Jump to content

उदाराम देशमुख

माहूरचे राजे उदाराम  :-

राजे उदाराम हे शिवपूर्वकालीन मोगल सरदार होते. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पासून ते नांदेड जिल्ह्यातील माहूर पर्यंत त्यांची जहागीर होती. वऱ्हाड प्रांताचा एक तृतीयांश भाग त्यांचा मुलुख होता. इतिहासात सरदार लखुजी जाधवराव आणि राजे उदाराम या दोघांचे नाव सोबतच घेतले जाते. त्यांच्यात अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे आपल्याला दिसते. दोघांचाही मृत्यू नियतीने देवगिरी किल्ल्यातच लिहून ठेवला होता. ई. स. १६१६ पर्यंत उदाराम आणि लखुजी जाधवराव निजामशाही सरदार होते. त्यानंतर मलिक अंबराशी असलेल्या मतभेदांमुळे दोन्ही मराठा सरदार निजामशाही दरबार सोडून मोगल दरबारात हजर झाले. त्याकाळी हे दोनच मुख्य मराठा सरदार निझामाच्या दरबारात असल्याने आणि मराठा सैनिकांची मलिक अंबराला गनिमी कावा युद्धतंत्रसाठी नितांत गरज असल्याने, मलिक अंबरने त्यांना परत आपल्याकडे वळवून घेतले. पण राजे उदाराम परत मोगलांकडे निघून गेले. दरम्यान मलिक अंबराने त्यांचा खून करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला होता.

ई. स. १६३२ साली त्यांचा देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी किल्ल्याला वेढा घालत असताना दीर्घ आजाराने मृत्यू झाला. पुढे त्यांच्या घराण्यातील प्रत्येकाने आपल्या नावासमोर राजे उदाराम असेच टोपण लावले. उदारामाची पत्नी सावित्रीबाई हिला मोगल बादशाह औरंगझेब याने तिच्या अभूतपूर्व शौऱ्यासाठी पंडिता आणि रायबागन दोन खिताब बहाल केले होते. उंबरखिंडीच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी काहार्तलब खान आणि रायबागनच्या सैन्याचा पराभव केला,तेव्हा शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा काहर्तलब खानाला रायबागनने सल्ला दिला होता.

शूर रायबागनच्या मृत्यूनंतर राजे उदाराम घराण्याचा लौकिक कमी झाला. शहाजहान बादशहाने उदारामाच्या वंशजांना राजे उदाराम ही पदवी बहाल केली होती. त्यामुळे प्रत्येक वंशजाने पुढे स्वतःच्या नावापुढे राजे उदाराम लावल्याने नेमके कागदपत्र कोणाच्या नावाने आहे हे कळत नाही. त्यामुळे यांच्या इतिहासाबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. पुढे काही काळातच त्यांची मनसबदारी काढून फक्त जमीनदारी ठेवण्यात आली. ई. स. १८०२ मध्ये उदारामाच्या जहागिरीची सहा विभागात वाटणी झाली. आणि प्रत्येक जण आपल्या नावापुढे राजे उदाराम देशमुख लावू लागला. छत्रपती शाहू महाराजांच्या शासनकाळात या घराण्याची जमीनदारी पेशव्यांनी काढून घेतली होती. पण छत्रपतींच्या आदेशावरून त्यांना देशमुखी परत देण्यात आली. आजच्या वाशिम, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांचा काही भागात त्यांची देशमुखी होती.