02-05). Sant Shree Gajanan Maharaj / Nachiket Prakashan: संत श्री गजानन महाराज. Nachiket Prakashan.
  14. ^ Yangalwar, Pro Vijay (2013-07-22). Adhunik Kalatil Santanchi Mandiyali / Nachiket Prakashan: आधुनिक काळातील संतांची मांदियाळी. Nachiket Prakashan.
  15. ^ लोकसत्ता टीम (२५. ८. २०१७). "जाणून घ्या दीड दिवसांनी गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यामागची प्राचीन परंपरा". ३. ९. २०१९ रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)