Jump to content

उन्हाळी (वनस्पती)

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

हिला वेगवेगळ्या भाषांत असे म्हणतात :

  • मराठी- शरपुंखा, उन्हाळी
  • गुजराती - घोडाकन, झिला, सरपंखो
  • हिंदी - सरफोंका
  • कानडी - एंपली, कोग्गे
  • बंगाली - बननील
  • तामीळ - कोल्लुक्कवकेल्लपि
  • संस्कृत - शरपुङ्‌खा
  • इंग्रजी - Purple Tephrosia
  • लॅटिन - Tephrosia purpurea

मराठीत शरपुंखा हे नाव पडण्याचे मुख्य कारण असे आहे या झाडाचे पान तोडल्यास बाणाच्या शेपटीचा आकार तयार होतो . शर म्हणजे बाण व पुंखा म्हणजे शेपटी यावरून नाव पडले शरपुंखा .

प्लीहा म्हणजे स्प्लीनवर कार्य करणाऱ्या द्रव्यात शरपुंखा प्रमुख समजली जाते. शरपुंखेचे झुडूप असते. फुलाच्या रंगावरून तांबडी शरपुंखा व पांढरी शरपुंखा असे दोन प्रकार पडतात. पांढरी शरपुंखा तांबड्यापेक्षा कमी प्रमाणात सापडते. शरपुंखेला तीन ते चार सें.मी. लांबीच्या थोड्याशा वाकलेल्या शेंगा येतात. शेंगेमध्ये ८-१० बिया असतात.

शर म्हणजे बाण. शरपुंखेचे वैशिष्ट्य असे की, हिच्या पानाचे टोक बोटात धरून तोडले, तर पानाच्या डेखाकडील बाजूस बाणाच्या मागच्या भागाप्रमाणे दोन टोके दिसतात म्हणून शरपुंखेला बाणपुंखा, सायकपुंखा असेही म्हणतात. प्लीहेवर कार्य करणारी असल्यामुळे हिला प्लीहशत्रू, प्लीहारी असेही म्हणतात. हिचे लॅटिन नाव गलेगा पुरपुरिया Galega purpurea असे आहे.

औषधात शरपुंखेचे पंचांग म्हणजे मूळ, साल, पाने, फुले व फळे हे सर्व भाग वापरले जातात.

शरपुंखेचा रस कडू व तुरट असतो. विपाक तिखट असतो व वीर्य शीतल असते. शरपुंखा पित्त व कफदोषाचे शमन करते. शरपुंखेचे मुख्य कार्य यकृत व प्लीहेवर होते. याशिवाय ती ताप, दमा, खोकला, गुल्म वगैरे व्याधीत उपयुक्‍त असते. व्रण भरून आणण्यास मदत करते. विषद्रव्यांचा नाश करते.

काविळीवर शरपुंखा पंचांगाचे चूर्ण साखरेसह मिसळून कोमट पाण्यासह घेण्याने उपयोग होतो. यकृत किंवा प्लीहा आकाराने वाढली असता शरपुंखेचे मूळ हे एक उत्तम औषध समजले जाते. शरपुंखेचे मूळ वाटून ताकासह सेवन केल्यास वाढलेली प्लीहा निश्‍चित कमी होते, असे भावप्रकाशात सांगितलेले सापडते.

हे सुद्धा पहा