Jump to content

उझबेकिस्तान

उझबेकिस्तान
O‘zbekiston Respublikasi
Ўзбекистон Республикаси
उझबेकिस्तानचे प्रजासत्ताक
उझबेकिस्तानचा ध्वजउझबेकिस्तानचे चिन्ह
ध्वजचिन्ह
उझबेकिस्तानचे स्थान
उझबेकिस्तानचे स्थान
उझबेकिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ताश्केंत
अधिकृत भाषाउझबेक
इतर प्रमुख भाषा रशियन
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखइस्लाम कारिमोव
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ सप्टेंबर, इ.स. १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,४७,४०० किमी (५६वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.९
लोकसंख्या
 -एकूण २,७६,०६,००७[] (४५वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता६१.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७८.३३८ अब्ज[] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३,८०६ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७१०[] (मध्यम) (११९ वा) (२००७)
राष्ट्रीय चलनउझबेकिस्तानी सोम
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी + ५:००
आय.एस.ओ. ३१६६-१UZ
आंतरजाल प्रत्यय.uz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९९८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


उझबेकिस्तान, अधिकृत नाव उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक (मराठी लेखनभेद: उझबेकिस्तानाचे प्रजासत्ताक ; उझ्बेक: O‘zbekiston Respublikasi, Ўзбекистон Республикаси, ओझबेकिस्तॉन रेस्पुब्लिकासी ) हा मध्य आशियातील एक देश आहे. उझबेकिस्तानच्या पश्चिम व उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला ताजिकिस्तानकिर्गिझस्तान तर दक्षिणेला अफगाणिस्तानतुर्कमेनिस्तान हे देश आहेत. इ.स. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी उझबेकिस्तान हे सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

एकेकाळी इराणातील सामानी साम्राज्याचा व नंतर तिमूरी साम्राज्याचा हिस्सा असलेला हा भूभाग इ.स.च्या १६व्या शतकात पौर्वात्य तुर्की भाषाकुळातली उझबेक भाषा बोलणाऱ्या भटक्यांनी व्यापला. आधुनिक उझबेकिस्तानातील बहुसंख्य प्रजा उझबेकवंशीय आहे.

इ.स.च्या १९व्या शतकात उझबेकिस्तान रशियन साम्राज्याच्या आधिपत्याखाली आला. उझबेकिस्तान इ.स. १९२४ साली उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक अश्या रूपाने सोव्हिएत संघात सामील झाला. डिसेंबर, इ.स. १९९१मध्ये सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्यापासून तो एक सार्वभौम प्रजासत्ताक देश आहे.

उझबेकिस्तानाची अर्थव्यवस्था कापूस, सोने, युरेनियम, पोटॅशियम, नैसर्गिक वायू इत्यादी नैसर्गिक संसाधनांच्या उत्पादनावर आधारित आहे. बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचे अधिकृत जाहीर धोरण असूनही अर्थव्यवस्थेवर राष्ट्रीय शासनाची घट्ट पकड आहे. परकीय गुंतवणुकीसाठी ही बाब उत्साहवर्धक नसली, तरीही इ.स. १९९५ सालापासून उदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने नियंत्रित वाटचाल करणाऱ्या शासकीय यंत्रणेने केलेले आर्थिक पुनरुज्जीवन आश्वासक आहे. देशांतर्गत व्यवस्थेतील मानवाधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्य यांची स्थिती मात्र विवादास्पद राहिली असून त्याबद्दल आंतरराष्ट्रीय संघटनांकडून उझबेकिस्तानावर टीकाही झाली आहे[].

इतिहास

ज्ञात इतिहासानुसार ताम्रयुगापासून तारिम खोऱ्याच्या परिसरात मानवी वस्तीस सुरुवात झाली. इ.स.पू. पहिल्या सहस्रकात इराणी भटक्यांचे मोठ्या प्रमाणात मध्य आशियात स्थलांतर झाले. इराणी भाषाकुळातील भाषा बोलणारे हे लोक सध्याच्या उझबेकिस्तानाच्या भूप्रदेशातील गवताळ प्रदेशात स्थिरावले. इ.स.पू. ५व्या शतकात बाख्तरी, सोग्दाई, तुखार राज्ये या प्रदेशात उदयास आली. बुखारासमरकंद ही शहरेदेखील सांस्कृतिक व राजकीय केंद्रे म्हणून प्रसिद्धीस आली. रेशीम मार्गाद्वारे पश्चिमेकडील प्रदेशांशी व्यापारसंबंध वाढवायला चीनने जेव्हा सुरुवात केली, तेव्हा ही इराणी शहरे आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली. विशेषकरून सोग्दाई व्यापाऱ्यांनी वर्तमान उझबेकिस्तानातील मावाराननाहर प्रदेशापासून वर्तमान चिनी जनता-प्रजासत्ताकातील शिंच्यांग उय्गूर स्वायत्त प्रदेशापर्यंत पसरलेल्या इराणी वस्त्या-नगरांच्या जाळ्याच्या आधारावर भरपूर ऐश्वर्य कमवले. रेशीम मार्गावरील व्यापारामुळे बुखारा व समरकंद ही नगरे वैभवसंपन्न बनली.

इ.स.पू. ३२७च्या सुमारास महान अलेक्झांडराने सोग्दा व बाख्तरावर आक्रमण करून हा भूभाग जिंकला. त्याने रोक्साना नामक बाख्तरी राजकुमारीशी विवाह केला. मात्र ग्रीकांचे हे यश नीटसे स्थिरावू शकले नाही. कालांतराने अलेक्झांडराचे सैन्य स्थनिकांनी चालू ठेवलेल्या प्रतिकारापुढे नामोहरम झाले. पुढे अनेक वर्षे वर्तमान उझबेकिस्तानाच्या भूभागावर पार्थियन व सासानी इत्यादी इराणी साम्राज्यांची सत्ता होती. इ.स.च्या ८व्या शतकात अमूदर्या व सिरदर्या नद्यांमधील ट्रान्सऑक्सियाना दुआबाचा भाग अरबांनी जिंकला. इ.स.च्या ९व्या व १०व्या शतकांत हा भाग सामानी साम्राज्यास जोडला गेला.

इ.स.च्या १३व्या शतकात चंगीझ खानाच्या नेतृत्वाखालील मंगोल फौजांचे आक्रमण या प्रदेशाच्या इतिहासास कलाटणी दिली. मंगोल आक्रमणात झालेल्या क्रूर कत्तलींमुळे येथील मूळच्या इंडो-पारसिक सिथियनांचा वंशसंहार घडला. सिथियनांचा सांस्कृतिक वारसा खंडित होऊन पुढील काळात येथे येऊन वसलेल्या मंगोल-तुर्क लोकांच्या संस्कृतीने मूळ धरले.

इ.स. १२२७मध्ये चंगीझ खानाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे साम्राज्य त्याच्या चार पुत्रांमध्ये व अन्य कुटुंबीयांमध्ये विभागण्यात आले. उत्तराधिकारी ठरवण्याची प्रक्रिया मंगोल कायद्यांनुसार अनुसरल्यामुळे वारसाहक्कावरून राज्याची शकले न पडता शासनकर्त्यांची अभंग परंपरा मंगोलांना लाभली. रेशीम मार्गामुळे वैभवसंपन्न बनलेल्या मावाराननाहर प्रदेशाची सत्ता चंगीझ खानाचा दुसरा पुत्र चगताय खान याच्या वंशजांकडे राहिली. शासकांच्या अभंग परंपरेमुळे चगाताय खानतीस स्थैर्य व सुबत्ता लाभली; तसेच मंगोल साम्राज्यदेखील एकजूट, अभंग राहिले.

इ.स.च्या १४व्या शतकात मात्र मंगोलांचे विशाल साम्राज्य भंगण्यास सुरुवात झाली. चगाताय खानतीच्या प्रदेशातही सत्तासंघर्ष उद्भवला व अनेक छोट्या-छोट्या टोळ्यांचे प्रमुख सत्ता काबीज करण्यासाठी परस्परांत लढू लागले. या सत्तासंघर्षातून तिमूर (तैमूरलंग) नावाचा टोळीप्रमुख इ.स. १३८०च्या सुमारास मावाराननाहर प्रदेशातला प्रबळ सत्ताधीश बनला. चंगीझ खानाचा वंशज नसलेल्या तिमूराने मध्य आशियाचा पश्चिमेकडील भाग, इराण, आशिया मायनर, अरल समुद्राच्या उत्तरेस असलेला स्टेप प्रदेशाचा दक्षिण भाग जिंकत राज्य विस्तारले. त्याने रशिया व भारतीय उपखंडावरही आक्रमणे केली. चीनवरील आक्रमणादरम्यान इ.स. १४०५ साली त्याचा मृत्यू झाला. तिमूराच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्यातील सत्तासंघर्ष शिगेस पोचला व राज्याची शकले पडण्यास आरंभ झाला. ही संधी हेरून अरल समुद्राच्या उत्तरेस राहणाऱ्या भटक्या उझबेक टोळ्यांनी मावाराननाहरावर चढाया करण्यास सुरुवात केली व हा भाग व्यापला.

इ.स.च्या १९व्या शतकात रशियन साम्राज्याने मध्य आशियात राज्यविस्तार करण्यास आरंभले. इ.स. १८१३पासून इ.स. १९०७मधील ॲंग्लो-रशियन बैठकींपर्यंतचा मोठी शिकार म्हणून ओळखला जाणाऱ्या या काळात उझबेकिस्तानातील रशियन प्रभाव वाढत गेला. इ.स. १९१२मध्ये उझबेकिस्तानात २,१०,३०६ रशियन राहत होते[]. रशियातील इ.स. १९१७मधल्या बोल्शेविक क्रांतीनंतर बोल्शेविक लोण मध्य आशियातही जाऊन थडकले. बोल्शेविकांना झालेल्या सुरुवातीच्या प्रतिकारानंतर उझबेकिस्तान व उर्वरित मध्य आशिया सोव्हिएत संघात सामील झाला. २७ ऑक्टोबर, इ.स. १९२४ रोजी सोव्हिएत संघांतर्गत उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक निर्मिण्यात आले. ३१ ऑगस्ट, इ.स. १९९१ रोजी उझबेकिस्तानाने सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले. १ सप्टेंबर हा दिवस उझबेकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.

भूगोल

उपग्रहाद्वारे टिपलेल्या भूशास्त्रीय छायाचित्रावर रेखाटलेला उझबेकिस्तानाचा नकाशा.

मध्य आशियात वसलेला उझबेकिस्तान ३७° उ. ते ४६° उ. अक्षांशांदरम्यान आणि ५६° पू. ते ७४° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. त्याची पूर्व-पश्चिम कमाल रुंदी १,४२५ किलोमीटर (८८५ मैल) असून दक्षिणोत्तर कमाल अंतर ९३० किलोमीटर (५८० मैल) आहे. नदीखोऱ्यांमुळे व मरूद्यानांमुळे ओलिताखाली असलेला भूप्रदेश एकूण क्षेत्रफळाच्या केवळ १० % असून उरलेला मुलूख वाळवंटांनी व डोंगरदऱ्यांनी व्यापला आहे.

उझबेकिस्तानातील हवामान खंडीय हवामानप्रकारात मोडणारे आहे - येथे वर्षातून अल्प, म्हणजे १००-२०० मिलिमीटर (३.९-७.९ इंच) वृष्टी होते. उन्हाळ्यात कमाल तापमानाची सरासरी पातळी ४०° से. (१०४° फा.) असते, तर हिवाळ्यातील किमान तापमानाची सरासरी पातळी -२३° से. (-९° फा.) आहे.

आंदिजान, राजधानी ताश्केंत, नामांगान, बुखारा, समरकंद ही उझबेकिस्तानातील मोठी शहरे आहेत.

राजकारण

इ.स. १९९४ साली १६व्या सर्वोच्च सोव्हिएतीच्या ठरावानुसार औलिय मज्लिस (संसद) स्थापण्यात आली. तेव्हापासून सर्वोच्च सोव्हिएतीची जागा औलिय मज्लिसेने घेतली आहे. इ.स. १९९४ साली संसद ६९ सदस्यांची होती. इ.स. २००४ सालापर्यंत संसदेचे एकच सभागृह होते. इ.स. २००४ साली संसदेची संरचना विस्तारून दोन सभागृहे करण्यात आली व सदस्यसंख्या १२०पर्यंत वाढवण्यात आली. इ.स. २००९सालच्या तिसऱ्या संसदीय निवडणुकींत संसदेतील दोन्ही सभागृहांची एकत्रित सदस्यसंख्या १५०पर्यंत वाढवण्यात आली. इ.स. १९९४पासून उझबेकिस्तानात अध्यक्षीय व संसदीय निवडणुकी नियमितपणे पार पडल्या असल्या, तरीही राजकारणात विरोधक उमेदवार किंवा विरोधक पक्ष जम बसवू शकले नाहीत[ संदर्भ हवा ].

अध्यक्षास अधिक कार्यकारी अधिकार असल्यामुळे, तसेच कायदे करण्याच्या दृष्टीने संसदेची परिणामकारकता सीमित असल्यामुळे उझबेकिस्तानाच्या वर्तमान शासनव्यवस्थेत अध्यक्षाचे पद महत्त्वाचे सत्ताकेंद्र आहे. २७ डिसेंबर, इ.स. १९९५च्या सार्वमतानुसार इस्लाम कारीमव याच्या अध्यक्षपदाची पहिली मुदत वाढवण्यात आली. २७ जानेवारी, इ.स. २००२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सार्वमतानुसार अध्यक्षीय कार्यकाळाची ५ वर्षांची मुदत वाढवून ७ वर्षे करण्याची घटनात्मक तरतूद करण्यात आली.

अर्थव्यवस्था

स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघातील अन्य देशांप्रमाणे उझबेकिस्तानाची अर्थव्यवस्थाही स्वातंत्र्योत्तर संक्रमणकाळातील सुरुवातीची काही वर्षे अडचणीत होती. धोरणात्मक सुधारणांचे परिणाम इ.स. १९९५नंतर दिसू लागले. इ.स. १९९८ ते इ.स. २००३ या काळात उझबेक अर्थव्यवस्था वार्षिक ४% दराने वाढली; तर त्यापुढील वर्षांत ७%-८% वार्षिक दराने वाढत राहिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार (भाव स्थिर राहिल्याचे गृहीत धरता) इ.स. १९९५मधील सकल वार्षिक उत्पन्नाच्या तुलनेत इ.स. २००८ मधील उत्पन्न दुप्पट होते[].

उझबेकिस्तानाचे आर्थिक उत्पादन प्रामुख्याने वस्तूंच्या उत्पादनक्षेत्रात एकवटले आहे. कापसाच्या उत्पादनात उझबेकिस्तान जगातील सहाव्या क्रमांकाचा देश असून दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे[]. सोन्याच्या उत्पादनात हा जगातील सातव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. प्रादेशिक स्तरावर नैसर्गिक वायू, कोळसा, तांबे, तेल, चांदी व युरेनियम इत्यादी वस्तूंचा हा आघाडीचा उत्पादक देश आहे.

रिपब्लिकन स्टॉक एक्सचेंज, 'ताश्केंत' हा रोखेबाजार[] इ.स. १९९४ साली स्थापला गेला. यात सर्वसाधारण रोखेबाजार, स्थावर मालमत्तेचे व्यापारी, राष्ट्रीय गुंतवणूक निधी, राष्ट्रीय रोखे निक्षेपस्थान[] इत्यादींचा समावेश होतो.

वाहतूक

ताश्कंद-समरकंद द्रुतगती रेल्वे

ताश्कंद ह्या उझबेकिस्तानच्या राजधानीमध्ये सार्वजनिक वाहतूकीसाठी तीन मार्गांची जलद परिवहन सेवा कार्यरत आहे. भुयारी मेट्रो रेल्वे असलेला उझबेकिस्तान व कझाकस्तान हे मध्य आशियामधील केवळ दोनच देश आहेत. २०११ साली ताश्कंद-समरकंद द्रुतगती रेल्वेमार्ग चालू करण्यात आला. ही रेल्वे ३४४ किमी अंतर २ तासांमध्ये पार करते.

उझबेकिस्तान एअरवेज ही उझबेकिस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी ताश्कंदच्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशातील अनेक शहरांना तसेच मध्य आशिया, युरोपआग्नेय आशियातील अनेक देशांना हवाई वाहतूक सेवा पुरवते.

संदर्भ

  1. ^ डिपार्टमेंट ऑफ इकनॉमिक्स ॲंड सोशल अफेअर्स, पॉप्युलेशन डिव्हिजन (इ.स. २००९). "वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स, टेबल ए.१ (जागतिक लोकसंख्येविषयक आडाखे, सारणी अ.१)" (पीडीएफ). इ.स. २००८ आवृत्ती. संयुक्त राष्ट्रे. १२ मार्च, इ.स. २००९ रोजी मिळवले.
  2. ^ "उझबेकिस्तान" (इंग्लिश भाषेत). २१ एप्रिल, इ.स. २०१० रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट २००९: उझबेकिस्तान (मानवी विकास अहवाल इ.स. २००९ : उझबेकिस्तान)" (इंग्लिश भाषेत). १८ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "ह्यूमन राइट्स इन उझबेकिस्तान (उझबेकिस्तानातील मानवाधिकार)". अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल अहवाल, इ.स. २००८ (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ व्लादिमिर श्लापेंतोख, मुनीर सेंदिच, एमिल पेयिन. द न्यू रशियन डायास्पोरा: रशियन मायनॉरिटीज इन द फॉर्मर सोव्हियेट रिपब्लिक्स (नवी रशियन डायास्पोरा: भूतपूर्व सोव्हियेत प्रजासत्ताकांमधील रशियन अल्पसंख्याक समाज) (इंग्लिश भाषेत). p. १०८. ७ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "इंटरनॅशनल मॉनेटरी फंड वर्ल्ड इकनॉमिक आउटलूक डेटाबेस (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी: जागतिक अर्थव्यवस्थेच्या आढाव्यांचे विदागार)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "कॉटन धिस वीक (कपाशी : चालू आठवड्यात)" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2012-02-13 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ८ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ रोखेबाजार (इंग्लिश: securities exchange, सिक्युरिटी एक्सचेंज)
  9. ^ राष्ट्रीय रोखे निक्षेपस्थान (इंग्लिश: national securities depositary, नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी)

बाह्य दुवे