उजनी जलाशय
उजनी जलाशयात डिसेंबर ते मार्च च्या दरम्यान समुद्र राघू / रोहित greater flamingo, चाटू Eurasian spoonbill, राज हंस bar-headed goose, आर्ली collared pratincole, चाम ढोक painted stork, कौंच demoiselle crane, and मच्छीघार osprey यांच्यासाराखे आकर्षक पाणपक्षी बघायला येतात.
पुण्यातील पाषाण रस्त्यावरील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय खरात एक उत्तम दर्जाचे मत्स्य शास्त्रज्ञ आहेत. २०२१ मध्ये खूपच खालावलेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अभ्यास करून त्यांनी तेथील जलचर व मच्छीमार व इतर समाजांबाबत पुढील माहिती संकलित केली आहे: सहयाद्रीच्या रांगांतील भीमाशंकर या पवित्र भूमीतुन सुरू झालेली भीमा नदी आपल्या प्रवाहामध्ये वेगवेगळया छोटया नदयांना सामावून घेते. कुंडली, घोडनदी, इंद्रायणी, भामा, मुळा, मुठा, पवना, बोरी, सीना, भगवती आणि निरा या सर्व नदयांचे पाणी भिगवण तलावामध्ये जमा होते.
उजनी जलाशयामुळे कुरकुंभ, भिगवण आणि इंदापूर या ठिकाणी खुप मोठे औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले आहे. या औद्योगिक क्षेत्रामध्ये अन्नधान्य प्रक्रिया करणारे कारखाने तसेच खादयपदार्थ, कागद, औषध निर्मिती असे अनेक उद्यम कार्यरत आहेत. या औद्योगिक क्षेत्रामध्ये संबंधित कारखान्यांचा उत्सर्ग धुद्धीकरणाची प्रक्रिया करून पुढे सोडणे आवश्यक आहे. नियमांचा भंग करत लघुउद्योगातून निर्माण होणारा उत्सर्ग त्यांच्याच परिक्षेत्रात जिरवण्याची उदाहरणे काही निदर्शनास येतात. त्यामुळे त्या परिसरातील विहिरींना रंगीत पाणी आणि विशिष्ठ वास असणारे पाणी असे झाल्याचे निदर्शनास आले होते. शेवटी या औद्योगिक क्षेत्रातील उत्सर्ग भिगवण जलाशयामध्ये येऊन मिळतो. औद्योगिक क्षेत्राबरोबरच या उपनदयांच्या भीमा नदीच्या उपनदयांच्या तीरावर वसलेली शहरं, उपनगरं छोटी मोठी गावे यांचे सांडपाणी काही ठिकाणी प्रक्रिया करून तर काही ठिकाणी प्रक्रिया न करताच नदयांमध्ये सोडले जाते. त्यामुळे या नद्यांतील पाणी प्रदुषित झालेले आहे. या प्रदुषणाची तीव्रता प्रचंड वाढली असून स्थानिक मासेमार खाजगीत बोलताना हे वाढते विषच आहे असे सांगतात. भीमा नदी उजनी धरणात ज्या ठिकाणी प्रवेश करते त्या ठिकाणच्या पाण्याचे जीवशास्त्रीय आणि भौतिक रासायनिक पृथक्करण केले असता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. कधी कधी या भागातील पाण्याचा रंग हिरवट ते तांबूस असे झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि सूक्ष्मजीव विशेषतः बॅक्टेरिया यांची वाढ प्रचंड प्रमाणात झाल्याचे या पाण्यात दिसते. या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण हे अत्यंत कमी असून येथील BOD (Biological Oxygen Demand) आणि COD (Chemical Oxygen Demand) हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार नायट्रेटचे प्रमाण १० मिलीग्राम प्रति लिटर असे अपेक्षित असताना या पाण्यामध्ये ८० मिलीग्राम प्रति लिटर एवढे प्रमाण दिसते. तसेच COD ६ मिलीग्राम प्रति लिटर असे असणे अपेक्षित असताना तेसुद्धा ८० मिलीग्राम प्रति लिटर एवढे वाढले आहे. BOD हे २ मिलीग्राम प्रति लिटर असे असणे अपेक्षित असताना ३३ ते ४० मिलीग्राम प्रति लिटर इतके वाढलेले आहे. त्यामुळे या जलाशयामध्ये जीवविविधता ही कमी दिसते. विशेषतः पूर्वी माशांच्या सुमारे ४५ प्रजाती या जलाशयामध्ये सापडत असल्याचा उल्लेख आहे.
उजनी जलाशयातील पाण्याच्या प्रदुषणामुळे विशेषतः जसजसे उन्हाळा वाढू लागतो तसतसे हे प्रदुषणाचे प्रमाण वाढत जाते आणि या जलाशयातील काही भागामध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आलेले आहे. या भागातील मच्छीमार बांधवांशी गप्पा मारताना त्यांनीही या पाण्यात उतरण्याची भितीच अलिकडे वाटायला लागली आहे असे उदगार काढलेले आहेत. ब-याचशा मच्छीमारांना त्वचेचे विकार झाल्याचे ते सांगतात. त्याचबरोबर त्या भागातील लोकांना कावीळ, पोलायटीज सारखे आजारही होत असल्याचे सांगितले आहे. २०२१ सालापूर्वी भिगवण जलाशयावर पक्षी निरीक्षणासाठी गेलो असता पाण्याच्या काठाला हजारो लाखो शंख शिंपले मरून पडल्याचे निदर्शनास आले होते. उजनी जलाशय हे पक्षी निरिक्षकांसाठी जसे प्रेक्षणीय स्थळ आहे तसेच जलचर प्राण्यांच्या अभ्यासासाठी सुद्धा ते अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे.
२०११ ते २०२१ या काळात उजनी जलाशयातील मत्स्य जीवाविषयी अभ्यास केला असता धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत.
१. स्थानिक माशांच्या प्रजाती अत्यंत कमी झाल्या असून त्यांची संख्या सुद्धा ४५ प्रजातींवरून १५ प्रजातींपर्यंत खाली आली आहे. २. रोहु, कटला, मृगल या मत्स्य उत्पादनासाठी एके काळी भिगवण जलाशय हा सुप्रसिद्ध होता. परंतु अलीकडे हे कार्प जातीतले मासे यांची संख्या सुद्धा रोडावलेली आहे. उजनी जलाशयामध्ये कार्प जातीचे बीज सोडले तरी ते विशेष वाढत नाही असे अलिकडे निदर्शनास आले आहे. ३. सध्या उजनी जलाशय हा पिलापी या माशांसाठी सुप्रसिद्ध झालेला आहे. पिलापी हा मासा मुळ भारतीय नसून तो परकीय आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तो प्रचंड प्रमाणात वाढतो. पिलापी या माशामध्ये वर्षभर विणीचा हंगाम असुन पिलापी माशाची मादी अंडयांची आणि पिल्लांची काळजी घेते. पिलापी हा मासा मूळ भारतीय माशांची अंडी आणि पिल्ले खातो. त्यामुळे स्थानिक मासे नामशेष होत चालले आहे. ४. उजनी जलाशयातील ज्यांच्या जमीनी पाण्याच्या शेजारी आहेत अशा लोकांनी शेततळी तयार करून जलाशयातील पाण्याचा वापर करून कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे आणि वजनाने वाढणारे मासे पाळले जातात. ५. आफ्रिकन मांगूर, पिलापी हे विशेष उल्लेखाने सांगता येतील. पावसाळयामध्ये शेततळे आणि जलाशय एक होत असल्यामुळे शेततळयातील आफ्रिकन मांगूर, पिलापी हे जलाशयात वाढतात आणि त्यामुळे स्थानिक मासे हे अत्यंत कमी प्रमाणात मिळतात. किंबहुना काही प्रजाती या जलाशयातुन नामशेष झाल्या आहेत. वाम, मरळ, शिंगटे, शिंगी, कानोशी, कोळशी, मळी, आफ्रिकन मांगूर, मळी, खवली, आंबळी चालट, शिवना हे मासे पुर्वी प्रंचड प्रमाणात या जलाशयात सापडत होते आता या माशांची संख्या प्रचंड रोडावलेली आहे. यातील कित्येक प्रजाती या जलाशयातुन नामशेष झालेल्या आहेत.
संदर्भ
- ^ "सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.
- ^ Gadgil, Madhav (2023-12-19). A Walk Up the Hill: Living with People and Nature (इंग्रजी भाषेत). India Allen Lane. pp. 100–120. ISBN 978-0-670-09704-3.